Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Friday, January 26, 2024

सातारा - पश्चिम घाटाला पडतोय प्लास्टिकचा विळखा.


सातारा - पश्चिम घाटाला पडतोय प्लास्टिकचा विळखा.

रांगडा निसर्ग, आल्हादायक वातावरण व चांगले रस्ते यामुळे शहरातील लोकांचा या ठिकाणी सतत वावर असतो. त्यात भरीस भर कास पुष्प पठाराला युनेस्को ने जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केल्यानंतर इकडे येणाऱ्या लोंढ्यांमध्ये अजूनच भर पडली. भरीस भर अजिंक्यतारा, सज्जनगड, ठोसेघर,वासोटा, बामणोली आणि वज्राई धबधबा आहेच पाहण्यासाठी. 

वाढत्या (मॅरेथॉन, क्रिकेट) स्पर्धांचे आयोजनं, प्री वेडिंग शूट, अनियोजित वाढतं नागरिकीकरण आणि जोडीने वाढणारा पर्यटकांचा वावर यामुळे हि सर्व ठिकाण हल्ली गर्दीने गजबजलेली असतात. हि गर्दी येताना ना-ना तर्हेच्या गोष्टी आपल्या सोयीसाठी घेऊन येते आणि जाताना वडिलांची वतनदारी असल्याप्रमाणे घाणीचं साम्राज्य मागे सोडून जाते. नियोजित कार्यभाग साधुन  सोशल मीडिया वर फोटो किंवा रील्स टाकून झाल्या कि, ना आयोजकांना त्या निसर्गाचा सोयर-सुतक असतं ना त्यातील सहभागी स्पर्धकांना.

त्यातच हल्ली "भावा लाईफ मध्ये फक्त एन्जॉय करायचा संघटना" जबरदस्त ऍक्टिव्ह आहे यांना महागाई दर, बेरोजगारी, पर्यावरण, सामाजिक बांधिलकी असले काही बाही कळत नाही, मुळात त्यांच्या लेखी असे काही प्रॉब्लेम असतात याची जाणीवही नसते. तर हि होतकरू संघटना पार्ट्या करण्यासाठी नेहमी नव-नवीन निसर्गरम्य जागांच्या शोधात असते. यांची खासियत म्हणजे मजा करायला जिथे बसणार तिथेच घाण करनार, तिथेच दारूच्या बाटल्या फोडणार, सिगारेट ओढून झाली की उरलेल्या काड्यांनी रानात वणवा लावणार. गुटखा मावा खाऊन झाला कि पाकीट तिथेच फेकणार. ह्या अशा मस्करीत लावलेल्या वणव्यांमुळे पुर्ण इको सिस्टीम दणाणते, पिकांचं नुकसान होतं, सरपटणारे जीव-जंतु, पशुपक्षी  घरासकट जळुन मरतात. मोठं मोठ्ठाली झाडं मुळासकट जळुन खाक होतात. ज्याचा परिणाम स्थानिक ग्रामस्थांवर ज्यांनी आयुष्यभर मेहनत घेऊन हा रानमेवा जपलेला असतो आणि अर्थात निसर्ग चक्रावर होतो. 

कारण "Every Action Has Opposite Reaction! 

बाबांनो तुम्ही दारू प्यावी कि नाही गुटखा, तंबाखू, सिगारेटच व्यसन करावं की नाही याची चेतावणी त्या वस्तूंवर विक्रेत्यांनी दिलेली असते त्यात व्यसन करणे चांगले कि वाईट हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा. घटनेने प्रत्येकाला वैयक्तिक स्वातंत्र्य बहाल केलंय पण मित्रांनो उघड्यावर घाण पसरवण्याच स्वातंत्र्य तुम्हाला कोणी दिल? मी असे कित्येक पांढरपेशे पाहिलेत जे चालत्या गाडीतुन खाऊन-पिऊन झालं कि रॅपर अथवा बॉटल खिडकीतून चुरगाळून बाहेर फेकून देतात आणि नंतर हेच महाभाग एसी मध्ये बसून ग्लोबल वॉर्मिंग,ओझोनला किती मोठठं भोक पडलंय आणि अंटार्टिका वरचा बर्फ कसा आणि किती वितळतोय यावर सो कॉल्ड चर्चा करनार बघा किती विरोधाभास आहे ते?.  

तसं प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर प्लास्टिकचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात नाकारू शकत नाही, मी स्वतः भरपूर साऱ्या गोष्टी प्लॅस्टीच्या वापरतो. पण प्रत्येकाने घरात पातळ प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरणं जर टाळलं व रोजच्या वापरात एखादी कापडी पिशवी घरच्याच जुन्या कपड्यांपासून शिवून घेतली तर छोटा का होईना फरक पडेल. रॅपर, बाटल्या वेष्टने इकडे तिकडे न फेकता गावा जवळच्या कचरा कुंडीत अथवा निर्माल्य कलशात टाकलीत तर निदान ती पुनर्वापर प्रक्रिया करणाऱ्या प्लांट पर्यंत पोहचू शकतील. 

कित्येकजण कर्मकांडात एवढे अडकलेत कि निर्माल्य कचरा प्लास्टिक पिशवी सकट नदीत अथवा समुद्रात फेकून देतात. अरे बाबांनो हार-फूले हा ऑरगॅनिक कचरा आहे तो घरच्या कुंडीत टाकला तर त्याच छान खत तयार होतं. आणि पाण्यातच टाकायचंय तर पिशवी काढुन टाका ज्याने करून जलाशयातले जीव तो खाऊन त्याच विघटन तरी करतील. गणपती विसर्जनात तर मी मूर्ती सकट संपूर्ण डेकोरेशन नदीत फेकून देताना पाहिलंय. आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. तरी नशीब आता थर्माकॉल वर बंदी लावलीये. 

गेला बाजार आमच्या सारखे पर्यावरण प्रेमी मधून मधून बेडकासारखे डराव डराव करून येणाऱ्या परिस्थितीची जाणीव करून देतात पण "नगाऱ्याची घाई तिचे टिमकीचं काय?" या म्हणी प्रमाणे सर्व विषय पुन्हा बासनात गुंडाळावे लागतात.  

"वर नमूद केल्या प्रमाणे फेकून दिलेल्या घाणीत मुख्यत्वे प्लास्टिकचे साम्राज्य सर्वत्र पसरलेलं दिसतं. त्यात जास्त करून वापरलेल्या देशी- विदेशी दारूच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बॉटल्स, गुटखा आणि खाद्य पदार्थांची वेष्टने यांचा खच सर्रास पडलेला दिसतो. आज कित्येक जंगली प्राणी आणि जलचर अजाणतेपणे प्लास्टिक त्यांच्या पोटात गेल्यामुळे अथवा एखाद्या अवयवात अडकल्यामुळे दगावत आहेत."

नुसतं समर्थ मंदिर पासून कास तलावा पर्यंत किंवा कुर्णेश्वर बोगद्या पासून ठोसेघर धबधब्या पर्यंत रस्त्याने प्लास्टिक गोळा करत गेलात तर एक आठवडा कमी पडेल आणि निदान टनभर तरी प्लास्टिक आरामात गोळा होईल.

 हल्ली गुगल वर सर्रास  विचारला जाणार प्रश्न "प्लास्टिक पृथ्वीवर विरघळते का? तर त्याच उत्तर पुढीलप्रमाणे "त्यातील केवळ 9% कचरा पुनर्वापर केला जातो आणि 12% जाळला जातो. उर्वरित 79% लँडफिल किंवा वातावरणात कायमचा एका किंवा दुसर्या स्वरूपात तसाच राहतो कारण त्याचं विघटन होतं नाही.." 

हे सर्व होण्यामागची मुख्य कारणं "जनजागृतीचा अभाव, प्लास्टिक पुनर्वापराची अपुरी प्रक्रिया आणि स्थानिक प्रशासनाची उदासीनता. अश्या ढोबळ मुद्द्यांमुळे हा प्रश्न सद्या ऐरणीवर आला आहे. आणि ही कचरा वाढ अशीच चालू राहिली तर हा जागतिक वारसा इतिहास जमा झाल्यावाचून राहणार नाही.  

मी या लेखाच्या माध्यमातुन समस्त पठार बांधवाना साद घालतो की जमेल तसं जमेल त्या प्रमाणे हा निसर्ग जपण्याचा प्रयत्न करा. आज परमेश्वराच्या कृपेने आपल्याला सुंदर अश्या ठिकाणी जन्मभूमी मिळाली आहे. येणाऱ्या काळात माथेरान-महाबळेश्वर प्रमाणे आपल्या भागात पर्यटन व्यवसाय भरपूर वाढणार आहे रोजगाराच्या नव-नवीन संधी उपलब्ध होतील. त्यामुळे आपण या सर्व गोष्टींवर एकत्रित पणे वेसण घालू शकलो तर आपल्या मुलांना घरापासून दुर पुण्या मुंबईला प्रदूषित वातावरणात कर्ज काढुन घर घेऊन धकाधकीचं आजारी आयुष्य जगावं लागणार नाही. बाकी ह्या लेखातून मला कोणाच्याही भावना दुखवायच्या नाहीत. चुक भूल माफी असावी.  


                   "आज निसर्गाला वाचवाल तर उद्या निसर्ग तुम्हाला वाचवेल."


No comments: