Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Wednesday, October 21, 2015

दाभोळकरांची हत्या?.........



२० ऑगष्ट २०१३ हा दिवस यापुढे इतिहासात नक्कीच काळा दिवस म्हणुन ओळखला जाईल. कारण याच दिवशी दाभोळकरांची अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या घालुन हत्या केली. समाजातील अनिष्ट रुढी आणि परंपरांविरुद्ध लढणारा अजुन एक आवाज बेमालुमपणे शांत करण्यात आला आणि त्यानंतर लगेचच पुढील घडामोडींना ऊत यायला लागला. सर्वात प्रथम सरकार खडबडुन जागे झालं आ्णि जादु टोणा विरोधी बिल संसदेत पास करुन धेण्यासाठी गडबड सुरु झाली. खुणाच्या आरोपांवरुन वेगवेगळ्या धर्मसंस्थावर आरोप प्रत्यारोप व्ह्ययला लागले.निरनिराळ्या ठिकाणी आंदोलणे, मुक मोर्चे आणि काळ्या फिती लावुन निषेध व्यक्त केला गेला.राष्टीय-आंतराष्टीय वाहिण्यांवरही या बातमीचा व्यवस्थित प्रसार केला गेला. फेसबुक, ट्विटरवर तरुनाईचे ज्वलंत स्टेस्टस अपलोड होऊ लागले. व्रुत्तपत्रांमधील एक कॉलम फक्त याच बातमी साठी आरक्षित होऊ लागला.प्रत्येकजण  डॉक्टरांचे कार्य कसे मानवतावादी होते आणि डॉक्टर आयुष्यभर या कार्यासाठी किती पोटतिडकीने झटले हे आपआपल्यापरीने मांडु लागला.आता हे सर्व घडत असताना आपले लिंबु टिंबु राजकीय पक्ष तरी का मागे रहावेत? तेही मग डॉक्टरांच्या मारेकरयांना शिक्षा झालीच पाहीजे अशा आरोळ्या ठोकत आपआपल्या पोळ्या भाजु लागले.पण या सर्वांचा फायदा काय? “बैल गेला आणि झोपा केला” अशी एक प्रचलीत म्हण आहे. आज हा सर्व गदारोळ माजण्यासाठी खरचं डॉक्टरांच जाणं गरजेच होतं का?
मुळात भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातच हे ठळक शब्दात नमुद केलेलं आहे की.
”आम्ही भारतीय जनता, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक (लोकशाही) गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना न्याय (सामाजिक, आर्थिक आणि राजकीय), स्वातंत्र्य (विचार, उच्चार, श्रध्दा, धर्म आणि उपासना), समता (दर्जा आणि संधीबाबत), बंधुता (व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकात्मता आणि अखंडता राखणारी) यांची शाश्वती देण्याचे विचारपुर्वक ठरवीत आहोत. आणि हि घटना आमच्यासाठी तयार मान्य स्वीक्रुत करीत आहोत”.

 म्हणजेच आपल्या राष्ट्रात धर्म ही व्यक्तीची खाजगी वा एच्छिक बाब असुन प्रत्येकाला स्वेच्छेनुसार कोणत्याही धर्माचा अवलंब करता येईल. मात्र सार्वजनिक बाबतीत धर्माची ढवळाढवळ खपवुन घेतली जाणार नाही.
परंतु खेदाची बाब ही आहे की एवढ सर्व असुनही रोज सकाळी व्रुत्तपत्र उघडल अथवा एखादी व्रुत्तवाहीनी लावली तर पुढील बातम्या वाचायला अथवा पाहायला मिळतात.
१)   अमुक एका गावात गुप्तधनासाठी चिमुरड्याचा बळी.
२)   रोग बरा करतो सांगुन मांत्रिकानेच केला विवाहीतेवर बलात्कार.
३)   परम पुज्य बाबांवर त्यांच्याच आश्रमातील महीलांचा लैंगिक शोषणाचा आरोप.
४)   रक्कम दुप्पट करुन दाखवतो म्हणुन घेतलेली मुद्दल घेऊन बाबा पसार.
५)   अमुक एका मंदीरातील मुर्तीची अद्न्यात व्यक्तींकडुन विटंबणा.
६)   कुंभमेळ्यात/ तीर्थयात्रेला गेलेल्या भावीकांचा चेंगराचेंगरीत म्रुत्यु.
७)   अमरनाथ यात्रेकरुंवर दहशतवाद्यांचा आतंकवादी हल्ला.
८)   आणि हल्लीच केदारेश्वर येथे ढगफुटी व जमीन खचल्यामुळे हजारो भाविक ठार.

अशा उदाहरणादाखल देण्यालायक अनेक बातम्या आहेत. तरीही प्रत्येक बाबतीत ठिकाण आणि देव वेगळा असला तरी मरणारा अथवा फसणारा भाविकच असतो याच कारण नक्की काय?
आज प्रत्येकालाच झटपट श्रीमंत व्ह्यायचय, नाव कमवायचय, प्रसिध्दिच्या झोतातं यायचयं आणि यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी त्यांच्यात आहे.आणि याच मोहापायी लोक नाना तर्हेच्या अंधश्रध्देला बळी जातात.आणि याचाच फायदा समाजातील काही धुर्त लोक हेतुपरस्पर घेऊन स्वतःच उखळ पांढर करतात. आज आपली अर्थ व्यवस्था एका वेगळ्याच टप्यातुन जात आहे.रुपयाचा भावं तर  ई.सी.जी. सारखा वळवळत आहे जीवनोपयोगी वस्तुंचे भाव गगणाला भिडत असताना  या स्वघोषित बाबा बुवांचा आणि त्यांनी चालवलेल्या तीर्थक्षेत्रांचा धंदा मात्र तेजीत आहे.कारण आजही ठरलेल्या वाराला त्या त्या ठिकाणी (तीर्थक्षेत्र) तेवढीच गर्दी होते. बहुतांशी ही गर्दी दिवसेंगनिक वाढतच जात आहे. कारण काय तर तो देव नवसाला पावतो किंवा तिथल्या बाबांच्या अथवा माताजींच्या हाताने गुण येतो.एरव्ही भाज्यांचे भाव वाढले म्हणुन रडणारा सामान्य माणुस बिशी किंवा फंडातले पैसे तोडुन सहकुटंब सहपरिवार दर्शनासाठी येतो आणि त्याच्याच मेहनीतीचा, घामाचा पैसा तिथल्या दान पेट्यांमध्ये टाकतो का तर म्हणे पुण्य मिळते. आपण नेहमी एकतो अमुक देवाला अज्ञात इसमाकडुन तमुक किलोचा रत्नजडीत हार अर्पण.मग मुळात प्रश्न हा आहे की हा इसम जर किलो किलोने देवाला देवु शकतो तर वास्तविक त्याच्याजवळ किती संपत्ती असली पाहीजे. आणि मुळात त्याने ती कशी मिळवली म्हणजे नैतिकतेला धरुन की सामाजिक नितीमुल्यांचं अवमापण करुण आणि तरीही देव त्यालाच पावतो? आणि इथे बिचारा आमचा शेतकरी वर्षभर इमाने इतबारे घाम गाळतो तरीही वर्षाअखेर त्याच्या डोळ्यात पाणी आणि गळ्यात फासं मग हा भेदभाव का?
आजकाल आपण पाहतो नियम धाब्यावर बसवुन ठिक ठिकाणी देवांची मंदीरे बांधली जातात मग त्यांनाच प्रति शिर्डी, प्रति बालाजी तर अगदी प्रति काशी अशी मोठाली नावे दिली जातात. (आपलं नशीब बलवत्तर अजुन ह्यांनी प्रतिस्रुष्टी निर्माण करायचा बेत नाही आखलाय) मग पुन्हा खेळ सुरु होतो पैशांचा आणि अंधश्रध्देचा. एखादा स्वयंघोषीत बाबा अथवा माताजी तिथली सी.ई.ओ होते. मग थोडेसे जादुचे प्रयोग दाखवले जातात. मग ब्रेन वॉशींग करुन अनुयायांची भरती केली जाते आणि हे सर्व सोपस्कार पार पाडले की आमचाच परमार्थ कसा श्रेष्ठ आणि आमचेच बाबा/माताजी कसे ईश्वराचे अवतार आहेत याच्यावरुन आपआपसात कुरघोड्या चालु होतात. बोले तो चाय से ज्यादा किटली गरम.
कधी कधी वाटत आपल्या अर्थव्यवस्थेला परकीय चलणापेक्षा या अंधश्रध्देच्या दानपेट्यांचीच जास्त भीती आहे.

आज कित्येक लोकांच्या पाकीटात तुम्हाला त्यांच्या आई-वडीलांचा फोटो मिळणार नाही पण या भोंदु आई बाबांचा नक्कीच मिळेल. मग यांच्याच अनुयायांपैकी कुणी गाडी अथवा घर घेतलं तर गाडीच्या डॅशबोर्डवर अथवा घराच्या दरवाजावर देवाचा छोटासाच फोटो असतो.तर गाडीची मागची काच आणि घराच्या किचन पासुन बेडरुम पर्यंत सर्व या बाबा बुवांनी व्यापलेलं असतं
आजही खुलेआम व्रुत्तपत्रांमध्ये , ट्रेनमध्ये, बॅनरवर, सार्वजनिक जागांवर ,दुरसंचावर या बाबाबुवांची बिनधास्त जाहीरातबाजी सुरु असते. अजुनही कित्येक गावांमध्ये आजारी पडल्यावर लोक डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा भगत अथवा भक्तीनीकडेच जाणे पसंद करतात.

 याच मुळ कारण हे आहे की त्या भगत अथवा भक्तीनीला त्या माणसांच्या अज्ञानाचे असलेलं पुरेपुर ज्ञान.
 
आता तुम्ही म्हणाल हे सर्व फक्त खेड्यापाड्यात चालतं शहरांत हे सर्व शक्य नाही आहे तर हा तुमचा सर्वतः चुकीचा विचार आहे.आजही कित्येक चाळ सद्रुश्य झोपडपट्यांमधुन नवरात्रीत वैगरे देव्यांचा मांड भरला जातो एकाच वेळी दहा ते बारा स्त्रिया उठतात आणि संबळाच्या तालावर नाचु लागतात. सर्वांच्याच अंगात देवी आलेली असते.खरच देवं अंगात येतो? मग अस असुनही आजही समाजात एवढ्या वाईट घटना कश्या घडु शकतात?
आजही तुम्ही परेल जवळ्च्या के.ई.एम अथवा वाडीया हॉस्पीटल जवळुन गेलात तर तेथील तिकाटण्यावर (जिथे तिन रस्ते एकत्र येतात) तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उतारे काढुन ठेवलेले दिसतील. त्या उतार्‍यामुळे ठेवलेल्याच काही चांगल होवो अथवा न होवो कुत्रे मांजरी आणि घुशी मात्र गुटगुटीत होतात.
मुळात मी स्वतः देव अथवा भुत पाहीलेलं नाहीये तरीही या गोष्टींवर माझा विश्वास आहे.कारण माझा जन्म एका सामान्य मध्यम वर्गीय कुटुंबात झाला असुन माझ्या शिक्षणाची सुरवातच मुळी पाटीवर श्री गणेशाय नमः आणि सरस्वती काढुन झाली. म्हणुन मी स्वताला कधीच नास्तीक म्हणणार नाही.आणि ईश्वराच अस्तित्वही नाकारणार नाही.आजही गावच्या कुलदैवताचे नाव घेतले की मुखात आपोआप चांगभल येतं कारंण ते घेतल्यानंतर मनाला एक नवी उभारी मिळते. नवा उत्साह संचारतो यालाच मी माझी श्रध्दा म्हणेन. परंतु मी जर अभ्यासच केला नाही. मेहनत न करता फक्त घरात बसुन त्याच देवाच नामस्मरण करत राहीलो आणि सर्व मला आयत विनासायास आणि काही खटपट न करता मिळावं अशी अपेक्षा केली तर तीच माझी अंधश्रध्दा आहे. 

माझ्यासाठी माझे आई-वडील , माझे गुरुजण, आणि ज्यांनी ज्यांनी मी या राष्ट्राचा एक जबाबदार नागरीक व्हावा म्हणुन प्रयत्न केले आणि मला माझ्या सामाजिक निती मुल्यांची जाणीव करुन दिली ते माझ्यासाठी देव आहेत.याऊलट ज्यांनी माझ्या या समाज्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन सामाजिक नितीमुल्यांच अधःपतन करु पाहीले ते माझ्यासाठी भुत/दानव आहेत.
आपल्या सभोवतालचा परिसर, पंचमहाभुतं (प्रुथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश) हे माझ्यासाठी देव आहेत कारण त्यांनी मला जीवणोपयोगी संसाधने आणि उर्जा स्रोते वेळोवेळी उपलब्ध करुन दिली.पण ज्या द्रुष्ट प्रव्रुती त्यांच्या मतलबी स्वार्थासाठी याचं नैसर्गिक साधन संपत्तीचा विनाश करत आहेत त्या माझ्यासाठी भुत/दानव आहेत.

आपण जर आपलं संत वाडंमय पाहीलं तर आपल्या लक्षात येईल ज्ञानेश्वरांपासुन रामदासांपर्यंत सर्वांनी देव चराचरात (सजीव-निर्जीव) शोधलाय पण आपण मात्र त्यांच्या कार्याला चमत्कारांच आंदण देऊन त्यांनाच देव करुन बसलो.

आता तुम्ही म्हणाल की हे समाजातील फक्त एका विशेष वर्गा पुर्ती मर्यादित आहे तर तुम्ही चुकीचा विचार करताय. आज कित्येक सुशिक्षित तरुणांची अवस्था बोट दहा आणि अंगठ्या वीस अशी आहे त्यांना पाहील्यावर हा सामान्य माणुस आहे की जादुगार हेच कळत नाही. 

आजकाल शहरांमध्ये कॉर्पोरेट बाबा आणि आईंची नवीन जमात उदयास आली आहे. ज्यांच मासिक उत्पन्नच एखाद्दा निष्णात एम. डी डॉक्टरपेक्षा जास्त असांव. आणि याच स्वयंघोषित बाबा आणि मातांजीच्या घरी आपली सो कॉल्ड पेज थ्री वरची स्वताला मॉर्डन समजणारी मंडळी पाणी भरत असतात त्यात कित्येक बड्या असामी या थेट सिने, क्रिडा, उद्योग अथवा राजकीय क्षेत्राशी संबधित असतात. आणि हे ढोंगी बाबाजी अथवा माताजी त्यांचं असंकाही ब्रेन वॉश करतात की त्यांना विचारल्याशिवाय यांच पान सुध्दा हलत नाही. मग याच बाबा बुवांविरुध्द डॉक्टरांसारखा एखादा समाजवादी मानवतावादी विचारवंत जेव्हा आवाज उठवतो तेव्हा तो सर्वांच्या अस्मितेचा प्रश्न बनतो. आणि मग शिजु लागते कटाची खिचडी एका बाजुने डॉक्टरांच नाणं कस खणखणीत आहे म्हणुन प्रोत्साहन द्यायच तर पडद्यामागुन हाच आवाज कायमचा कसा बंद होईल या द्रुष्टीने सोंगट्या हलवायच्या यामुळेच आज कित्येक सामाजिक कार्यकर्त्यांवर जीवघेणे हल्ले होत आहेत. कदाचित उद्या राजकीय दबाव आणुन डॉक्टरांचे मारेकरी पकडलेही जातील. पण प्रश्न हा आहे की जे मारेकरी समोर असतील तेच डॉक्टरांचे खरे मारेकरी असतील की खरा सुत्रधार कुणी वेगळाच आहे?............................................!



1 comment:

किमंतु said...

Very True! Keep it up writing.