Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Sunday, April 2, 2017

वासोटा व्हाया बामणोली



       Image result for vasota fort

             
                किल्ले वासोटा
                ऊंचीः १३०१ मीटर (४२७० फुट)

                श्रेणीः मध्यम

                प्रकारः मिश्रदुर्ग

काही गोष्टींविषयी लिहायला कशी सुरवात करावी हेच मुळात सुचत नाही. कदाचित आपल्याला त्या विषयाबद्दल अपुर ज्ञान असावं अथवा त्याची व्याप्तीच इतकी मोठी असावी की शब्द अपुरे पडावेत. असच काहीस माझ्याबाबत घडतयं वासोट्याला जाऊन आल्यापासुन. आज इंटरनेटवर वासोट्याविषयी बरीच माहीती उपलब्ध आहे. अगदी त्याच्या उंचीपासुन ते त्याच्या अंगाखांद्यावर खेळनार्या पशुपक्षांपर्यंत. परंतु मला उमगलेला वासोटा हा त्याही पलीकडचा आहे. ..........

जर तुम्हाला रोजच्या धावपळीचा, लोकलच्या गर्दीचा, ऑफिसच्या इन टाईम पंचचा, बॉसच्या टोमन्यांचा, वाढनार्या पगाराचा आणि सतत वाढनार्या महागाईचा, इतरांच्या तुमच्याकडुन असलेला अपेक्षांचा,  व्हॉटसप चॅटचा आणि फेसबुकवरील खोट्या लाईक्सचा तीव्र कंटाळा आला  असेल तर वासोटा  हा त्यावर उत्तम पर्याय ठरु  शकतो, "हो पण दर्या खोरयांच वेड रक्त्तातच असाव लागतं तिथे येरा गबाळ्याच काम नाही.

          वासोटा...म्हणजेच व्याघ्रगड, आज भारतात जे काही मोजकेच मिश्रदुर्ग (म्हणजेच वनदुर्ग आणि गिरीदुर्ग यांचा संमिश्र प्रकार) आहेत त्यात वासोट्याचं नाव घेतल्यास अतिशयोक्ती ठरु नये. चोहोबाजुंनी घनदाट अरण्य आणि पायथ्याशी शांतपणे विस्तारलेला शिवसागर जलाशय आपल्याला अदभुत सौंदर्याची अनुभुती देतो. थोडक्यात काय जर तुम्हाला बोटींग, जंगल भटकंती आणि गिर्यारोहण या सर्वांचा एकत्रित आनंद घ्यायचा असेल तर वासोटा हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो.  

          माझं जन्म गाव सातारा, त्यात कास बामणोली ला भरपुरवेळा जाण झाल होतं पण वासोट्याचा मुहर्त काय निघत नव्हता. फक्त मुखदर्शन घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी गेल्या गुरुवारी माझा भाऊ समीरचा फोन आला आणि ठरल यावेळी किल्ला सर करायचाच. त्याच्या सल्ल्याप्रमानेच शनिवारी दुपारी घरातुन निघालो आणि संध्याकाळी सातार्यात हजर झालो. आडके (समीरला प्रेमाने मी आडनावाने संबोधतो.) त्यांच्या लाडक्या बजाज बॉक्सर ला घेऊन  स्टॅन्डवर हजर होते स्वागतासाठी. अर्थात त्याला समोर पाहुन आनंदच झाला होता कारण आधीच मकर संक्रान्तीला घरातुन बाहेर निघालो म्हणुन बायकोचा फुगा फुगला होता पण यावेळी तिळगुळ वासोट्यावरच वाटायचे अस मनोमनं ठरवुन निघालेलो मी आता समीर समोर उभा होतो.

           समीरकडुन मिळालेल्या माहीतीनुसार आम्हाला धरुन ट्रेकला जाणारे आम्ही एकुन सोळाजन होतो त्यात समीर सोडला तर मी कोणालाच ओळखत नसल्यामुळे मनात थोडी शंकेची पाल चुकचुकली होती. पण याच लोकांबरोबर उरलेला दिड दिवस एकदम टेन्शंन फ्री कसा गेला तेच कळाले नाही. त्या  बद्दल त्या सर्वांचे मनापासुन आभार

 
वासोट्याला जाण्यासाठी प्रामुख्याने तीन मार्ग आहेत. पहीला महाबळेश्वर-तापोळामार्गे दुसरा कास पठारच्या घाटमार्गावरुन आणि तिसरा कोकणामधुन. कोणतीही वाट निवडा फरक फक्त अंतरात पडेल पण एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल ती म्हणजे ईश्वराने मुक्त हस्ताने निसर्गाची उधळन या प्रदेशावर केली आहे. कोणत्याही बाजुला कटाक्ष टाकला तरी एखाद सुंदर चित्रच पाहतोय असा भास व्हावा ते्ही हाय डेफिनेशन मध्ये.
Image result for kaas road view


कोकणातील चिपळुन मार्गे चोरवणे गावापर्यंत वाहनाने जाण्याची सोय आहे. तिथुन पुढे जंगलातुन चालत नागेश्वराच्या सुळक्याकडुन वासोट्या पर्यंत पोहचता येते. तर सातार्याहुन कास घाटमाथा मार्गे बामणोली गावापर्यंत एसटीने आणि तिथुन पुढे लॉंचने तासाभरात मेट इंदवली गावापर्यंत पोहचता येते. मुळात सातारा ते कास हाच प्रवास इतका रोमहर्षक आहे की नकळत मनातल्या मनात आपण चिंत करायला लागतो.

सातारा सोडुन समर्थ मंदीरपासुन गाडी वर वळाली की डाव्या बाजुला अजिंक्यतारा ताठ मानेने येणार्या जाणार्यांच अभिवादन स्वीकारत असतो. तिथुन पुढे बोगद्या पासुन उजव्या बाजुला लागलात की गाडीला फर्स्ट गिअर शिवाय पर्याय नसतो कारण आपण यवतेश्वर घाट चढायला सुरवात केलेली असते. घाट चढतानाच उजव्या बाजुला सहज नजर टाकली तर अस्ताव्यास्त पसरेलेल सातारा शहर त्याच्या सद्य परिस्थितीची जाणीव आपल्याला करुन देतं. रस्त्याने जातानाच डाव्या बाजुला यवतेश्वराची कमान आपलं लक्ष वेधुन घेते. यवतेश्वरला शकराच पुरातन मंदिर आहे. आवर्जुन भेट द्यावी अस ठिकाण. कारण हल्ली फार कमी जागा उरल्यात जिथे आपले हात आपोआप जोडले जातात अथवा आपण नतमस्तक होतो.

एका अनामिक ओढीने् भारावल्यासारखे आपण पुढे पुढे जात राहतो. घाट चढुन माथ्यावर आलात की उत्तरेला कण्हेर धरण आणि दक्षिनेला उरमोडी धरण शांतपणे  पहुडलेल दिसतं. त्यांच ते लोभसवानं रुपडं डोळ्यात साठऊ तेवढं कमी आहे. उरमोडीच्या वरच भगवं निशा आपल्या खांद्यावर "समर्थ" पणे मिरवणारा सज्जनगड सात्विक चेहर्याने आपल्याकडे पाहात असतो. नकळत आपल्या तोंडातुन "जय जय रघुवीर समर्थ बाहेर पडतं". आजुबाजुच्या सह्य पर्वतांच्या रांगा, ती हळुच अंगाला स्पर्श करणारी गार हवेची झुळुक, तिच्यातला ताजेपणा, कारवीच रान आणि कोणताही क्रुत्रीमपणा नसलेला नैसर्गिक लाल मातीचा वास. मनावरती गारुड करुन टाकतो

Image result for kaas road view 

भोताच्या निर्गाचा आस्वाद घेत आपण कास पुष्प पठारावर येऊन पोहचतो. तस पाहायला गेलात तर सातारा शहराची एतिहासिक, शुरवीरांचा जिल्हा म्हणुन सुरवातीपासुनच ओळख आहे पण वर्ल्ड हेरिटेज कमिटीने जुलै २०१२ मध्ये हे स्थळ (कास पुष्प पठार) जागतिक वारसास्थळ म्हणुन घोषित केले आणि जगाच्या नकाशावर स्वताची वेगळी मोहोर उमटवली. श्रावणाच्या सुरवातीपासुन इथे निसर्गाचा अनोखा पुष्पसोहळा रंगतो. विविध प्रकाराची, रंगाची ही रानफुले पठारावर इतकी अनोखी दिसतात की देहभान विसुरुन जायला होतं. सर्वात आश्चर्य म्हणजे कोणताही माळी नाही, कुठल खतं नाही का कसल हॉर्टीकल्चर वाल लॅण्डस्केपिंग नाही. इथे सर्व मॅनेज "नि्सर्गच" करतो. तेही विनामुल्य.

वळणा वळणाने जाताना काही धन दांडग्यांचे टुमदार बंगले आणि हॉटेल्स आपल्या नजरेस पडतात जिथे  राहण्या खाण्याच्या सोयी बरोबर फिरण्याचीही उत्तम व्यवस्था केली जाईल असे फलक लावलेले दिसतात. हे सर्व पाहायला छान वाटतं पण एक अनामिक भिती मनात दाटुन जाते, की हे असच वाढत राहील तर कदाचित ह्या अबाधित सौंदर्याची नासधुस करायलाही आपण कमी करणार नाही असो..

घाट माथ्यावरुन थोड पुढे गेल्यावर डाव्याबाजुला आतमध्ये एक मळलेली कच्ची सडक जाते जिथे घाटाई देवीच पुरातन मंदीर आहे. ही देवी वाघावर आरुढ असुन या मंदिराबद्दल अशी आख्यायिका आहे  की दर वर्षी यात्रेला मध्यरात्री इथे वाघ येऊन जातो.तिकडे आत वळता पक्या सडकेनेच दोन-एक किलोमीटर पुढे गेल्यावर गवतात पाचु चमकावा तसा, "संपुर्ण सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा आणि गेल्या १०० वर्षात कधीही आटलेला, गर्द वनराईने वेढलेला कास तलाव" चमकताना आपल्या द्रुष्टीस पडतो.  त्याच्या काठा-काठानेच दुतर्फा झाडांच्या सावलीतुन वळणे घेत, सरतेशेवटी सातारा- कास पठार - बामणोली अशी आपली नयनरम्य रोडट्रीप संपवुन आपण बामणोलीयेऊन पोहचतो.Image result for kaas lake


शिवसागर जलाशयाच्या काठाशी वसलेलं बामणोली हे गाव अतिशय सुंदर आहे. जलाशयाच्या काठाला लागुनच छोटी छोटी हॉटेल्स आपल्या स्वागताला सज्ज दिसतात. जिथे जेवण्या खाण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे तसेच वासोट्याला जाणार्या लॉंचेस आपल्याला येथुनच उपलब्ध होतात. वासोट्याला जाण्यासाठी वनखात्याची रीतसर परवानगी बामणोलीतुनच घ्यावी लागते. वनखात्याच्या परवानगीनंतर  आपल्या जवळील साहित्याची तपासनी करुन जवळील सामानाची लिस्ट दिल्यावरच लॉंचने आपल्याला मेट इंदवली गावापर्यंत जाता येते. सर्वात महत्वाच म्हणजे तुम्ही दोन जन असा अथवा पंधरा जण बोटीचे दर १४०० ते १५०० ठरलेले.(दोन्ही बाजुचे धरुन) आणि ठरल्या प्रमाणे जी बोट तुम्हाला घेऊन जाते तीच बोट संध्याकाळ पर्यंत तिथेच थांबुन परत तुम्हाला घेऊन येते.




तुम्ही शिवसागर जलाशयाच्या काठी अशा प्रकारे टेंट मध्ये सुध्दा राहु शकता


एकदा का तुम्ही बोटीत बसलात की शिवसागर जलाशयाच निळसर पाणी आणि आजुबाजुचा रम्य परिसर तुमच लक्ष वेधुन घेतात. नकळत त्या दैवी सौंदर्यात हरवुन जायला होत. त्या सह्यरांगांच पाण्यातल प्रतिबिंब पाहुन असा भास होतो जणु काही एखादी भारदस्त स्त्री आपला केशरंभार सोडुन आरश्यात स्वतचं रुप न्याहाळत आहे. इतक्यात नावाडी बोटीच्या इंजिनाला स्टार्टर मारतो...फाकफाक फाकफाकफाक्फाक...करणार्या त्या आवाजाने आपण भानावर येतो मागे वळुन पाहतो तशी आपली बोट शांत लयीत वासोट्याच्या दिशेने मार्गस्थ होऊ लागते. जणु काही ति काठाला ओरडुन ओरडुन सांगत असावी काळजी नको संध्याकाळी लवकर परत ये्ईन

इंजिनाच्या पंख्यामुळे पाण्यात निर्माण होणार्या वलयांवर मन हळु हळु अलगद तरंगायला लागत. एव्हाना बोटीत "सेल्फी" सेशन सुरु झालेल असतं. लाखमोलाच हे सौंदर्य स्म्रुतीपटलार साठवण्या एवजी मेमरी कार्डवर साठवण्यासाठीची लोकांची धडपड पाहीली की फार गंमत वाटते. शेवटी काय आपणही त्यातलेच या उक्तीप्रमाणे मीही घेतले पाच-सहा कडक सेल्फी. बोट जसजशी धक्या जवळ पोहचु लागते तसतसा वासोटा अंगावर आल्यासारखा दिसु लागतो. नीट निरखुन पाहीलात तर तो ध्यानस्थ बसलेल्या तपस्वी सारखा तेजस्वी भासतो


बोटितल्या प्रवासा दरम्यान जर तुमच नशीब चांगल असेल तर एखादा गवा, सांबर अथवा अस्वल पाणवठ्यावर आलेले दिसु शकतात. त्यामुळे नजर चोहोबाजुंला असलेली केव्हाही उत्तम.
एक तासाभरात आपण मेट इंदवली गावात येउन पोहचतो. धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे हे गाव फार पुर्वीच तिथुन उठुन गेल्यामुळे सध्या फक्त भग्न घरांचे अवशेषच इथे पाहायला मिळतात.

तिथे पोहचल्यावर वनविभागाचे कार्यालय लागते. कार्यालय तस छोटंसच आहे. पण जंगलात असलेल्या सर्व प्रजांती विषयी तेथे इत्यंभुत माहीती लावलेली आहे. सर्वात महत्वाच म्हणजे पुन्हा एकदा आपल्या सामाणाची येथे तपासणी कली जाते. ज्यात एखादी वस्तु आक्षेपार्ह आढळली अथवा सदर वस्तु जर तुम्ही बामणोलीत सादर केलेल्या लिस्ट मध्ये समावीष्ट नसेल, तर अश्या वस्तु सरळ सरळ जप्त करण्याची परवानगी वन अधिकारयांना देण्यात आलेली आहे. तसेच आपल्या जवळ जेवढ्या प्लॅस्टीकच्या वस्तु आहेत त्या प्रत्येक वस्तुगणिक रु वीस प्रमाणे तिथे डिपॉझिट भरावे लागते. जे तुम्हाला परत खाली आल्यावर त्या वस्तु दाखवल्यावरच परत मिळते. उाद्देश हाच की लोकांनी वरती अथवा जंगलात घाण करु नये. आणि खर सांगु या नियमामुळे लोक साध बाटलीच टोपण फेकताना सुध्दा विचार करत होते. एक साधा पण स्तुत्य उपक्रम.

इंदे मेटवली गावच्या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरू होते.  
Related image

सोबतच्या पाण्याच्या बाटल्या ओढ्यातून भरुन घेणे गरजेचे आहे. हा चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे वनस्पती आपल्याला दिसतात. या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत. श्वापदांत गवे आणि अस्वले प्रामुख्याने आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट करता चढाई करावी लागते. कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो. त्यातल्यात्यात गव्यापासून आणि अस्वलापासून अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
अर्धाअधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायर्या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश होतो.


गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यावर शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो.



याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. टाक्यात पाणी असेल तरी ते उकळ्याशिवाय पिऊ नये. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या पश्चिमेलाच महाराष्ट्रातील दुसर्या क्रमांकाचा उंच कडा आहे. ज्याचे नाव बाबु कडा. ९० अंशात कललेल्या बाबू कड्यापासुन पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते.थोडक्यात काय "नजर हटी दुर्घटना घटी". 

सुचना इथे गेल्यावर सेल्फी वैगरे घेण्याचा मोह टाळावा. कारण वाढलेल्या गवताचा अंदाज न आल्यामुळे पाय घसरुन याआधीही तेथे काही अपघात झालेले आहेत.
तसेच येथून परत पा्ण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे.या माचीला पाहील की लोहगडाची आठवण आल्याशिवाय रहात नाही या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर अथवा नागफनी सुळक्याचे उत्तम दर्शन होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो.

वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. वसिष्ठचे पुढे वासोटा अथवा वसिष्ठांचा कट्टा असा अपभ्रंश होउन वासोटा झाला असावा अशी कल्पना आहे. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.
शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि जून १६६० रोजी घेतला.वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवकाळात  या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन घनदाट असे अरण्य आणि वाघ, बिबट्यांसारख्या हिंस्त्र पशुंचा असलेला मुक्त वावर
अफझलखाच्या वधानंतर महाराजांच्या  दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्याला अटक केली वासोट्यावर ठेवले. .सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठदहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.
त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गमतीचा उल्लेख आहे. तो सा,
 
श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा;
तेलिण मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा.
(विकिपीडीयावरुन साभार)



समीरसह
जर तुम्हालासुध्दा वासोट्याचा थरार प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर श्री समीर आडके यांच्याशी संवाद साधुन आपल्या ट्रेकच नियोजन आपण करु शकता.  त्यात वन खात्याची परवानगी घेण्यापासुन ते तुमच नाष्टा, जेवन, खोली अथवा जलाशयाजवळ कॅम्प आणि बोटीची व्यवस्था, सोबत सभोवतालच्या परिसराची उत्तम ओळख हा अवलिया तुम्हाला करुन देईल तेही योग्य दरात. मग वाट कसली पाहताय मित्रांनो... वासोटा तुम्हाला खुणावतोय...

समीर विषयी,
आपली कला क्षेत्राची आवड जोपासुन या व्यक्तीने समाजाची आणि निसर्गाची उत्तम जाण जपली आहे. त्याच्या सदैव चालणार्या धडपडीसाठी श्रीमत् तर्फे मानाचा मुजरा.
टीप. लेखातील काही फोटो आंतरजालावरुन साभार.
समीर आडके- ९९२२६ ३९६८६