Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Monday, December 7, 2015

शापित गड भाग १

 
आज शुक्रवार असल्यामुळे कामं तशी कमीच होती. त्यात दुपारचा लंच आज जरा जास्तच हेवी झाल्यामुळे डोळ्यांवर पेंग येत होती. बॉसने आज ऑफ घेतल्यामुळे मीही रीलॅक्स होतो. आजुबाजुला पाहील तर सार ऑफिस आज रिकामी वाटत होतं. मार्केटिंगवाले केव्हाच पसार झाले होते. बाजुला परेराकडे पाहीले तर तोही फेसबुकवर ईमानेइतबारे लागला होता. मी सहजच त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो कोणत्यातरी ट्रेकचे फोटो शेअर करताना दिसला. मी न रहावुन विचारलेच,"अरे परेरा किधर गया था? वो भी ट्रेक के लिये साले ऑफिस की चार मंजीले चढते चढते तेरी फट जाती है. और ये पहाड तु खुद चढ गया? और बिच मे ही ये ट्रेक बिक का भुत कहा से सवार हो गया तेरे सिर पर. साले लास्ट टाईम जब हमारे ऑफिस की पिकनिक माथेरान जा रही थी तब तुनेही कहा था " क्या लोग पागल जैसे जंगलो मे भटकने जाते है. कुछ रिसॉर्ट विसॉर्ट की पिकनिक अरेंन्ज करो थोडी दारु शारु हो जाय तो पिकनिक का मजा है. ये क्या पहाड बिहाड चढना.

यावर परेराने लगेचच प्रतीक्रिया दिली, " अरे यार जाना तो मै भी नही चाहता था पर क्या करु गर्लफ्रेन्ड के ऑफिस का ग्रुप था. उपर से हमारी मॅडम ठान के बैठी तुम्हे आना ही पडेगा. मैने हर तरह से ना जाने के बहाने बनाये. लेकिन अंत मे मुझे जाना ही पडा. हा थोडी तकलीफ हुई चढते उतरते वक्त, पर एक अनोखा कॉन्फिडंस मिला, इन शॉर्ट आय रीअली इंन्जॉयड इट. वो एक दुसरे के साथ डिसीप्लीन मे चलना, कोई पिछे रह गया तो उसके लिये वेट करना, कठनाई वालो रास्तोपे एकदुसरे की मदद करना. और ये सब कश्मकश मे जब तुम चोटी पर पहुंच जाते हो तब एक अनोखा एहसास होने लगता है. कुछ ऐसा सुख मिलता है जो हम शब्दो मै बयान नही कर सकते.

मला काही क्षण आस्था चैनल समोर बसलो आहोत असं वाटु लागलं आणि समोरील व्यक्ती परेरा नसुन परम पुज्य परेराबापु बसले आहेत अस वाटु लागले.
परेरा पुढे बोलु लागला.  "i suggest, you should also plan for a trek, "i assure, it will give you a nice experiance & help you out, to come up with new traits & capabilities that hidden inside you.

मी सहज मस्करीतच परेराला बोलला. "तेरी गर्लफ्रेंन्ड सॉलीड है यार! "अच्छा हुआ उसने माऊंट एव्हरेस्ट का प्लान नही किया." "नही तो मजाक मजाक मे वो भी तु चढ जाता." "वो भी विदाउट ऑक्सीजन." आणि मीच स्वतः फिदीफिदी हसायला लागलो. यावर परेरा फक्त दोनच शब्द बोलला. "पी.जे."

साडे पाच वाजले तसे घाई घाईतच शट डाऊन केलं, बॅग उचलली आणि कलटी मारली. ऑटोने स्टेशन ला जाताना डोक्यात परेराचेच शब्द घोळत होते. मग विचार केला दोन दिवस सुट्टी आहे याव जाऊन कुठेतरी. नाहीतर पेपरमध्ये ट्रेकर्सच्या जाहीराती येत असतातच. जाउया एखाद्या ग्रुप बरोबर. त्यात एखादी मुलगी वैगरे असली तर तेवढाच टाईम पास. पुढे काही जमले तर दुग्धशर्करा योग. विचार करत करतच घरी पोहचलो. आई जेवणात गुंतली होती. तर अन्ना राज्याचा हाल हवाला घेण्यासाठी फेरफटका मारण्यास गेले होते. तसा रिटायरमेंटनंतरचा हा त्यांचा आवडता छंद होता. आईला चहा टाकण्यास सांगुन मी माझ्या रुम मध्ये गेलो आणि माझी जुनी डायरी शोधु लागलो. पण काही केल्या ती मिळेना. इतक्यात आई चहा घेऊन आत आली तेव्हा तिनेच विचारलं, "काय रे काय शोधतोयस? आल्या आल्या? "जरा फ्रेश वैगरे व्हायच तर बसला पसारा काढायला. आधी चहा घे तो म्हणत ती निघुन गेली. माझ काही तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. इतक्यात सोफ्याखालच्या जागेत मला ती अंग चोरुन बसलेली दिसली. मला जोरात "युरेका..."युरेका ओरडावेसे वाटले. पण मी भावनांना आवर घातला. हळुच तिला बाहेर काढले. जराशी धुळ बसली होती ती हातानेच झटकली. आणि पटापटा पाने चाळु लागलो. शेवटी एकदाचा नंबर भेटला. मला मगाशीच ट्रेन मध्ये आठवल होतं की गेल्यावर्षी मी पेपर मधुन एका ट्रेकर्स ग्रुपचा नंबर घेतला होता. पण त्याच्या दुसरयाच दिवशी माझी बाईक स्किड झाल्यामुळे मी ट्रेक ला जाऊ शकलो नव्हतो. त्यात मी एकुलता एक असल्यामुळे आईने धसकाच घेतला होता. त्यांमुळे खबरदारी म्हणुन मी यावेळी तिला काहीच सांगायच नाही असं ठरवले.

चहा पिताच मी डायरीच पान उघडलं आणि पटकन तो नंबर डायल केला परंतु ना रिंग वाजेना ना कसला आवाज. सुरवातीस वाटले बंद झाला असावा बहुतेक पण एक शेवटचा ट्राय करुया म्हणुन पुन्हा डायल केला यावेळेला मात्र समोरुन आवाज आला. ह्या नंबरवरील सेवा अस्थायी वेळेकरीता स्थगित करण्यात आलेली आहे. आता मात्र माझा मुड ऑफ झाला.

मी मोबाईल तसाच बेडवर फेकला आणि फ्रेश व्हायला निघुन गेलो. फ्रेश होता होताच डोक्यात पटकन काहीतरी क्लिक झालं आणि आपल्याला हे पहिलं का नाही सुचल म्हणुन स्वतालाच दोष दिला. मी ओल्या अंगानेच बाहेर आलो. आणि तडक बेडरुम मध्ये घुसलो. पटापट आवरा आवर केली आणि लॅपटॉप ऑन केला, डोंगल कनेक्ट केला आणि गुगल वर एक दिवसात करता येईल अशा ट्रेकची माहीती शोधु लागलो, गुगल नेही इमानेइतबारे बर्यापैकी नावे सुचवली पण त्या सर्वात एक नावं माझ्या डोळ्यासमोर ऊठुन दिसत होतं, "शापित गड" मी स्वताशीच तात्या विंचु सारख तोंड करुन ते नाव पुन्हा उच्चारल "शापित गड" आयला शापित गंधर्व ऐकला होता पण हे गड प्रकरण जरा ईंट्रेस्टींग वाटतय म्हणुन मी त्या लिंकवर क्लिक केलं नेट थोडा स्लो असल्यामुळे बहुतेक साईट ओपण व्हायला वेळ लागत होता. इतक्यात आईने जोरात आवाज दिला," अरे भास्करा केस तरी कोरडे कर आधी, पाणी डोक्यात मुरल तर सर्दी व्हायची लगेच. मी न रहावुन सार्‍या रुमभर नजर फिरवली मनात आलं हीने बिग बॉस सारखे कॅमेरे तर नाही ना बसवलेत माझ्या रुम मध्ये? मला ति काढा घेऊन यायच्या आत टॉवेल घेणं जास्त पर्याप्त वाटलं. मी केस कोरडे करे पर्यंत शापित गडाचा विकीपिडीया समोर खुणावत होतां. वरतीच गडाचा ईतिहास दिला होता तो पुढील प्रमाणे.

हा गड इसवी सन पुर्व १२०० पुर्वीचा असुन याचे काम राजा भ्रमर वर्मा याच्या कारकिर्दीत पुर्ण झाले. तो वेताळाचा मोठा ऊपासक होता. त्याच्या दरबारी नाना प्रकारचे अवलिये होते. त्याने उभ्या आयुष्यात एकही लढाई हरली नाही त्याचं कारण नही तसच रंजक आहे वेताळाला प्रसन्न करुन त्याने पिशाच्यांना आपल्या वश मध्ये केलं होतं आणि ही पिशाच्च राजा साठी वाट्टेल ते करण्यासाठी तयार असतं याचच कारण म्हणजे राजा अजात शत्रु झाला होतां त्याला कोणाचच भय उरल नव्हत. आणि ज्यांनी त्याच्या सिंहासनाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला. त्याच्या वंशासहीत राजाने त्यांना संपवुन टाकलं.राजा पिशाच्चांना प्रसन्न करण्यासाठी दर पित्री आमावस्येला जंगालात निघुन जाई आणि पुर्ण नग्न होऊन वेताळाची उपासना करुन होमकुंडात स्वताला झोकुन देई. त्यामुळे वेताळ त्याला प्रसन्न होऊन सामर्थ्य पुरवत असे. पण सत्तेच्या हव्यासापायी त्याच्या आठव्या राणीने, (राजाच्या जनान खान्यात तीस राण्या होत्या) एका अमावस्येला त्याच्या पुजेत विघ्न आले परिणामी राजा होम कुंडात होरपळुन मेला, पण मरता मरता त्याने आक्रोशाने शाप दिला की ज्या साम्राज्यासाठी तुम्ही हे सर्व केलंत ते तुम्हाला कधीच उपभोगु देणार नाही..............! काळाच्या ओघात सर्व गेलं पण राजा भ्रम्रर वर्मा आजही त्या गडावर वास्तव्य करुन आहे पिशाच्च बनुन.मला थोड्यावेळासाठी मी चांदोबा वाचतोय असं वाटुन गेलं.

गडाच्या पायथ्याशीच एक हरवलं गाव आहे. आयला गावाच नाव पण काय तर हरवलं गावं म्हणजे सापडायची पंचाईत मी स्वताःशीच हसत बोललो. गडावर जायला दोन वाटा आहेत. एक गावातुन जाते तर दुसरी गावाला वळसा मारुन मागच्या जंगलातुन जाते. ते कुप्रसिध्द मंदीरही त्याच वाटेवर आहे.गडावर सध्या बघण्यासाठी राजाच्या वाड्याचे अवषेश पाच पाण्याची तळी आणी उध्वस्त झालेले बुरुज आहेत. आणि एक गुप्त दरवाजा जो राज्याच्या वाड्यातुन सरळ त्या वेताळाच्या मंदीरापाशी निघतो. मला एकंदर हे सगळ प्रकरण गंमतशीर वाटायला लागलं. मी तिथे जाण्यासाठी लागणारी आवश्यक ती माहीती लिहुन घेतली. हरवलं गावाला जाण्यासाठी सरळ कोणतीही बस सेवा नाहीये. तुम्हाला खापरवाडीला जाणारी गाडी पकडावी लागेल. जी तुम्हाला हरवलं फाट्यावर सोडेल तिथुन तुम्ही गावात पाच कि.मी. आत पायी जाऊ शकता अथवा गावातल एखाद स्थानिक वाहन मिळु शकेल. आनि खापरवाडीला सकाळी आणि संध्याकाळी दोनच एसटी जातात व तिथेच अर्धा तास थांबुन परत फिरतात. त्यामुळे संध्याकाळची एस.टी जर चुकली तर दुसर्‍या दिवशी सकाळीच यावं लागेल. गडाच्या पसार्‍याचा मला स्वतालाच समजेल असा मॅप काढला आणि शट डाउन केलं. एव्हाना घडाळ्यात १० वाजले होते. टि.व्ही. वरच्या "आजचा सवालाच्या आवाजामुळे" अण्णा घरी आल्याची वर्दी मिळाली होती. एवढ्यात मातोश्रींनी जेवणाची पानं हॉलमध्ये मांडली. जेवताना सुध्द्दा वर्माचा भुंगा काय डोक्यातुन जात नव्हता. तसा आजच्या विज्ञाननिष्ठ युगात असल्या अमानवीय गोष्टींवर विश्वास ठेवायचा म्हणजे जरा अतीच, परंतु विश्वास पानीपतात मेल्यामुळे नवीन विश्वास ठेवण्यास हरकत नाही, मी मनाशीच आयला आजकाल मी जास्तच पीजे मारायला शिकलोय, साला परेरा बरोबर बोलला दुपारी म्हणत ताटावरुन उठलो. जेवताना आई मात्र संशयित नजरेणे माझ्याकडे पाहात होती. तिला एव्हाना कल्पणा आली होती की बेणं नक्कीच काहीतरी उपदव्याप करायला निघाल असणार तर अण्णा मात्र पुढचा सवाल त्यांनाच विचारणार आहेत या पावित्र्यात बसले होते. मी पटकण ताट उचललं आणि बेसिनकडे धावलो. हात धुतला आणि आईच्या प्रश्नांची उत्तरे टाळण्यासाठी तोंडात मुठभर "बडी" सौफ कोंबली आणि तसाच बेडरुमकडे वळलो.आत गेल्या गेल्या पहिला मामे भाऊ कम मित्र ज्यादा सात्विक उर्फ पंडीतला फोन लावला. सात्विकला पंडीत हे नाव देण्यामागे काही विषेश कारण नाही. लहाणपणी त्याने शाळेतल्या नाटकात भटाचा रोल केला होता. तेव्हा पासुन आम्ही त्याला पंडीत याच नावाने संबोधतो.

"हॅलो...., "हॅलो........., पंडीत.. हा भास्क्या बोल," बोल काय ऐक आता! "तु तुझी कपड्यांची बॅग भरुन तयार रहा. उद्या पहाटे आपण निघतोय! "अरे पण कुठे? इति पंडित. ते तुला काय करायचयं? दादा बोलला ना मग नो प्रश्न नो उत्तर ओके. जशी आपली आज्ञा पण घरी काय सांगु? अरे सांग ना भास्कर बरोबर त्याच्या मित्राच्या गावी चाललोय आणि मी घरी सांगतो मी सात्विक बरोबर चाललोय म्हणुन मी म्हणालो. अरे पण खोट का सांगतोय आपण? पंडीत कळकळीने बोलला. अरे आता खरंखरं सागितल तर आईच्या सतराशे साठ प्रश्नांना उत्तर द्यावी लागतील. तिला वाटतं कि तिचा लेक अजुनही शाळेत जाणारा छबडुच आहे. अजुनही मी ऑफिसला जायला निघालो की, बबडी पास घेतलास? बबडी बाईकची चावी घेतलीस? बबडी बॅगेत एक्ट्रा बिस्कीटं ठेवलीयेत वेळ काढुन खा जरा तब्येत बघ कशी रोडावत चाल्ली आहे ते. हे रोज- रोज ऐकुन शेजारच्या जाधव काकुंच्या पोरी हल्ली माझ्याकडे बघुन फिसफिस करतात नुसत्या असो.... तु तयार रहा, सकाळी ठिक पाच वाजता एस.टी. डेपोत भेट आणि प्लीज लेट करु नकोस. त्याने ओके बॉस म्हणुन फोन ठेवला. स्वारी उंडगायचं म्ह्टल की एकदम खुश. तसे आम्ही लहान पणापासुन एकत्र भरपुर फिरलेलो अगदी शाळेच्या सहली पासुन ते गावच्या यात्रे पर्यंत, भांडलो ही तितकेच पण त्या भांडणातही प्रेम होतं. मी हळुच बेडरुमच्या दरवाजा पर्यंत गेलो. आई किचन मधला पसारा काढत होती तर अण्णा सेट मॅक्स वर "आखरी बदला" बगत बसले होते. मी मुद्दाम एकदिवशी अण्णांना विचारलं होतं अण्णा हा पिच्चर याच चॅनेल वर हफ्त्यातुन एकदा तरी लागतोच आणि तुह्मी ही तो न चुकता बगता. नक्की चॅनेल प्रेक्षकांवर बदला घेतय की एक प्रेक्षक म्हणुन तुम्ही आमच्यावर बदला घेताय. मला अण्णांना " अखेर चॅनेल बदला " असं ओरडुन सांगावस वाटत होतं पणं अर्थात मी ते टाळलं. मी हळुच आईजवळ गेलो आणि तिला सांगितल की मी सात्विक बरोबर त्याच्या मित्राच्या गावी चाललोय इथेच जवळ आहे चार पाच तासाच्या अंतरावर रात्री किंवा परवा सकाळी येइन. हातातलं ग्लास तिने समोरच्या शेल्फ वर ठेवत आधी माझ्याकडे थंड नजरेने पाहिलं आणि नंतर म्हणाली, "अरे पण दोन दिवस सुट्टी आहे तर आराम करायचा कशाला उगाच ऊना तान्हात भटकता. त्यात बाईक नेत असशील तर जायाचं नाही. गेले सहा महीने झाले चांगला फोटो काढं म्हणुन मागे लागली आहे, लग्नासाठी स्थळ येताएत, परवाच साठे काकु त्यांच्या गौरी साठी विचारत होत्या? पण ऐकशील तर तु भास्कर कसला? हा एक गुण मात्र तु आपल्या बापाकडुन आयता उचलायस आई अण्णांना ऐकु जाईल अश्या आवाजात बोलली. आई हे बघ मी उद्या चाललोय तेही ए.सटीने, पण परवा आलो की मी नक्की तुला आवडेल त्या पोझ मध्ये फोटो काढेनं प्रॉमीस. सोशल साईटस आणि स्मार्ट फोनच्या जमान्यात या माऊलीची मी फोटो काढुन घेण्यासाठी चाललेली तगमग पाहुन तिच्या भाबड्या प्रेमाचे कौतुक वाटलं. मी तडक तिथुन माझ्या रुममध्ये आलो. हळुच दरवाजा लावला आणि बॅग आवरायला घेतली. मॅन वर्सेस वाईल्ड मधल्या बिअर ग्रिल चा माझ्यावर विषेश प्रभाव असल्यामुळे मी त्याचासारखेच कपडे, शुज, टॉर्च आणि चाकु ऑनलाईन खरेदी केला होता. कपडे घालण्यासाठी हुकस्टॅंड ला अडकवले तर पाण्याची बाटली व ईतर साहीत्य बॅग मध्ये भरलं. आता झोप काही येत नव्हती म्हणुन मी तसाच गादीवर आडवा झालो. इतक्यात पंडीतचा व्हॉट्स ऍप वर मेसेज आला. गुड नाईट स्लीप टाईट, डेपोत भेटु ऑल राईट. मी उग्र स्माईली बरोबर एक ठोसा पाठवुन त्याला झोपवला. आणि भ्रमर वर्मा चा विचार करत स्वताही झोपी गेलो.

सकाळ असल्यामुळे स्टॅंडवर जरा कमीच गर्दी होती. डेपोत मिळुन चार पाच गाड्या उभ्या होत्या त्यातल्या तीन साध्या लाल डब्बा तर एक एशियाड बस होती. डेपोच्या डाव्या बाजुलाच फलाट नं एक व दोन ला लागुनच एक भली मोठी मुतारी आहे तर फलाट क्र. तेरा ला लागुन असलेल्या टी स्टॉल वरुन छान ऊकळत्या चहाचा सुगंध येत होता. काही लोक वाफाळत्या चहाचा कप हातात घेऊन "चाय पे चर्चा" झाडत होते तर खाकी वर्दीतल्या चालक आणि वाहकांची नियंत्रन कक्षात लगबग चालु होती. बाजुच्याच बाकड्यावर एक भिकारी हात पाय टाकुन अस्ताव्यस्त पसरला होता. तर त्याच्याच बाजुला एक अर्धा सफेद अर्धा राखाडी रंगाचा कुत्रा जीभ बाहेर व पुढचे पाय ताठ ठेऊन मागच्या पायावर शेपटी हालवत बसला होता. स्टॅंडच्या मधोमध एक पेपरवाला पेपरचे गठ्ठे सोडवुन व्यवस्थित लावत होता. इतक्यात गाडी नंबर एम एच ०४- ८०८५ मुंबई सेंन्ट्रल ते सातारा व्हाया मेगा हायवे फलाट क्र. ३ वरुन निघत आहे अशी घोषना झाली. तशी त्या गाडीच्या कंडक्टर ने जोरात शिटी मारली. गाडी सुटेल या भितीने एक दोघे प्रवासी बाजुच्याच शौचालयातुन चैन लावत पळतच बाहेर आले व त्यांनी चालकाला हात दाखवत गाडीत उड्या टाकल्या तसा कंडक्टर ने गाडीचा दरवाजा धाडकनं आदळून घेतला. गाडी धुरळा उडवत समोरच्या गेटमधुन डेपोच्या बाहेर पडली. पंडीत अजुनही आला नव्हता. साल्याचा फोन सुद्धा लागेना. इतक्यात मागुन भास्क्या ए भास्कर...असा आवाज देत तोच माझ्या जवळ आला. कुठे होतास रे इतका वेळ मी विचारलं. यावर तो म्हणाला मी वेळेवरच आलोय फक्त मागच्या गेटवर ऊभा होतो...............


"ठिक आहे चल आता आपल्याला लवकर निघाल पाहिजे," एव्हाना साडेपाच वाजले होते. मी आणि पंडीत चौकशी कक्षा समोर गेलो आणि खापरवाडीला जाणारया एस. टी ची विचारणा केली असता. गाडी फलाट नंबर अकरा वर लागेल असं सागण्यात आलं आम्ही तडक आमचा मोर्चा तिकडे वळवला. एव्हाना गाडी तिथे येऊन रिव्हर्स गिअर मध्ये फलाटावर लागत होती. गाडीच्या एकंदर अवतारावरुन ही पोचणार की पोचवणार अशा व्दिधा मनस्थीतीत मी अडकलो होतो.

पुढच्या चारच तासात आम्ही हरवल गावाच्या फाट्यावर "जिवंत" उभे होतो. एक दोन आचके तर एवढे जोरात बसले होते की आता आपले विस्कटलेले अवयव बहुतेक गोळा करुनच न्यावे लागणार असं वाटुन गेलं, मनात आलं हा जो कोणी ड्राईव्हर होता त्याला एस.टी महामंडळाने जर फॉर्म्युला वन मध्ये उतरवला तर "वेटल आणि शुमाकर" वर एस.टी चालवयची पाळी यायची. घड्याळात सळाळचे साडे नऊ वाजले होते. आम्ही जेथे उतरलो तिथे तीन रस्ते एकत्र आले होते त्यापैकी एक सरळ खापरवाडीला तर एक त्याच्याच बाजुने नागमोडी वळन घेऊन पुढे गेला होता. तर उजव्या बाजुचा काळवंडलेला बोर्ड आमचं लक्ष वेधुन घेत होता. शापित गडाच्या दिशेने दिशा दर्शक बाण दाखवला होता त्या बाणाच्या मध्येच कोणी तरी ह्रुदय काढुन वर ईंग्रजी बी आणि खाली ए लिहील होतं.च्यायला कोणाची क्रिएटिवीटी कुठे फळफळेल आणि एखाद्याच्या प्रेमाला कुठे पुर येईल सांगणे कठीण. मी पंडीतकडे नजर मारली स्वारीच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह आणि पोटात कावळे ओरडत असावेत असा मी अंदाज बांधला आणि मी काही बोलायच्या आतच, " ए भास्क्या दोन घास खाल्याशिवाय मजा नाही लेका तुझा माऊंट शापित चढायला इति पंडीत, "थांब रे हरवल गाव येईलच ईतक्यात मग खाऊ काहीतरी मी म्हणालो".
घड्याळात एव्हाना पाउने दहा वाजत आले होते. गेल्या पंधरा मिनिटांच्या चालीत ना एखादं वाहन ना एखादी व्यक्ती आमच्या नजरेस पडली होती. रस्ता म्हणजे तशी कच्ची सडकच होती लाल मातीची. दुतर्फा झाडं आणि किर्रर्र शांतता आमची पायपीट चालु असतानाच मागुन एक फटफटी कर्कश आवाज करत आमच्या पर्यंत आली, "काय रे ए पोरहो कुणीकड चाल्ला? पांढरा सदरा लेंगा आणि त्यावर तशीच मॅचिंग गांधी टोपी घातलेला माणुस आमच्याकडे रोखुन बोलला. वर्ण काळा असला तरी चेहरा तरतरीत मिश्या पिळलेल्या आणि कपाळावर गुलालाची रेघ एकुन व्यक्तीमत्व एकदम ठसठशीत त्यात बुलेट ही तशीच, हेडलाईटवर रेडियम मे काढलेले डोळे दोन्ही हॅंडलला लावलेले झुबकेदार झालर आणि मागच्या मडगार्डला लावलेल्या काळ्या रब्बरवर राम राम पाव्हनं असं ठळक अक्षरात लिहंल होतं. एकदंर ती बुलेट त्या माणसाला जास्त शोभुन दिसत होती.

"गाववाले जरा हरवलं गावाकडे चाल्लो होतो सोडाल कायं? "मी विचारल, "अहो त्यात इच्यारायचं काय, बसा ना मागं. गडावर चाल्लाय व्हय? इति मि. फटफटी. आम्ही एकसुरात होय म्हटलं, आणि पाठीवरच्या बॅगा सावरत त्यांच्या मागे बसलो. मध्ये पंडीत आणि मागे मी. एव्हाना त्यांनीच बोलायला सुरवात केली, "चांगला योग काढलाय म्हणायचा तुम्ही, कसला योग? इति पंडीत. म्हणजे काय आहे आज? "आव आजच तर पित्री आमावस्या आहे. आचच्याच दिशी त्या राजानं येताळाला प्रसन्न केलं होतं. आंम्ही कोन वर गडावर न्हाय जात पण गावच्या येशीवरच्या मंदीरातच त्याची पुजा करतो. असं म्हणतात रातच्याला एका ठराविक येळी गडावर कसल्यातरी शक्तींचा वावर असतोय, आमच्या गावचा भगत सांगतोय बगा, आता त्या चांगल्या हायती कि वाईट ह्ये तो वेताळच जाणो. बाकी तसल काय बी भ्या वाटायच कारण न्हाय फकस्त सांजच्याला येळवर खाली उतरा म्हणजी झालं. नाहीतर गेल्या येळला अशीच बाहीरच्या देशातन दोन माणस आली व्हती, काय ते सर्वे का काय म्हणत्यात तो कराया पण वर गेली ते पुन्यांदा काय खाली आलीच न्हाईत. कुणी म्हणत त्या रात्री गडावरणं कसले-कसले भयंकर आवाज येत व्हते, म्हणुन ते घाबरुन पळाले असतील. आमच्या ठाकर वाडीतला भिवा डुकराचे फासे लावायला वर डोंगरात गेला असता त्याला त्यांच समद सामान मिळाल. त्यानंतर पण अदनं-मदनं तुमच्यासारखी तरणीबांड पोर येत असत्यातच. ह्ये रानोमाळ नि फुटकं अवषेश धुंडाळुन त्यास्नी काय मिळत ह्ये त्यासनीच ठाऊक. त्याच्या ह्या बडबडीत आम्ही गावाच्या आत एका टपरीवर येऊन पोचलो. तिथे पोचताच आम्ही त्याच्या बुलेटवरुन पायऊतार झालो व तिथपर्यंत सोडल्याबद्दल त्याचे आभार मानले तसे त्याने कसल्यातरी पक्षाचे एक कार्ड आमच्यापुढे केले त्याचावर लिहले होते "दादोसा पाटील" शाखा अध्यक्ष- हरवल गावं. आम्ही ते कार्ड हातात घेताच त्याने टपरीवरच्या पोर्याला आवाज दिला, "पुंडलिक.. ए..पुंडलिक...! "पावण्यासनी फक्कड च्या आणि नाष्टा दे बघु आणि हो तुमच खाऊन झालं की टपरीच्या मागुन वरच्या अंगाला सरळ बाहेर पडलात की गडाची पायवाट लागते त्याच वाटेवर ठाकरवाडी बी हाय. तिथ गेलात तर मगाशी मी जे नाव सांगितल ना भिवा म्हणुन त्याच घर ईचारा पोरगं शे-दोनधे घील पण तुमासनी गडावर यवस्थीत पोचवलं. एवढ बोलुन त्याने बुलेट ला किक मारली त्याची गाडी पण त्याच्या सारखीच फट..फट..फट..फट..फट..फट करीत डोळ्यासमोरुन नाहीशी झाली.

टपरी तशी साधीच होती. टपरीच्या बाहेरच दोन लाकडी बाक आडवे मांडले होते तर समोरच्या आडव्या फळीवरच काचेच्या भरण्या वेगवेगळे जिन्नस भरुन ओळीत मांड्ल्या होत्या. त्यांच्या पत्र्याच्या झाकणांवरुनच त्या किती जुन्या आहेत याची साक्ष मिळत होती. टपरीच्या मागेच वडाचं विस्तीर्ण झाड त्याच्या पारंब्या सांभाळत डौलात उभे होते. त्याच्या भोवतीच गावातली काही जुनी खोड तंबाखु मळत बार भरत होती. आजुबाजुलाच कौलारु घरे दाटीवाटीने एकमेकांना खेटुन उभी होती तर काही कौलांवर डिश टिव्हींच्या छत्र्या मशरुम सारख्या डोक वर काढुन बघत असल्याचा भास होत होता. माझ निरिक्षण चालु असतानाच पुंडलिक गरमागरम मिसळ घेऊन आला. मटकीचा तांबडा रस्सा त्यात खरबुडी चिवडा आणि त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि सोबतीला लिंबु. अशा एखाद्दा टपरीवर अस्सल गावरान चव चाखायला मिळेल अस आम्हा दोघांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. पुढची दहा मिनिटे आम्ही हा..हुं.. करत नाकाच पानी पुसत पुंडलिकाच्या मिसळीत पार बुडुन गेलो होतो.
मगाशी दादोसा ने सांगितल्या प्रमाणे आम्ही गाईड घ्यायचा ठरवला. शेदोनशे साठी कशाला उगाच रिस्क घ्या. त्यात गडाविषयी एवढ्या आख्यायिका ऐकल्या नंतर नाही म्हटल तरी आमची जरा पाचावर धारण बसली होतीच. पंडीत तर परत जाण्याच्याच मुड मध्ये दिसत होता. टपरीच्या मागच्या बाजुने सरळ चालत आम्ही गावापासुन थोडे पुढे आलो. मधेच चार- पाच पोर रबरी टायरला लाकडाच्या दांड्याने फटके मारत आमच्याकडे बघत निघुन गेली. तर आमच्या उजव्या बाजुनेच पाच-सहा म्हशी गळ्यातल्या घंटा वाजवत शहाण्या बाळासारख्या एका ओळीने विरुध्द दिशेने चालल्या होत्या. त्यांनी टाकलेल्या शेणांचे डोंगर चुकवत-चुकवत आम्ही ठाकर वाडीत येऊन पोचलो. ठाकर वाडी गावापासुन वर थोड्या ऊंचावर डोंगरातल्याच एका टेकडीवर वसलेली होती. मिळुन दहा-बाराच झोपड्या असतील. शेणाने-मातीने सारवलेल्या भिंती आणि वर गवताची झापं.

भिवाचं घर म्हणजे खोपट वजा झोपडीच होती. बाहेरच कोणी तरी म्हातारा माणुस ओल्या बांबुची चिपाड सोलुन टोपली वळत बसला होता. आम्ही त्याला विचारल भिवा तर खुणेनेच त्याने आम्हाला आत मध्ये जायला सांगितल. आम्ही आत जात असतानाच दोन कोंबड्या आमच्या पायातन जोरात पळत बाहेर गेल्या. आतमध्ये एक तरुण वळकटी मारुन आडवा झोपला होता तर त्याच्याच वयाची एक पोरसवदा मुलगी हातातल्या फुंकणीने फुक मारुन चुलीत जाळ करत होती. भिवा आहे का घरात, आम्ही दारातनच विचारल. कोण...हाय? तसा काळा सावळा पण काटक भिवा किलकिले डोळे करुन बाहेर आला. काय काम हाय जी? त्याने हळु आवाजात विचारल तस मी त्याला आमचा गडावर जाण्याचा बेत सांगितला. थोडेसे आढेवेढे घेतल्यानंतर तो तीनशे रुपयात आमच्याबरोबर वर यायला तयार झाला. त्याने आवाजानेच त्या मुलीला पाणी आणायला सांगितले. तशी ती काहीशा मंद चालीने दोन ग्लास घेऊन बाहेर आली. तिने वर चोळी आणि गुडघ्यापर्यंत पातळ नेसले होते व त्याचा पदर कमरेभवती गुंडाळला होता. एव्हाना भिवा तयार होऊन बाहेर आला. डोक्याला मुंडासे एका हातात कापडी पिशवी आणि कमरेला कोयता बांधुन अनवानीच तो आमच्याबरोबर येणार होता.

आम्ही निघणार इतक्यात मगापासुन गप्प बसलेला माणुस आमच्या दिशेने बघुन आक्रस्ताळेपणाने हातवारे करु लागला. एकंदर त्याच्या खुणांवरुन तो भिवाला आमच्या बरोबर जाऊच नको असं सांगत होता असच प्रथमदर्शी तरी वाटत होतं. त्याबद्दल भिवाला विचारल असता तो माणुस त्याचा बाप होता अस समजलं आणि त्याची हि अवस्था पुर्वी पासुन अशी नसुन काहीच दिवसापासुन झाली आहे अस समजलं. दोनच हप्त्यांपुर्वी तो डुकराच्या पारधीसाठी वरच्या जंगलात गेला असता त्या रात्री शिकार तर काय घावली नाही. पण तो जे परत आला तेच मुळी घामाघुम होऊन. जणु त्याने काहीतरी पाहिल असावं आणि भितीने त्याचा जो आवाज बसलाय ते आज पंधरावीस दिवस झाले तरी त्याला स्पष्ट बोलता येत नाही नुसता ईशार्‍यानेच काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. मधीच वरच्या जंगलाकडे हात दाखवतो आणि डोळे मोठे करुन उर बडवायला सुरवात करतो.

आता पंडीतने न राहावुन भिवाला विचारलच "भिवा वर काही वाईट गोष्टी तर नाहीत ना?
यावर भिवा म्हणाला, ''साहेब मी इथच ल्हानाचा मोठा झालो''. हा आता एखांद्याबारी वरच्या जंगलातन कसलं-कसलं आवाज येत्यात पण वर जनावर बी लई माजल्यात आणि आपण "येखादी गोष्ट येळत केली तर वाईट येळ तरी कशापाई येतीया". तसा भर दिसा भरपुर येळला मी गडावर फिरलुया, वर समदीकडे पडकं वाडे हायती. त्यातलाच येक मोठा वाडा आजबी जरा बर्या कंडिक्शन मधी हाये. भिवाच्या तोंडी मिंग्लिश शब्द ऐकुन मी आणि पंडीत जरासे हसलो व पुढे ऐकु लागलो. भिवाच्या मते त्याच वाड्यात एक गुप्त दरवाजा आहे. अस म्हणतात कि त्यातुन आत गेल की एक भुयार लागत जिथुन सरळ खालच्या वेताळाच्या मंदीरापर्यंत जाता येतय. वाड्याच्या समोरच एक उभा दगड आणि तळं असुन तळ्याच्या मागेच एक विचित्र झाड आहे. "मग तु कधी गेलास का त्या दरवाज्यातनं? पंडीतने खोचकपणे भिवाला विचारल. "न्हायबा, "आपल्या बाच्यान बी असलं धाडस व्हायच नाय, एक दोन बारी आसंच वाकुन बघितल त्या वाड्यात तर नुसत्या काळोखानंच भिती वाटली. आत जायचं तर लांबच राहीलं, उगाच ईषाची परीक्षा कशापाई? आणि आमचा भगत म्हणुतय त्या परमानं वर त्या वाड्यात भुताटकी हाय. आता मानला तर देव नायतर दगुडच, आणि जर देव मानताय तर भुताटकी बी असणारच की कारण दोन्हीबी गोष्टी दिसत न्हाईत पण त्यांच्या असण्याची जाणीव होती की न्हाय? भिवाच्या या उत्तराने आम्ही चिडीचुप होऊन पुढे ऐकु लागलो. आता बघा गेल्या येळला ती कोन गोरी माणस आली व्हती. आमच्या दादोसा ने सांगितल होतं कोनाला तरी वर घेऊन जा आणि सांच्याला माघारी फिरा पण ऐकली न्हाईत. ते जे वर गेले ते खाली आलेले कुणाला दिसलेच नाय. हा चार-पाच दिसांनी त्यांच सामान मात्र घावलं मला. ते केलं जमा पोलीस पाटलाकडे. हप्त्याभरानंतर अजुन तसलीच माणसं आली व्हती पोलीस घेऊन. समद शोधल पण काहीच पत्या नाय लागला बिचार्‍यांचा.

पुढे भिवा मधे पंडीत आणि मागे मी, उन आता बरयापैकी वर चढल होतं मधुन नागमोडी वाट आनि दुतर्फा जंगल. काही ठिकाणी तर भर दुपारी पण झांडाच्या शांत सावलीमुळे किर्रर्र काळोख पडला होता. पंडीत चालता चालता फोटो काढण्यात मग्न होता. पण माझ मन मात्र आजुबाजुच्या गुढ वातावरणात गुंतत चालल होतं. मगाशी भिवाच घर सोडल्यापासुन सतत कोणी तरी आमच्यावर नजर ठेऊन आहे अस वाटत होतं. मागे वळुन पाहील तर कोणीच नाही. एक दोनदा तर गवतातुन चालताना सळसळही जाणवली. बहुतेक माझा भास असावा. अर्ध्या पाऊन तासाने आम्ही एका अरुंद टेकडीवर येऊन पोचलो. भर उन्हातल्या तंगड तोडी मुळे मगाशी खाल्लेली मिसळ केव्हाच पचली होती. आम्ही जरा विश्रांती घेण्यासाठी थांबलो. आता वरुन उंचीवरुन हरवल गाव लगेचच नजरेला सापडत होतं. आमच्या डाव्या बाजुलाच आम्ही ज्या वाटेने आलो ती वाट नागासारखी वळणे घेत खालीपर्यंत गेली होती. सुर्य आता पश्चिमेकडे कलल्यामुळे आम्ही उभे असलेल्या भागावर छान सावली पडली होती. थोडी ग्लुकोझ बिस्कीटे आणि पाणि रिचवल्यावर आम्ही पुढच्या चढाईसाठी मार्गस्थ झालो. पुढच वळण घेऊन जी चढणीची वाट लागली त्या वाटेवर आमचीपण चांगलीच वाट लागली. माझ्या आतमध्ये जो बिअर ग्रिल काल रात्री पासुन संचारला होता तोही आता थंडावला होता. तर पंडीत चालतोय की रांगतोय तेच कळत नव्हतं भिवा मात्र आत्ताच आंघोळ करुन आल्यासारखा फ्रेश दिसत होता तर आमचे चेहरे मात्र जत्रेत हरवलेल्या पोरांसारखे केविलवाणे दिसत होते. भिवाचं काटक शरीर आणि स्फुर्ती पाहुन खरच हेवा वाटला.

या सर्व दमखमीत एक गोष्ट पुन्हा प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सतत कोणी तरी आमचा पाठलाग करतय असा भास मला होत होता. एक दोन प्रसंगी तर मला शु....क्क, शु...क्क्क, असा ही आवाज आला. पण हा नक्की भास आहे की खरच कोणीतरी आपल्यावर पाळत ठेऊन आहे? या विचाराक्षनीच माझ्या अंगावर सर्रर्रकन काटा आला. पण दुसरयाच क्षणाला मी सावध झालो. काय साला आपण पण, आता जंगलातुन फिरतोय तर काड्याकुड्यांचा आवाज हा येणारच त्यात इतक घाबरण्यासारख काही नाही. बहुतेक ह्या दादोसा आणि भिवाच्या गोष्टी ऐकुन आपण जरा जास्तच सतर्क झालो आहोत.

अडीच तीन तासांच्या अथक परिश्रमांनंतर अखेरीस आम्ही गडावर येऊन पोहचलो. वर आल्या आल्या एक विचित्र गोष्ट आम्हाला जाणवली ती म्हणजे. सर्व रस्त्यात जाणवणारा आमचा उत्साहच एकदम गायब झाला होता. वारा पण एकदम पडल्यामुळे अंगभर घामाच्या धारा लागल्या होत्या. अचानक एकदम नकारात्मक विचार डोक्यात डोकाऊ लागले. पंडीत तर उगाचच इकडे आलो या विचारापर्यंत आला होता. अर्थात मलाही तसच वाटत होतं पण जर सेनापतीच खचला तर कस होणार? म्हणुन चेहरयावर खोट हसु आणुन मी वातावरण हलक करण्याचा प्रयत्न करत होतो. माझ्या हातातील कंपास प्रमाने आम्ही गडाच्या उत्तर दिशेला उभे होतो व आमच्या समोरच गडाचा भव्य प्रवेशद्वार आमचं स्वागत करत होतं. शिरस्त्याप्रमाणे इथेही पंडीत ने आपली फोटोग्राफिची हौस फिटवुन घेतली. व आम्ही आतमध्ये मार्गस्थ झालो.

दुपारच रखरखीत ऊन चोहो बाजुंनी किरणांचा मारा करत होत. तश्यातच मी माझ्या बॅगेतला गडाचा मॅप काढला. मॅप प्रमाने जिथे आम्ही उभे होतो. त्या दरवाजापासुनच काही अंतरावर पाण्याची दोन तळी समोरासमोर शांत पहुडली होती. आणि मधुनच एक वाट सरळ थोड्या चढनीने वरच्या दिशेन जात होती. त्या चढावरच एक भग्न कोठी अखेरचे दिवस मोजत उभी असलेली दिसली. तर ठिकठिकाणी ऊंचच ऊंच गवत माजलेले दिसत होते. गडाच्या चहु बाजुने तटबंदी असुन काही ठिकाणी ती शाबुत असुन काही ठिकाणी भरपुर पडझड झालेली होती.तटबंदीवर जाण्यासाठी ठिक ठिकाणी पायरयाची व्यवस्था होती. गडाचे बुरुजही अखेरच्या घटका मोजत असताना दिसले. मधल्या वाटेनेच त्या कोठी पासुन जरा पुढे गेल्यावर पुन्हा दोन पाण्याची छोटी टाकी लागली पैकी एकातील पाणी पिण्याइतपत स्वछ दिसत होतं आम्ही आमच्या वॉटर बॉटल भरुन घेतल्या जरा फ्रेश झालो आणि पुन्हा पुढे चालु लागलो. मॅप मध्ये काढल्याप्रमाणे आमच्या सर्व गोष्टी बघुन होत आल्या होत्या. आता फक्त तो वाडा त्यातला तो गुप्त दरवाजा आणि सभोवतालचा परीसर बघायचा राहीला होता. आम्ही वाढलेल्या गवतातुन मार्ग काढत असतानाच अचानक कसला तरी किंचाळण्याचा विचित्र आवाज आला. आम्ही मागे वळुन बघे पर्यंत भिवा विजेच्या चपळाईने दोन तीन उड्यातच आमच्यासमोरुन नाहीसा झाला. भिवा तिथुन जाताक्षणीच एक गुढ शांतता तिथे पसरली. आता फक्त हलणारया गवताची सळसळ आणि आमचे फुललेले श्वासच आम्हाला ऐकु येत होते.

No comments: