Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Monday, November 23, 2009

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आला असेल आणि माझ्या मते तो सर्वश्रुत असेल तो म्हणजे - 'आता तयारी करुन आपल्याला कामाला जायचं आहे.' आयला लहानपणी शाळेत जायची तयारी आणि आता कामाची. तेव्हा शाळेत जाईपर्यंत आई किंवा बाबांची कटकट (अर्थात आपल्याच भल्यासाठी) आणि आता बायकोची (वायफळ किंवा फाल्तु बकवास फक्त लग्न झालेल्यांसाठी). त्या बाबतीत अजुन पर्यंत मी तरी सुखी आहे ह्या विचाराने मी सुखावतोय ना सुखावतोय; की बॉसचा रागीट आणि खडुस चेहरा माझ्या समोर आला व क्षणापुर्वीच झालेला आनंद मावळला. खरच सुख कीती क्षणीक असते ह्याची प्रचीती आली. तेवढ्यात बाबांचा आवाज आला, "अरे मन्या, कामाला जायचय ना? ८.०० वाजलेत." ह्या एका ओळीने माझी सारी शरीर यंत्रना कामाला लागली. मी पटापट बिछाना गुंडाळला आणी तडक बाथरुम मध्ये घुसलो. आता तिथे काय केलय हे वेगळे सांगायला नको, पण आंघोळ अहो आं-------घोळ तिथेही घोळ आलाच. नावाला दोनच तांबे डोक्यावरुन त्यामुळेच ह्या Deo वाल्या कंपण्यांच जरा जास्तच फावतय. आणि हो आंघोळीशी संबधीत एखादी स्पर्धा असेल तर भारताला मी नक्कीच पहीलं गोल्ड मिळवुन देईन (कृपया कोणाला माहीती असेल तर नक्की कळवा).

सुचिर्भुत होऊन बाहेर आल्यानंतर मी घाई-घाईत प्रा:तस्मरण केले. तेवढ्यात बाजुलाच पुजा करत असलेले आमचे तीर्थरुप म्हणाले, "अरे ते तरी कशाला करतोस? देवावर उपकार केल्यासारख, "मनी नाही भाव आणि देवा मला पाव"". तेव्हा मी चिडक्या स्वरातच बोललो, "अण्णा देव भावाचा भुकेला, समजल? त्यात मला लेट झालय." "मन्या, तुझ हे रोजचच आहे. रात्री बारा एक शिवाय झोपायच नाही आणि मग सकाळी ही धावपळ. मग कधी मोबाईल विसरायचा, कधी घड्याळ तरी अगदीच कळस म्हणजे पाकिट ट्रेन पाससहीत घरी ठेऊन जायचं आणि बसायच चीडचीड करत!". माझ्या एका लूज बॉलवरती आण्णांनी पार होम रनच मारला. मी स्वतःच्याच कानफडात मारल्यासारखा किचनमध्ये पळालो, नेहमीप्रमाने आईने ब्रेडच्या स्लाईस किचन मध्ये ठेवल्या होत्याच. त्या बाजुच्या पेल्यातल्या चहात बुडवुन अधाश्यासारख्या खाल्ल्या. टिफिन बॅगेत भरला तसेच घाई-घाईत मोजे चढवले आणि आईला आवाज दिला "आईईई...... येतो गं"

आई: अरे न्याहारी केलीस का?

मी: हो किचन वर ठेवलेले ब्रेड आणि चहा घेतला.

आई: चहा? कोणता? मी तर दुध ठेवल होतं ग्लासमध्ये झाकुन.

मी : अगं सोडंना, पेल्यात होता चहा, छान झाला होता.

आई : अरे गाढवां, तो ह्यांनी चहा पिऊन हात धुवुन ठेवलेला पेला होता. अरे मन्या न्याहारी तरी व्यवस्थीत करत जा बघ किती सुकलायस तो.

आणि सहज माझी नजर माझ्या ३६ च्या वाढलेल्या कंबरेकडे गेली आणि सर्व आयांना त्यांची मुल जन्मभर लहानच असतात ह्याची खात्री पटली.

"चल आई येतो आता" म्हणत मी अश्वावर आरुढ झाल्यासारखा घराबाहेर पडलो. आता माझ्या डोळ्यासमोर एकच ध्येय दिसत होते ते म्हणजे ८.३२ ची अंधेरी लोकल. दचकलात ना? होय मी अंधेरी ला कामाला आहे. माझ्या लहाणपणी मी शहनशहातल "अंधेरी रातो मे..." हे गाणं ऐकायचो आणि ह्या अंधेरीला त्या गाण्याशी रिलेट करायचो. म्हणजे थोडक्यात अंधेरीविषयी मला पहिल्यापासुनच भिती आणि तिथे कामाला असलेल्या माझ्याच काही मित्रांनी “तिथे कशी गर्दी असते हे गर्दीसारखच फुलवून सांगितल्यामुळे” मी जाम घाबरलो होतो. होतो म्हणजे घटनेला आता तीन वर्ष उलटुन गेलीयेत आणि मी पक्का अंधेरीकर झालोय. नुकतच एका प्रसिद्ध व्रुत्तपत्राने (दै.पुण्य नगरी) आपल्या एका अहवालात म्हटलय की, अंधेरीला सबंध दिवसात येणार्‍या जाणार्‍या लोकांना साखळीत उभ केल तर काश्मीर ते कन्याकुमारी मानवी ब्रीज तयार होईल. च्यायला हे काय पट्टी घेऊन मोजायला जातात की काय? उगच आपल काही तरी.

तसं माझ घर आणि स्टेशन हे अंतर ५ ते १० मि. परंतू मी निघणार ८.२५ ला मग…… मग सगळ तुमच्या लक्षात आलं असेलच! एखाद्या योध्याच्या अविर्र्भावात मी चालायला लागलो. पाचंच मिनिटात स्टेशन 'चालत' गाठायचे. म्हणजे मी चालतच असतो, पण लोकांना उगीचच मी पळत असल्याचा भास होतो. सबंध दिवसात जो काही घाम येत असेल त्यापैकीचा ५० टक्के कोटा बहुधा ह्या पाच मिनिटांतच पुर्ण होत असावा. तेवढ्यात क्षणापुर्वीच मारलेल्या Deo चा वास अनंतात विलीन झालाय याची जाणीव होते. आता विचार करा मी कसा दिसत असेन? ओले कपडे (घामाचे) भेदरलेला निर्विकार चेहरा आणि विस्कटलेल केस तरी मी म्हणतो आई नेहमी माझी द्रुष्ट काढायची आहे असं का म्हणते? कित्येकदा काही “खवचट” लोकांनी मुद्दाम मला विचारलेही काय मन्या कामावरुन येतोयस की जातोयस? तर हे झालं स्टेशन पर्यंतच.

कशी बशी गाडी मिळवली व नेहमीप्रमाणे छान वास(Deo चा) येणार्‍या माणसाच्याच बाजुला जाऊन उभा राहीलो. त्याचे असे की एक सत्य मला चांगल उमगलयं. मानसाने कितीही वेगवेगळे Deo किंवा सेंट बनवले तरीही गर्दीत सर्वांचा वास(??) sorry सुगंध सारखाच येतो. डब्यात नेहमीप्रमाणे काही ओळखीच्या लोकांना हात दाखवुन वैगेरे झाल्यानंतर मी स्थिर-स्थावर होऊ लागलो. एक सबंध नजर डब्यातुन फिरवली त्यात एक गोष्ट माझ्या लक्ष्यात आली ती म्हणजे प्रत्येकाच्या पाठीवरचे "ओझे" म्हणजे बॅग हो! हे लोक ऑफीसला चाललेत की ट्रेकींगला कळता मुश्किल ह्या मिश्किल विचारातच स्वतःशीच हसत मी माझीही बॅग पुढे घेतली व हळुच त्यातुन हेड फोन काढला आणि कानाला लावला. अर्थात दुसरे टोक मोबाईललाच लावणार? काय "तुम्हीपण" हा आता असे करण्यामागे गाणी ऍकण्यापेक्षा मोबाईल चोरीला जाऊ नये हाच उदात्त हेतु. (त्याच असं की हल्ली नव-नवीन महागड्या मोबाईल्स मुळे चोरांच फार फावलय साले पा़कीटाला हात लावणार नाहीत पण खिशातला मोबाईल कधी उडवतील ह्याचा बेत नाही) गाणं वाजायचं बंद झाल की समजायच मोबाईलच काहीतरी बंर वाईट झाल म्हणुन. आहे की नाही झक्क्कास idea (an idea can save ur mobile अशी नवी स्लोगन आली तर नवल वाटुन घेऊ नका.)

हया विचारांच्या गर्तेत असतानाच माझी नजर सहजच माझ्या पायांकडे गेली, तेव्हा उजवा पाय सफेद तर डावा गडद निळा दिसत होता. मगाशी घाईघाईत आपण दोन वेग-वेगळे मोजे चढवलेत ह्याचा साक्षात्कार झाला. मुर्खपणा झाला इथपर्यंत ठिक होते पण ह्यापैकी एक मोजा आमच्या तीर्थरुपांचा असल्यामुळे घरी त्यांनी आईला बेजार केलं असणार आणि शेवटी फिरुन त्यांना कळणारच खरा गुन्हेगार कोन तो? आण्णांचा त्रस्त चेहरा समोर आला आणि काळजी करावी की घाबरावं ह्या द्विधा मनस्थीतीत मी सापडलो. एवढ्यातच बाजुला मोठ्याने हसण्या खिदळण्याचा आवाज आला व माझे लक्ष तिकडे गेले. चार-पाच गुज्जु बांधव छान रम्मी (जुगार) खेळण्यात रमले होते. तसं हे त्यांच नेहमीचचं आणि बहुतेक उपजीवीकेच साधन असावे? कारण गेली तिन वर्षे मी त्यांना त्याच ठिकाणी तेच करताना बघतोय. फार फार तर काय बदल होत असेल तर ज्याला खेळता येत नसेल तोही बाजुला बसुन आपोआपच शिकतो व त्यांच्या कंपुत जॉईन होतो एवढच.

थोड्याच वेळात "अगला स्टेशन अंधेरी, पुढील स्टेशन अंधेरी, next station Andheri" असे तीन वेगवेगळ्या भाषेत घाबरवल्यानंतर तो मंजुळ आवाज बंद झाला. आणि मी भानावर आलो एक-एक करुन सर्वजन आपल्या जागेवरुन ऊठू लागले, तर दरवाज्यातील काही मंडळी मागे सरुन उभी राहु लागली. कारण काय तर ट्रेन फक्त अंधेरी पर्यंतच असल्यामुळे खाली चर्चगेटला जाणार्‍या "भावीकांची" तुडुंब गर्दी असते. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागली रे लागली की कळ्पातल्या गुरांसारखी सर्व गर्दी चार बाय सात च्या त्या दरवाजातुन आत शिरायला बघते. मी कित्येकदा ह्या विलोभनीय द्रुष्याचा आस्वाद घेतलाय. एखादा मजबुत अंग काठीचा(ची) असेल तर निभावुन जातात, पण शरीर यष्टी बारीक असेल तर तुम्ही परत चर्चगेटपर्यंत गेलात म्हणुन समजा. खरंच बडा है तो बेहतर है! (अंगकाठी हो) आणि आरडा-ओरडा वेगळा सांगयला नको. कित्येकजण प्रवासासाठी आलेत की मोर्चा घेऊन हे "ते" ट्रेनमध्ये बसल्याशिवाय कळतच नाही. तिथुन कसाबसा मुसंडी मारुन ट्रेन च्या बाहेर पडलो आणि नकळत तोंडातुन "वाचलोय वाचलोय हुश्शःssssss" असे भावुक शब्द आले. पुन्हा एकदा अंगावरील सर्व आभुषने नीट तपासली आणि स्टेयर्सचा दिशेने चालु लागलो. अंधेरीत येऊन एक गोष्ट मात्र मी अनुभवातुन शिकलोय, गर्दीत जास्त हात पाय न हालवता स्वताला लोकांच्या स्वाधीन(त्या अर्थाने नाही) करायचे, म्हणजे काय कडेवर उचलायला सांगायचे नाही. तर शांत चेहरा ठेऊन अलगद चालत राहायचे तुम्ही कधी बाहेर पडलात (स्टेशनच्या हो) ते कळनारच नाही आहे.

स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर पहीली पाच मिनीटे कळतच नाही की आपण नक्की मुख्य रस्त्याकडे चाललोय की एखद्द्या मार्केटमध्ये घुसलोय. अगदी नेल पॉलीशपासुन ते फणी पर्यंत सर्व “items” म्हणजे वस्तु…… नाही कळलं? जरा विस्कटुन सांगतो, पायाच्या नखापासुन डोक्याच्या केसापर्यंत जे जे लागत ते सर्व तुम्हाला आजुबाजुलाच मिळेल. हा पण पैसे मोजावे लागतील नाहीतर राहाल माझ्यासारखे गोड संभ्रमात. एकदा काय झाल मी स्टेशन मधुन बाहेर पडल्या पडल्या एका ज्युस वाल्याने मला हातवारे करुन बोलावलं मला वाटले, असेल काहीतरी सणानिमीत्त्त नाहीतरी आपल्याकडे गणेशोत्सवात मिरवणुकीतील लोकांना काहीतरी फुकट देण्याची प्रथा आहेच. त्यामुळे तसंच काहीस वाटुन मी पुढे सरसावलो त्यात उन्हाळा असल्यामुळे तहानलो होतोच. गेलो आणि छान दोन ग्लास सरबत रिचवला पिता पिता त्याला छान आशिर्वादही दिले ग्लास ठेवला आणि चालु लागलो. ईतक्यात मागुन (पाठीच्या हा) मोठ्या ने आवाज आला "साब"(ह silent) ओ "साब" मीही त्याच्याकडे पाहीले आणि म्हटले, "बसं यार दो ग्लास मे ही पेट भर गया अब और नही." "हा ना? तो फिर मेरे पेट पे लात क्यु मार रहे हो? मेरा पैसा तो दो", तो अत्यंत कळवळीने बोलला. "कैसा पैसा?" मी यमक जुळवत बोललो. "शरबत का", "अबे तुने ही तो मुझे हात दिखाके बुलाया." मी त्वेषात बोललो. "साब, वो तो मेरा धंदा है. लगता है आप नये हो यहा पे." "चल बस कर. कितना हुआ?" म्हणत मी प्रकरण संपवल आणि मनोमन बडबडत अर्थात आशिर्वादाची जागा आता शिव्यांनी घेतली होती तिथुन निघालो. अजुनही असं काही आठवल की मी माझ्याच बावळटपणावर येथेच्छ हसतो.

स्टेशन समोरच आगरकर चौकात एक सुलभ शौचालय आहे. मला आजही आठवतय माझ्या सुरवातीच्या काळात मी जेव्हा अंधेरीत जॉईन केल होतं तेव्हा समोरील लाईन पाहुन खरचं फार घाबरलो होतो. पहील्यांदा वाटल की आज काय जागतिक स्कॉटींग (संडा--) दिवस आहे की काय? पण लगेचच एका सभ्य (फक्त वाटत होता) ग्रुह्स्थाने ती SEEPZ ला जाणार्‍या बसेस ची रांग आहे हे सांगीतले व माझ्या भीतीत अजुनच भर घातली होती. त्या प्रसंगानंतर जर काही बदल झाला असेल तर ती गर्दी आता त्या सुलभच्याही पुढे गेली आहे. कधी-कधी वाटत एखादी बस पाऊन एक तास लेट झाली तर रांगेतला शेवटचा माणुस थेटं SEEPZ लाच पोहचायचा. मी मात्र ह्या फंदात नं पडता सरळ चालत जाणंच पसंद करतो त्यामुळे फायदा काय? तर “पायांचाही” व्यायाम होतो आणि “डोळ्यांचाही“

दरम्यानच्या काळात अंधेरीने बरचं सोसलयं. ठिकठिकाणी मोठे मोठे कॉंम्प्लेक्स झालेत. अत्यंत परिचीत आणि जुन्या कलाकारांची खरी ओळख असलेला नटराज स्टुडीओ जाऊन तेथे नटराज टॉवर उभा राहतोय. अनिल ने (अंबानी हो) METRO चे tender भरलय की "उत्खणनाचे"(excavation) तेच कळ्त नाही आणि पोल्युशन तर विचारु नका. आख्या प्रुथ्वीवर ओझोनला जर सगळ्यात मोठं भोक कुठे पडेल तर ते अंधेरीत असेल? (सौजन्य दै. बोंबाबोंब) आणि सगळ्यात गहन प्रश्न जो तुमच्या आमच्या सारख्या Common Man ला नक्कीच पडतो तो म्हणजे अंधेरीत ह्या गर्दीशी लढण्यास खरच आपली प्रशासन व्यवस्था तेवढी तत्पर आहे का? गावा-गावात Sky walk असताना अंधेरीचा ह्याबाबतीत साधा विचारही होऊ नये? नको त्या ठिकानी Sub Way बांधुन "पाणी साठवण्यापेक्षा" Western Express Highway वर काही महत्वाच्या ठिकाणी बांधले तर लोकांना आपला जीव मुठीत घेऊन रस्तातरी ओलांडावा लाङणार नाही. जाऊद्या लिहावं तेवढ कमीचं मी उगाचच ईमोशनल झालो.

ह्या सार्‍या विचारांच्या बट्या बोळात ऑफिस कधी आलं ते कळल सुद्दा नाही. ईथपर्यंत सुखरुप आणल्याबद्दल मी देवाचे आभार मानले आणि पळतच ताटकळत उभ्या असलेल्या “lift” मध्ये प्रवेश केला कारण नेहमीप्रमाणेच आजही उशीर झाला होता.- श्रीमत्(महेन्द्र लक्ष्मण कदम)

4 comments:

सिद्धार्थ said...

श्रीमंत महेन्द्र पंत... छान लिहलय फक्त वाचताना धाप लागली जरा.. :-)

Unknown said...

mastach ekdam, aaplyat ki pan kala aahe he aajach samajle. tussi toh great ho yaarrrrrrrr

Anonymous said...

Chhan Lihitos. thode briefly vachayala jasta maja yete, shakato ghatana detail madhe chalatil, jase ke sharbat chi ghatana. Survatichi teen paane tashi jasta detail madhe zhali tya peksha nantar chi doon paane jasta majeshir vatli.
Shakyato chavat pana talava, tye mule prekshak varga kami hoi shakato.

P.L. (Marathi Mansache Aadhar Sthan) chaya pavla var pavale takun Lihit Raha.

Shubhecha.
Uday

Unknown said...

छान लिहिलं आहेस रे !