Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Wednesday, May 27, 2009

दु चाकी - भाग 6

"कस दिल रे ताक?" महेश ने विचारले, "पाच रुपये" बाबुने उत्साहाने सांगितले. "मग ठिक आहे, त्याआधी एक सांग वर कुठून म्हणजे कोणत्या वाटेने जायचे?" "हे बघा, ही जी समोरून वाटजाते ती हाय सोपी पण पोचायला दिड तास तरी लागल आणि एक वाट मागनं हाय जरा अवघड आणि झाडाझुड्पाची हाय, पण तीनं एक पाच-सहाशे पायर्‍या कमीबी होतील आणि तासाभरात गडावबी पोचु आपण." बाबुचे शब्द पुर्ण होतात न होतात सर्वजण एक सुरात म्हणाले, "आता गड सर करायचा तर मागच्या वाटेनेच हर हर महादेव,हर हर महादेव.." सर्वांनी चढाईस सुरवात केली. रात्रभर प्रवास करून सर्वांचे चेहरे अगदी शिनले होते; परंतु आता एकच ध्येय होत ते म्हणजे गड सर करायचा. सर्वात पुढे डोक्यावर कळशी आणि हातात ग्लासं गेतलेला बाबु आणि त्याच्या मागे हे सहाजण अत्यंत शिस्तीने पादक्रमण करत होते. एक वीस पंचवीस मिनिटातच तेजस ने धापा टाकायला सुरवात केली.

त्याला बघुन इनायत म्हणाला, "साले बोलता था ना ज्यादा फुका मत कर. साला जवानी मे तेरी ये हालत है?" "हा यार अभी ज्याते ही सब छोड दुंगा", यावर दिपकने मागे वळुन पाहीले व काहीसे वात्रट हसत म्हणाला, "वंदे वंदे आणि च्यु.... बनवायचे धंदे. गेल्या वर्षभरात याने दहा वेळा हीच प्रतीज्ञा केली, पण ज्याप्रमाने मुंगी साखरेचा वास काढत डब्यापर्यंत पोहचते त्याप्रमाणे हाही जेवल्यावर पानापट्टीवर पोहचतो. सुरवातीला रोज एक अशी कधीतरी ओढतो म्हणुन घ्यायचा आणि आता साला पाकीटच ठेवतो खिशात." त्यास जोड म्हणुन गणेशने री ओढली, "धुंवा धुंवा....धुंवाही धुंवा" तेजस मात्र असहायपणे धापा टाकत ऐकत होता. सुश्या आणि महेश मात्र बाबुचा इंटरव्ह्यु घेण्यात रमले होते. बाबु शाळेत सातवीला होता त्याच गाव तिथेच चालत दोन तासांच्या अंतरावर होत. घरचीपरिस्तिथी बेताचीच त्यामुळे सुट्टीच्या दिवशी हा इथे ताक विकुन पैसे कमवत असे तर आई वडील दुसर्‍याच्या शेतात मजुरीवर काम करत. घरी अजुन दोन भावंड होती, हे सर्व ऍकुन दोघांचेही चेहरे विषण्ण झाले. एकाच क्षणात त्यांना खेळण नाही मिळाल म्हणुन आई-वडीलांवर रुसणारी उलट बोलनारी मुल आठवली तर इथे आयुष्याचा खेळ चालावा म्हणुन झगडणारी मुल पाहायला मिळत होती.

एक तासाभरात सर्वजण नाना दरवाज्यापर्यंत पोहचले. दरवाज्याच्या आतील बाजुस पहारेकर्‍यांसाठी दोन लहान खोल्या आहेत त्यांस देवड्या म्हणतात. आत शिरताच गणेशणे "गो ब्राम्हण प्रतीपालक.....छत्रपती शिवाजी महाराज की जय!" अशी रोमांचकारीआरोळी ठोकली. सर्वजण विसावा घ्यायला तिथे थांबले. दोन ग्लास ताक रिचवल्यानंतर थोड फार फोटो सेशनही झालं. अशा प्रकारे थकत भागत, ताक पीत, शोर्य गीत बोलत, टिवल्या बावल्या करत एक दिड तासात सर्वजन गडावर पोहचले. गडावर पोहचल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्‍यावर ओसांडून वाहत होता. सुश्या बोलला, "यार, आता पहीले फ्रेश होऊया नाहीतर अंगात फिरण्यासाठी त्राण उरणार नाही." तेजसची तर दातखिळीच बसली होती तो नुकत्याच डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णासारखादिसत होता. "अरे इथे कुठे पाणी आहे का?" दिपक ने बाबुला विचारले, "हो हाय की इथुन पुढेसरळ चालत गेलात की गंगासागर तलावाच्या बाजुला पिण्याच्या पाण्याचे नळ आहेत व आंघोळीचीही व्यवस्था आहे." "गेलात म्हणजे? तु नाही येणार आमच्या बरोबर?" "आलो असतो पण दिवसात कुठे तीन चार फेर्‍या खाली वर केल्या तरच सुटतात शे-दिडशे रुपये. तेवढाच आई-बाला आधार", एवढ बोलुन तो पाठमोरा झाला पुढच्या गिर्‍हाईकांच्या शोधात पुन्हा तीच आरोळी ताक घेणा..........र का ताक्क..........!

गणेश बसल्याजागीच पेंगत होता. त्याला दिपकने हलवले "साहेब ऊठा. दोन तासात आपल्याला गड पाहुन परतीच्या प्रवासावर निघायचे आहे." ते ऐकून सर्वांनाच भान आले. अर्ध्या पाऊन तासात सर्वांच्या आंघोळी झाल्या. ऊन बर्‍यापैकी जाणवत होत परंतु फ्रेश झाल्यामुळे सर्वांच्या चेहर्‍यावर तरतरी आली होती. आता पुढचा प्रवास्. गडावर पाहण्यासारखी एकूण पंचवीस ठिकाणे आहेत. खुबलढा बुरुज, नाना दरवाजा, मदारमोर्चा, पालखी दरवाजा, राजभवन, रत्नशाळा, राजसभा, नगारखाना, बाजारपेठ, शिकार पेठ, कुशावर्त तलाव, टकमक टोक, हिरकणी बुरुज, महादरवाजा, चोरदिंडी, गंगासागर तलाव, हत्ती तलाव, स्तंभ, मेणा दरवाजा, जगदिश्वराचे मंदिर, महाराजांची समाधी, वाघ दरवाजा आणि अत्यंत शोभनीय असे मेघडंबरी म्हणजे महाराज राजसभेत ज्या आसनावर बसत ती जागा. शिवकालीन सिंहासनहे बत्तीसमन सोन्यापासुन बनवले होते परंतु संभाजी राज्यांच्या म्रुत्युनंतर मुघलांनी ते काबीज केले. आता तेथे पंचधातुपासुन बनवलेले सिंहासन शासनाच्या क्रुपेने पाहायला मिळते.

संपुर्ण रायगडभ्रमण करुन सर्वजण शेवटी जगदिश्वराच्या मंदीरात पोहचले. ऊन चांगलच तापल होते, परंतु मंदीरात एक विलक्षण गारवा होता दर्शन घेतल्यानंतर सर्वांनी थोडा वेळतेथे घालवण्याचे ठरवले. बघता बघता पाचही जनांचा डोळा लागला. महेश मात्र थकलेल्या डोळ्यांनी कधी मंदीराच्यासमोरच दक्षिनेकडे असलेल्या समाधीकडे पाहात होता तर मध्येच गाभार्‍यातील शिवलिंगाकडे. कसलतरी विलक्षण दडपण त्याला जाणवत होत पण उलगडा मात्र होत नव्हता. त्याने पुन्हा आपला कटाक्ष गाभार्‍यातील पिंडीवर टाकला आणि या ऐतिहासिक वास्तुची जी काही हेळसांड झाली ती तो आठवु पाहत होता. तेव्हा त्याला जाणवले की कित्येक ठिकाणी दारुच्या बाटल्या, प्लास्टीकच्या वस्तु, फळांच्या साली इस्त:त पडल्या होत्या, त्यात भर म्हणुन प्रेमी युगुलांनी स्वताच्या नावाने रंगवलेल्या ऐतिहासिक जागा. बहुतेक त्यांना archies किंवा hallmark चे ग्रीटिंग्स परवडत नसावेत? तर काही ठिकाणच्या वास्तु पुढच्याभेटीत पाहायला मिळतील की नाही अशा कंडिशनमध्ये होत्या, जर स्वराज्याच्या राजधानीचीच ही अवस्था तर बाकीच्या गडकोटांचा विचार न केलेलाच बरा. यावरुन खरच शासनाच या सर्व गोष्टींकडे किती लक्ष आहे व महाराजांच्या कार्याविषयी खरंच किती आस्था आहे याची प्रचीती आली.


(क्रमशः)

Tuesday, May 19, 2009

प्रिये देशील का मज एक मोका

प्रिये देशील का मज एक मोका
दुर सागरात उभी असेल आपली नौका ।
नौकेत आपण दोघे राजा राणी
गाऊ प्रेमाची बेधुंद गाणी ॥

प्रिये देशील का मज एक मोका
उंच झाडावर बांधेन तुजसाठी झोका ।
त्याच झाडावर बांधीन छोटस घरट
घरट्यात असेल आपलं चिमुकल कार्ट ॥

प्रिये देशील का मज एक मोका
नजराना देईन तुज सुंदर अनोखा ।
प्रेमाची भेट पाहुन गालात तु हसशील
काय सांगा हसता हसता आठवणही काढशील ॥

प्रिये देशील का मज एक मोका
औसेची रात्र दाटला अंधार काळोखा ।
त्या अंधारातही साथ मी तुझी देईन
चंद्र नाही तारा नाही पण काजवा म्हणुन प्रकाश देईन


श्रीमत् ( महेंन्द्र लक्ष्मण कदम)

Monday, May 18, 2009

दु चाकी - भाग 5

महडला पोहचल्यावर सर्वांना हायस वाटलं. महेश म्हणाला, "काय मग कसं वाटल? होतं की नाही adventurous". "साल्या गप्प बस, गेल्या २४ वर्षात जेवढे नामस्मरण नाही केलं देवाचं तेवढे गेल्या तीन तासात झालय माझ्याकडुन, साला एके ठिकानी तर गाडी घातलीच होतीस पण नशीब बलवत्तर म्हणुन वाचलो आपण", सुश्या अत्यंत आगतिकपणे म्हणाला. "सॉरी यार पण त्या काळोख्या अंधारात आणि गडद धुक्यात तो ट्रक दिसलाच नाही मला, पण बाईक कंट्रोल केली ना! उगी आता रडायचं नाही हं हं हं हं..........", "नाही यार, पण रस्ता खरोखरच फार भयान वाटत होता, त्यात भर की काय म्हनुन ते रस्त्यावरचे बोर्ड, 'नजर हटी दुर्र्घटना घटी!', 'अपघात प्रवण क्षेत्र' आयला पार घाबरवुन टाकला आपल्याला", तेजस चे हे बोल ऐकुन दिपक मात्र मनोमन सुखावला, नाहीतर हा (तेजस) कुठे जाऊन आला की अशा काही बढाया मारायचा की ऍकनार्‍याच्या कानाचे पडदे दयेची भिक मागायचे.

"महाराज्यांच्या क्रुपेने इथवर सुखरुप पोहचलो; आता पाऊन एक तासातच किल्ले रायगड", चष्म्याच्या आत डोळे चोळत गणेश म्हणाला, तर इनायत मात्र पैसे देउन भाषण बघायला आलेल्या माणसांसारखा त्या पाच जणांचे बोल ऐकण्यात दंग होता. पहाटेचे साडे चार वाजले होते, गारवा फारच जाणवत होता, परंतु अतिउत्साहाने सर्वांनी त्या काकडत्या थंडीवरही मात केली. किल्ले रायगड महडच्या उत्तरेस मुख्य महामार्गापासुन आत २५ कि.मी वर आहे. मुख्य रस्त्यावरच दोन शिवकालीन सिंहस्तंभ येणार्‍या पर्यटकांचे स्वागत करतात. त्या दोन सिंह स्तंभाना पाहील्यावर सर्वांना एक अनोख स्फुरण चढले, त्यातच सुशांतने 'जय भवाणी जय शिवाजी' अशी रक्त सळसळवणारी नादमय आरोळी ठोकली आणि सर्वजन रायगडाच्या दिशेने कुच झाले. एक पाऊनएक तासातच सर्वजण पायथ्यानजीकच्या पाचाडात पोहचले, तेथुन डाव्याबाजुचा रस्ता थेट राजमाता जिजाऊंच्या समाधीकडे जातो तर उजव्याबाजुने सरळ वर गेल्यास किल्ले रायगड निधड्या छातीने स्वागतासाठी सज्ज दिसतो.

बाईक वरुन पुढे जात असताना सर्वांची नजर गावातील विहिंगम द्रुश्य अ:क्षरक्ष टिपुन घेत होती. सुर्यनारायन नुकतेच सह्याद्रीच्या डोंगर रांगातुन डोकाऊन पाहात होते. त्या त्यांच्या सौम्य तेजाने सारे आसमंत पिवळ्या केशरी रंगाने न्हाऊन गेले होते जनु काही एखाद्या निष्णात चित्रकाराने आपल्या कल्पनेच्या कुंचल्यातून कॅनव्हासवर रंग भरले असावेत. सगळीकडे झुंजूमुंजू झाले होते त्यात पाखरांचा चिवचिवाट, दारासमोरील रांगोळीचा सडा, गुरांचे हंबरने त्यांच्या गळ्यातील घुंगरांचा खळखळाट, गवताचा मन कासावीस करणारा वास हे सर्व बघता बघता सारे गडाच्या पायथ्याजवळ पोहचले.

समोरच एक उपहारग्रुह आहे तिथेच सर्वांनी आपल्या गाड्या पार्क केल्या आणि गरमागरम कट वड्यावर येथेच्छ ताव मारला. खाता खाताच दिपक बोलला "ए खाऊन जाल्यावर पहीले फ्रेश होऊया आणि मग चढायला सुरुवात करुया", तेवढ्यात हॉटेलमालकाने कळवले की तेथे पाण्याची थोडीफार टंचाई आहे तुम्हाला पाणी गडावरच मिळेल ते ऐकुन सुश्यांत बोलला "हा यार नाहीतरी आपला अवतार एकदम द्रुष्ट लागण्यासारखा झाला आहे. साला एखाद्या मुलीने पाहीले तर झालेली लाईन तुटायची",यावर सर्वजण हसले. "आणि हो पाण्याच्या बाटल्या इथुनच घेऊया. परत वर जाई पर्यंत पाणी नाही" गणेशने सुचवले व त्याच्या म्हणण्याप्रमाने सर्वांनी बाटल्या भरल्या आणि चढाईस सज्ज झाले. हॉटेलातुन बाहेर पडताच चार-पाच चॉदा पंधरा वर्षांची मुल हातात ताकाने भरलेली कळ्शी आणि ग्लास घेऊन धावत त्यांच्या दिशेने आली त्यापैकी एकाचे नाव विचारले असता त्याने बाबु असल्याचे सांगितले, "ओ दादा, ताक घेणार का? घेत असाल तर तुमच्या बरोबर वरपर्यंत येईन आणि गडबी फिरवीन, आणि ताक पित रहाल तर दम बी न्हाय लागणार". त्याचं ते एवढ्याश्या वयातल व्यवहारी कसब पाहुन सर्वांना फार कुतुहल वाटले.



(क्रमशः)

Thursday, May 7, 2009

दु चाकी - भाग 4

घरातुन निघाल्यानंतर महेश थेट आपल्या बाईकजवळ गेला. सुशांतही तिथेच त्याची वाट पाहत ऊभा होता. बाईकची सर्व्हिसिंग दोनच दिवसांपूर्वी केली असल्यामुळे घाबरण्याचे कारण नव्हते. दोघेही बाईकवर बसले
महेश : मग निघायच का पाटील?
सुशांत : का तुतार्‍या वाजायची वाट बघताय? आणि प्लीज जरा संभाळून माझ लग्न अजुन झालेल नाही.
महेश : ए जरा थंड घे आता मला शांतपणे गाडी चालवु दे.
एक आठ ते दहा मिंनिटात ते चित्रा जवळ पोहचले. समोरच गणेश आणि तेजस आपआपल्या बाईक घेऊन उभे होते. (तेजसकडे जुनी CBZ होती परंतु त्याने ती छान कंडिशन मध्ये ठेवली होती तर गणेशकडे त्याच्या स्वभावाप्रमानेच CT 100, आणि महेशकडे अर्थातच Definitely male Pulser 150)

शेजारीच दिपक ही ऊभा होता तर तेजस ईनायत ची वाट पाहत होता. तो परेललाच कुठेल्यातरी जवळच्या मित्राला भेटायला गेला होता.
दिपक : चला ठरल्याप्रमाणे आपण एकदाचे इथपर्यंत येऊन पोहचलो, ते म्हणतात ना well began is half done,
गणेश : हो नाहीतरी कित्येक वेळा ठरवुन सुद्धा प्लान यशस्वी होत नाहीत, नक्कीच काहीतरी थ्रील अनुभवायला मिळणार.
तेजस: नक्की मिळेल पण जायचे कुठे?
"राजमाची ला जाऊया का लोणावळ्याची थंडीही अनुभवता येइल", गणेश ने सुचवले. बेत चांगला होता. तेवढ्यात महेश म्हणाला, "ए रायगड ला जाऊया का? मी अजुन नाही पाहीलाय, आत्तापर्यंत फक्त पुस्तकातुन आणि नेटवरुन फार वाचल आणि पाहीलय, त्याची भव्यता, त्याचा चोखटपणा, भॉगोलिकद्रुष्ट्या त्याचे इतिहासातील महत्व, खरच ट्रेकही होईल आणि इतिहास ही जवळुन पाहता येईल". महेशच्या बोलण्याला दिपकने दुजोरा दिला तो म्हणाला, "माझी ही फार दिवसांपूर्वीची सुप्त ईच्छा होती आणि त्यात जवळही आहे उद्या संध्याकाळपर्यंत परत येऊ आपण."

दिपकचे बोलुन होते न होते तोच इनायत समोरुन येताना दिसला. त्याला पाहताच सर्वांनी हायस वाटले कारण ऑलरेडी १२ वाजुन गेले होते, तो आल्या आल्याच तेजस ने त्याला सांगितले की आपण रायगडला जाणार आहोत त्यावर त्याने प्रतीक्रिया दिली, "अरे किधर भी चलो लेकिन पहला यहा से निकलो", यावर गणेश म्हणाला "साला 'येतात लेट नी होतात शेठ' चला बसा बाईकवर", तेवढ्यात महेश म्हणाला, "आता पहिला हॉल्ट पनवेल (मॅक डोनाल्ड-च्या बाजुला)". सर्वांनी होकारार्थी माना हलवल्या.

तेजसच्या मागे इनायत, गणेशच्या मागे दिपक आणि महेशच्यामागे सुश्या, तिघांनीही सायन जवळच्या पेट्रोल पंपावर आपआपल्या गाडीच्या टाक्या फुल केल्या आणि वेगात एखाद्या योद्द्याच्या अविरभावात रायगडाकडे कुच केले. एसटी बसेस अथवा मोठ्या गाड्या सोडल्यातर संपुर्ण रस्ता रिकामाच होता. त्यात नोव्हेंबर महीना असल्यामुळे बाईकच्या वाढत्या वेगाबरोरच थंड वारा अंगाला बोचत होता. तेजस केव्हाच पुढे पसार झाला होता तर गणेश कुर्मगतीने मागुन येत होता, दिडएक तासातच सर्वजण पनवेलला पोहचले. तेथे थोडी फुकाफुकी आणि चहा झाल्यानंतर पुन्हा पुढचा प्रवास. खरच पुढचा प्रवास अक्ष्ररक्षः परीक्षा पाहणारा ठरला. शहरापासून दुर गेल्यानंतर थंडी ने आपला रंग दाखवायला सुरवात केली. संपूर्ण रस्ता धुक्याने आछादुन गेला होता. रात्रीच्या गडद अंधार, रस्त्याच्या आजुबाजुला कुणीही नाही, त्यात हाड गोठवणारी थंडी, सगळीकडे निरव शांतता पसरलेली फक्त गाड्यांच्या फायरींगच्या आवाजानेच वातावरणात एक अनोखा नाद घुमत होता. खरंच थ्रील काय असते ते आज अनुभवायला मिळत होते त्या सहाजनांना.

समोर दहा फुटांवरचही दिसेनास झाले तेव्हा अक्षरक्ष पार्किंग लाईट लाऊन गाडी चालवावी लागत होती समोरून अथवा मागुन एखादी मोठी गाडी पास झाल्यास फारच पंचाईत होत होती. वातावरण एवढे भयानक होत की कोणालाच कोणाशी बोलावस वाटत नव्हत. सर्वजन त्या गुढ अंधारात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत होते, अशी ही तारेवरची कसरत करता करता बाईकदळाची (पायदळ, घोडदळ) पहीली तुकडी महडला येऊन पोहचली ती महेश आणि सुश्याची, आणि एक दहा पंधरा मिनिटांच्या फरकाने तेजस आणि गणेश ही पोहचले.




(क्रमशः)

Wednesday, May 6, 2009

मन वेडे

क्षणात इकडे क्षणात तिकडे
बागडते चोहीकडे ॥
ठाव जयाचा नसे अंतरी
अल्लड वारु मन वेडे॥

कधी आनंदी कधी दु:खी
काहुर दाटे मायेकडे॥
ठाव जयाचा नसे अंतरी
अल्लड वारु मन वेडे॥

सदैव व्यस्त प्रवास ज्याचा
जाणिवेतुन नेनिवेकडे॥
ठाव जयाचा नसे अंतरी
अल्लड वारु मन वेडे॥

अनेक रंगी अनेक अंगी
कल अष्टविषयांच्या छटांकडे॥
ठाव जयाचा नसे अंतरी
अल्लड वारु मन वेडे॥

दिसे ते न भासे, भासे ते न दिसे
सु़क्ष्मातुन द्रुश्याकडे॥
ठाव जयाचा नसे अंतरी
अल्लड वारु मन वेडे॥

आकार नसे ऊकार नसे
हृदयातून कल्पनेकडे॥
ठाव जयाचा नसे अंतरी
अल्लड वारु मन वेडे॥

श्रीमत् ( महेंन्द्र लक्ष्मण कदम)