Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Thursday, July 30, 2009

दु चाकी - भाग 8

आप-आपल्या गाडीत पट्रोल भरल्यानंतर सर्वजन ढाब्याच्या दिशेने निघाले. आता मात्र सर्वांनाच सनकुन भुक लागली होती. त्यामुळे काही करुन लवकरात लवकर तेथे पोहचायचे आणि मिळेल त्याचा फडशा पाडायचा असे एकंदर सर्वांच्या चेहर्यावरुनच वाटत्त होते. इनायतचा तर चेहरा शंभरच्या बल्बसारखा तळपत होता, तर तेजस मात्र गुर्हाळाच्या बैलासारखा गाडी रेमटवण्यात मग्ण होता, बहुतेक कोणत्या कोणत्या पदार्थांवर ताव मारायचा या विचारात तो असावा. गणेश आणि दिपकची परीस्तिथी जरा बिकट वाटत होती, ते आत्ताच उपोषणातुन उठलेल्या कार्यकर्त्यांसारखे दिसत होते. तर सुश्यांत मात्र झाल्याप्रकारामुळे थोडासा शांतच बसला होता. महेशला तर कधी एकदा घरी जातोय आणि बिछान्यावर अंग टाकत्तोय अस वाटत होते. त्यात उजव्या हाताच्या तळव्याला लागल्यामुळे त्यास एक्सलेटर देताना बराच त्रास होत होता आणि गुडघाही चांगलाच ठणकत होता. पेट्रोलपंप सोडुन एक पंधरा मिनिटे झाली असतील कि अचानक अज्ञात मारुती कार ने महेशच्या गाडीला उजव्या बाजुने दाबले, हे सर्व इतक्या वेगात घडले की महेशला गाडीच कंट्रोल झाली नाही. काहीसं गांगरुन त्याने पुढचा डिस्क दाबला, ब्रेक इतका अर्जंट होता की बाईकचं पुढचं चाक जागेवरच स्किड झाल व काही कळायच्या आतच दोघेही (सुश्यांत आणि महेश) रस्त्याच्या खाली फेकले गेले. सुदैवाने रस्त्याच्या दोन्ही बाजुला बर्यापैकी गवत होते, दोघेही त्या गवतात जाऊन पडले. महेशला असे पुन्हा पडलेले पाहुन तेजस आणि गणेश दोघांनीही आपल्या गाड्या जागीच थांबवल्या व ते दोघांना उचलण्यासाठी धावले. बाजुनेच गावातील काही महीला पाणी घेऊन जात होत्या त्यांनीही त्यांच्या दिशेने धाव घेतली. महेशच्या डोळ्यांसमोर भर दुपारी काजवे चमकायला लागले. त्याने हळुच आपले हेल्मेट काढले व एक नजर पुन्हा तो स्वतालाच न्याहाळु लागला, तेव्हा त्याला असे आढळले की अर्ध्यातासाभरापुर्वीच हाताला जे बॅंडेज केले होते त्यातुन आता पुन्हा रक्त वहायला लागले होते. तसेच खालचा ओठ दातांखाली चिमटल्यामुळे तोंडातुनही थोडेफार रक्त वाहु लागले. याउलट सुश्यांत ने प्रसंगावधान ओळखुन आधीच उडी घेतल्यामुळे त्याला अजिबात लागले नव्हते. झाला प्रकार तेजसने अगदी जवळुन पाहीला असल्यामुळे तो तावातावात त्या कारवाल्या इसमास शिव्या घालत होता. तेवढ्यात जमलेल्या बायकांपैकी एका मध्यम वयाच्या बाईने महेशला आणि सुश्यांतला आपल्या जवळील पाणी पा़जले व आपुलकीने तीने त्यांची विचारपुस केली. तीचे ते शब्द ऐकुन महेशला निघतानाचे आईचे शब्द आठवले, खरच आपल्या पालकांची मुलं अशी लांब गेलीत की काय विवंचना होत असेल्? या नुसत्या विचारानेच त्याच्या अंगावर शहारा आला. आता कधी एकदा घरी जाउन आईला भेटतोय असं त्याला वाटत होते. तेवढ्यात दुसर्या बाईने गणेशला सांगितले "बाबांनो जरा जपुन गाड्या चालवा. आधीच ह्या रस्त्यावर भरपुर अपघात होतात. कित्येकदा असं तरुन पोरांना विव्हळताना पाहील कि वाईट वाटतं. तरी तुमच नशीब बलवत्तर म्हणुन थोड्यावरच भागलं, जीवाला जपा, आमच्या लेकरासारीचं तुम्ही"

इकडे इनायत ने बाईक उभी करुन साईड स्टॅंडवर लावली व तो महेश जवळ आला, "क्या dude क्या हुआ?" "अरे कुछ नही यार, मै सीधे ही जा रहा था, इतने मै उसने ने पिछेसे आके मुझे अंदर दबा दिया. साला आज नसीबच खराब आहे." महेश दुखर्‍या आवाजात बोलला. यावर सुश्यांत काहीसा चिडक्या आवाजात बोलला, "काही नाही रे तु मगाशी झालेल्या प्रकारामुळे जरा बिथरला होतास व त्याच भीतीमुळे तुला गाडी कंट्रोल नाही झाली", त्याच्या या वक्तव्यावर महेश तशा अवस्थेथ देखील चिडला, "अरे भीती कसली गेल्या दोन वर्षात रो़ज अंधेरीला अप डाऊन करतो तेव्हा साध घसपटल सुद्धा नाही. आणि बहुतेक तु विसरलास, तुझ्ह्या गावी आपण ह्याच रस्त्यावरुन गेलो होतो तेही भर पावसांत. तेव्हा तर सलग तेरा तास गाडी मी एकट्यानेच चालवली होती." महेशला असे चिडलेल पाहुन दिपक पुढे झाला "अरे ठिक आहे. आता एकमेकांची माप काढण्यापेक्षा आपण लवकरात लवकर घरी कसं जाता येईल ते पाहुया." "महेश मला वाटते तुझा टाईम आज जरा वाईट आहे त्यामुळे आपण आता आपल्या जागा बदलुया तुला काही प्रोब्लेम?" गणेश ने विचारले. "नाही यार मला आता ड्राइव्ह करण शक्यच नाही, पण आधी बाईक चालु आहे का ते पहा." ते ऐकुन बाईक जवळ उभ्या असलेल्या तेजसने सांगितले, "गाडी ओके आहे फक्त इंजिनचा जरा वेगळा आवाज येतोय, तो काय सर्व्हिसिंग केलं की होईल व्यवस्थीत." फक्त आता गाडी चालवणार कोण हा यक्ष प्रश्न? अखेर सर्वांच्या संमतीने ही जबाबदारी ईनायतवर सोपवण्यात आली. त्यानेही ही ती जरा आढवेढे घेतच स्वीकारली. तेही रास्तच होतं आधीच एकाच गाडीचा एकाच दिवशी दोनदा अपघात, त्यात ज्या व्यक्तीला pulsar ह्या गाडीविषयी पहील्यापासुनच अनास्था त्याच्यावरच तिला घरपर्यंत नेण्याची जबाबदारी. सारं काही न उलगडनारं. खरचं नियतीने पुढे काय वाढुन ठेवलं असेल ह्याची कुणालाच कल्पणा नव्ह्ती.

थोड्याच वेळात सर्वजण ढाब्यावर पोहचले. ढाबा तसा छोटासाच होता पंरतु नीट नेटका होता. आत मध्ये शिरताच गाड्या उभ्या करण्या-साठी जागा, बाहेर बाकडे मांडलेले आणि जोडीला टिपीकल पंजाबी जेवणाचा वास ह्या सर्व वातावरणात तेजस मुग्ध होऊन गेला. बहुतेक त्याला सर्व गोष्टींचा विसर पडला असावा अगदी महेशला लागलय हे ही. त्याने घाई-घाईत आपली गाडी पार्क केली व महेशला तश्याच अवस्थेत सोडुन तो आणि ईनायत बाकड्यांर पळाले. गणेश मात्र सुश्यांतला आपल्या बरोबर घेऊन आत गेला झाल्या प्रकारामुळे तो जरा बिथरलाच होता. तर ईकडे दिपक महेशजवळ येऊन उभा राहीला "दुखतय का जास्त?" दिपकने विचारले "जाऊ दे रे, त्या दुखन्यापेक्षा त्याच्या बोलण्याने जास्त दुखावलोय मी. असा कसा वागु शकतो तो, अरे मी काय काल परवा गाडी चालवायला शिकलोय? काय तो म्हणे मी घाबरलो अरे असं असत ना तर पहील्यावेळी पडलो ना तेव्हाच गाडी घेतली नसती मी हातात" महेश मोठ्या आवाजात बोलला. यावर सुश्यांतनेही तिकडुन री ओढली "तुझ हे नेहमीचच आहे, जरा तुझा ईगो हर्ट झाला की बसायच ताठुन, कळतय कुणाला राग आलाय तो." "अरे इथे मला इजा झाली आहे आहे आणि तुला कळवळण्याचे कारण नाही. आणि तुझे फाल्त्तु टोमणेही नकोत ह्याच्यापुढे. क्रुपा करुन माझ्या गाडीवर बसु नका म्हणजे मी जो काही पडेल(घाबरुन किंवा चुकुन) तो माझ्या नशीबाने" महेश तावातावात बोलला. "बर झाल सुंठेविना खोकला गेला, नाहीतरी इथे कुणाला हॉस आहे दहा वेळा पडुन घेण्याची". त्याच्या या बोलण्यावर मात्र इनायत काहीसा हसला. हे पाहुन महेशने त्याच्याकडे रागात पाहीले तसा तो गप्प बसला पण सुशांतचा मात्र त्याला मनापासुन राग आला होता. एवढ्यात गणेशने मध्यस्थी केली व तो सुशांतला म्हणाला "पाटील तो काय मजा म्हणुन पडला नाही. एखादा दिवसच खराब असतो त्यात तुझ नशीब बलवत्तर की तुला फक्त खरचटलय त्याला तर लागलं ही आहे. आणि गाडीही दोनदा पडली जरा त्याच्या परिस्तीथीचा विचार करा" यावर मध्येच अपेक्षेप्रमाने तेजस बोलला "जल्ला पक्के लहानपणीचे मित्र शोभतात. आता भांडतील नी उद्या परत एक होतील. खरच ह्यांचा काही नेम नाही" आणी बहुतेकवेळा असच झाल असल्या-मुळे दोघांनीही एकमेकांडे पाहीले व हळुच दोघेही एकमे़कांकडे पाहुन हसायला लागले. हे पाहुन दिपक बोलला "ये हुयी ना बात आता जेवायला हरकत नाही" यावर इनायत म्हणाला "साला जल्दी से मंगाओ, नही तो मै भुक से तडप के मर जांऊगा" तर तेजस मात्र पदार्थांची सुची वाचण्यात दंग झाला होता. ह्या सर्व गोंधळात जेवणाची ऑर्डर घेणारा पोरगा केव्हाचा बाजुला येऊन उभा राहीला होता.

थकलेले असल्यामुळे महेश सोडला तर सर्वांनी जेवणावर येतेच्छ ताव मारला. महेशच्या ओठांना दात लागुन जखम झाली असल्यामुळे त्याने थोडासा डाळ भातच खाने पसंद केले. आलेली मरगळ झटकावी म्हणुन त्याने तोंडावर सोड्याचा प्रयोगही केला तेव्हा कुठे त्याला थोड बर वाटायला लागलं. जेवणानंतर गणेशने जमलेल्या कॉंन्ट्रीब्युशन मधुन खाण्याचे बिल पेड केले आणि सर्वांनी आपला मोर्चा बाजुच्याच पाणपट्टीच्या गादिवर वळवला. गणेश, दिपक आणि इनायत ने पान खाने पसंद केले, तर सुश्या आणि तेजस ने थोटुक पण महेश मात्र दुखर्‍या तोंडामुळे यापैकी कशाचाच आस्वाद घेऊ शकत नव्हता. एव्हढ्यात दिपक म्हणाला "आयला आता इथेच झोपावस वाटतयं". "वाटतय? कशावर? पाट्यावर की मिक्सर मध्ये" तेजस खुश होउन बोलला. "ए हसा रे हसा" दिपक सर्वांना उद्देशुन म्हणाला आणि तेजस सोडला तर सर्वजण मोठ्याने हसायला लागले. "हा यार कंटाळा तर आलाय पण काय करणार संध्या़काळी लक्ष्मी पुजन आहे. कोनत्याही परिस्थीतीत आपल्याला सातच्या आत घरात गेल पाहीजे." गणेश जांभयी देत म्हणाला यावर सर्वजनांनी होकार दर्शवला. "ए मी मात्र आता कुठेही थांबणार नाही. दोन तासात मुंबई ट्च" तेजस तोर्‍यात बोलला. यावर महेश म्हणाला "बाबा सांभळुन. आधीच माझा दिवस खराब आहे आणि ह्याच्या पुढे काही झालं तर माझी सहन करण्याची अजिबात इच्छा नाहीये" (कारण आधीच ठरल्याप्रमाणे महेश त्याच्या मागे बसणार होता). तेवढ्यात सुश्यांत महेशच्या जवळ आला, "sorry यार मगाशी जरा जास्तच बोललो", "अरे कशाला मी काय कमी शेन खाल्ल" महेश बोलला "जाऊ दे विसरुन जा, पण खर सांगु कसलीतरी विलक्षन जाणीव मला गडावर असल्यापासुनच होत होती पण त्याचा उलगडा होत नव्हता, आणि त्यानंतरच हे पडझड सत्र सुरु झालं. जसा एखादा उथळ घोडा आपल्या पाठीवर कोणालाच स्वार होऊ देत नाही तसचं काहीसं माझ्या बाईकच्या बाबतीत घडतय आज." "ए प्लीज, डरा मत तेरी गाडी को मुझे चलाना है वो भी बंम्बईतक. एक तो पहलेसेही ये गाडी मुझे पसंद नही है. साला खाली दिखती अच्छी है लेकिन कब धोका दे इसका गॅरंटी नही" यावर त्याला धीर देत तेजस बोलला "अबे साले तु तो छावा है गाडी चलाने मे" यावर दिपकने ही इनायत गाडी कशी छान चालवतो याची पावती दिली. त्यांचा आपल्याविषयीचा कौतुक समारंभ ऍकुन इनायत शहारला. त्याच्याकडे पाहुन असे वाटत होते की त्याला आता विमान जरी दिले असते तरी तो पायलटच्या सीटवरच बसला असता.


(क्रमशः)

Wednesday, July 29, 2009

खरंच सांग काय वाटते

एक तरुण आहे ज्याला एक मुलगी फार मनापासुन आवडते, दोघांचीही एकमेकांशी नेहमी नजरा-नजर होत असते. न बोलुन दोघेही मनांने भरपुर काही बोलुन जातात. तिच्यासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. तिच्या मोहक रुपाने आणि सोज्वळ स्वभावाने त्याच्या मनाची चलबिचल अवस्था झाली आहे; पण हे सर्व त्याला तिच्या समोर व्यक्त करता येत नाही आहे. त्यामुळेच त्याने तिला काव्यरुपी साद घातली आहे ती अशी -

खरंच सांग काय वाटते
माझ्याकडे पाहुन
तुझ्यासाठी सर्वथा हा
जीव घेतलाय वाहुन

मोत्यावानी खळखळनारं
शुभ्र तुझ हसणं
चंद्राकार भुवया ताणुन
रोखुन माझ्याकडे बघनं

धारोष्ण दुधात न्हाऊन
निघालेले काळेभोर डोळे
जिव्हा तुझी अशी की
जणु गोड मधाचे पोळे

लाजाळुसारख्या झुबकेदार पापण्या
क्षणात चटकन मिटतात
लांबसडक कुंतला तुझ्या
घायाळ मला करतात

सोनचाफ्याच्या कळीसारखे
नाक तुझे नाजुक
लोण्यासही लाज यावी
असे गाल मऊ साजुक

गुलाबाच्या पाकळीसारखे
ओठ तुझे लाल
कमनीय बांधा, मोहक चाल
करते मला हलाल

खरंच सांग काय वाटते
माझ्याकडे पाहुन
तुझ्यासाठी सर्वथा हा
जीव घेतलाय वाहुन.............................!!!!!!


- श्रीमत् ( महेंन्द्र लक्ष्मण कदम)