Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Monday, December 7, 2015

शापित गड भाग 2


भिवा तिथुन जाताक्षणीच एक गुढ शांतता तिथे पसरली. आता फक्त हलणारया गवताची सळसळ आणि आमचे फुललेले श्वासच आम्हाला ऐकु येत होते. तिथुन पुढे.

पंडीत प्रश्नार्थक नजरेणे माझ्याकडे पाहात होता. मी काही बोलायच्या आतच तो बोलु लागला, "भास्क्या ह्या भिवाचं वागण मला काही ठिक वाटत नाहिये". असं का रे वाटतय तुला? मी विचारले. अरे तुला हा अनुभव आला की नाही ते माहीत नाही पण सबंध रस्ताभर मला अस वाटत होत की कोणीतरी आपल्यावर नजर ठेऊन आहे. म्हणुन मी त्या अनुषंगाने एक दोनदा तुझ्याकडे बघितलसुद्धा पण तु मात्र तुझ्याच विश्वात रमला होतास. ह्या भिवा ला विचारल तर एकदम कुस्तित पणे हसुन बोलतो कसा आता भर दुपारी इथं कोण कशाला येतय मरायला.....! मला तर पंडीतच वाक्य ऐकुन कान गरम झाल्यासारखे वाटले. म्हणजे मला जे वाटत होतं तो भास नसुन खरच कोणीतरी आमच्या मागावर होत. आणि ते जे पण काही आहे ते आत्ता आमच्या आजुबाजुलाच आहे. कदाचित आत्ता या क्षणी ही ते आमच्यावर डोळे रोखुन पाहात असेल? माझ संपुर्ण अंग गार पडल्यासारख वाटल. तरीही उसनं अवसान आणुन मी पंडीतला विचारल. तु म्हणतोयस त्यात तथ्य आहे. भास तर मलाही झालेत इवन एक दोनदा मला चक्क कोणीतरी शुक्क शुक्क केल्याचा आवाज पण झाला. पण मला वाटल कि हा भास फक्त मला एकट्यालाच होतोय. म्हणुन मी तुला काहीच बोललो नाही. पण कदाचित आपण दोघेही प्रवासाने थकल्यामुळे आपल्याला खरच असे भास होत असतील.

माझ्या धीरोत्त शब्दांनी पंडीतच्या चेहरयावर थोड समाधान दिसलं. मग मीच पुढे विचारल पण "भावा तुला भिवा बद्दल अस वाटण्याच कारण काय? तसा पंडीत सुरु झाला बहुतेक त्याला याच प्रश्नाची अपेक्षा असावी. "सर्वात पहिल तो कोन दादोसा का फादोसा भेटला होता ना खाली, ज्याने आपल्याला काहीबाही गोष्टी सांगुन या भिवाच नाव सुचवल वर अजुन ते कोन सर्व्हे करण्यासाठी आलेले ते पण गायब झाले त्यांची कपडे आणि सामानपण म्हणे या भिवालाच सापडलं अस सांगितल. "तु तो भिवाचा बाप पाहिलास मगाशी? "तो जे हातवारे करुन सांगत होता ना" ते भिवाला नसुन कशावरुन आपल्यासाठी नसतील. आणि सर्वात महत्वाच म्हणजे आयला भर दिवसा इथे आपली फाटतेय इकडे यायला तिथे हा भिवा बिनधास्त उंडगतोय, आताचच घे हा कसला विचित्र आवाज आला तसा हा एकटाच पसार झाला. त्यात त्याचे पैसे पण तु मगाशीच देऊन मोकळा झालायस म्हणजे आता "तेल पण गेलय आणि तुप पण" आणि ह्यात जर ह्या दादोसा आणि भिवाचा काही कट असला तर बहुतेक आपल पण सामान ह्या भिवालाच सापडेल एक दोन दिवसांनी.

साल्या हे सगळ ना सावधान इंडीया आणि क्राईम पट्रोलचे परिणाम झालेत तुझ्यावर. आसलं काही एक होणार नाही आपल्याबरोबर आता इथेच शंकासुराचा जप करण्यापेक्षा त्या वाड्यात जाऊन राजा भ्रमर वर्मा ला भेटुया मग तडक घरी. भिवा नसल्यामुळे माझ्या हातातील मॅपचा आधार घेत आम्ही पुढे चालत राहिलो. एक दहा पंधरा मिनिटांनी पुरुषभर ऊंचीच्या गवतातुन वाट काढत आम्ही त्या वाड्यापाशी येऊन पोचलो. पण तिथे गेल्यानंतर खरच समोर जे पाहील ते विस्मयकारक होते. गडावरील पाच तळ्यांपैकी जे शेवटचं तळ होत ते वाड्याच्या अगदी समोरच होते आणि पाणी तर एकदम स्वच्छ अगदी पहिल्या चार तळ्यांपेक्षाही. तळ्याचा आकार षटकोणी असुन त्याच्या मधोमध दगडाचा कसलातरी अर्धवट तुटलेला भग्नावषेश होता तो नक्की तिथे कशासाठी होता हे माहीत नाही. "वास्तविक एवढ्या वर्षांनंतरही जर गाळ वैगरे काढला नाही तर तळी हिरवीगार होऊन जातात". त्यावर कसल्या ना कसल्या शेवाळंचा तवंग वाढतो. पण त्याची बांधकाम शैली सोडली तर तळ्यातील पाण्याकडे पाहुन ते बाराशे वर्षांपुर्वीच असावे असा कुठलाच मागमुस दिसत नव्हता. तळ्याच्या मागच्याच बाजुला म्हणजे वाड्याच्या समोरच्या दिशेला एका छोट्याश्या उंचवटावजा जागेवर "ते" विचित्र झाड होतं. त्याच खोड पोकळ असुन व्यास आतमध्ये दोनतीन माणस सहज मावतील येवढा होता. पण फांद्या पर्ण हीन असुन एकदम लहान होत्या. त्याच्या एकंदर अवतारावरुन प्रत्येक पक्षाने त्या झाडाला वाळीत टाकले असावे असच दिसत होतं.

झाडाच्या दोन्हीबाजुंनी तळ्याकडे उतरणार्‍या दोन पाय वाटा होत्या. तर मेन पायवाट वाड्याच्या समोरच होती. जिथुन तळ्यात उतरण्यासाठी फरसबंदी पायर्‍या वर्तुळाकार करण्यात आल्या होत्या. वाड्याच्या आणि तळ्याच्या मध्ये वीस-पंचवीस फुटांचे अंतर असावे त्या जागेतही मधोमध कसला तरी शिलालेख सांकेतिक भाषेत कोरला होता. अर्थात आम्हाला तो काही वाचता येत नव्हता. पंडीत महाशय सभोवताली फिरुन आपल्याकडील डिजी कॅमचे फ्लॅश पाडत होते. साल्याला फोटोग्राफीचा भलता शौक घड्याळात आता दुपारचे तीन वाजले होते. आणि आश्चर्य म्हणजे आमच्या आऊ साहेबांचा सकाळपासुन एकही कॉल नव्हता. ना व्हॉटस अप वर कुणाचा मेसेज मोबाईल बघण्यासाठी बाहेर काढला तर नेटवर्कच्या सारया कांड्या रोमिंग करायला गेलेल्या आढळल्या. म्हणजे आता घरी गेल्यावर आपली बिन पाण्याची होणार. पंडीतला तर काय टिळा लावुनच सोडलाय. मोबाईल परत बॅगेत टाकुन मी सहज पंडीतला विचारल "साहेब सकाळपासुन आपण जी फोटोग्राफी केलीय ती पाहण्यास मिळेल काय? अरे का नाही? बर झालस आठवण केलीस मी स्वताःपण नुसता क्लिक करत फिरतोय. बर झालस आठवण केलीस. आम्ही दोघे त्या शिलालेखाला टेकुन बसलो.

पठ्या ने काही काही इमेजेस अगदी अप्रतिम कैद केल्या होत्या. स्लाईड शो ऑन केल्यामुळे एक एक फोटो पुढे सरकत होता. भिवाच्या घरापर्यंत सर्व आलबेल होतं पण जसजसे तिथुन पुढेचे पिक्स येऊ लागले तसे आम्ही एकदम गपगार झालो. आम्ही दोघांनीही एकमेकांकडे एक शांत कटाक्ष टाकला. कारण प्रत्येक फोटो मध्ये माझ्या मागे एक धुरकट पांढरया रंगाची आक्रुती दिसत होती. आणि अचानक गडाच्या प्रवेशद्वारा पासुन ती आक्रुती दिसण्याची बंद झाली. पंडीत जवळ जवळ ओरडलाच "बघीतलस भास्क्या", "मी बोलत होतो ना मगाशी. म्हणजे आपल्याला होणारे नक्कीच भास नसुन कसली तरी अमानवीय शक्ती आपला पाठलाग करत आहे. आणि त्या गावठी भिवाला हे सर्व माहीत असणार म्हणुनच तो गां--ला पाय लाऊन पळाला. आता आपल काही खर नाही. भेंच्...उगाच आलो इकडे. भास्क्या चल ऊठ आता बस झाल हे अडवेंचर. साला फोन पण डेड झालेत आपले. आणि अजुन थोडा वेळ गेलाना तर आपण पण डेड होऊ चल ऊठ लवकर. पंडीत गन चालल्यासारखा धडधडत होता.

"अरे शांत हो जरा हे बघ मी डिस्कव्हरी वर पाहिलय एखाद्या विशिष्ट ठिकाणी मॅग्नेटिक प्रभाव जास्त असल्यामुळे असे विचित्र अनुभव येतात. त्यात तुझा कॅमेराचा फ्लॅश लाईट पण ऑण आहे अशावेळी जर फोटो काढताना काही हालचाल वैगरे झाली तर प्रकाशाच्या अपस्करणामुळे फोटोत असे टच अप दिसतात सो डोन्ट वरी भावा मी आहे ना. आणि प्रवेश दारा पासुन आत आल्यानंतरचे सर्व फोटो व्यवस्थित आहेत मिन्स नीड नॉट टु वरी ओके. माझ्या विज्ञाननिष्ठ उत्तराने त्याच काही समाधान झालेल दिसल नाही परंतु स्वारी तुर्तास तरी शांत झाली. पण मला पण आता खरंच आतुन भीती वाटायला लागली होती. आणि "माणसाच्या मनात एकदा का भितीचा प्रवेश झाला की स्वताची सावली पण त्याला घाबरवण्यास पुरेशी असते".

या सार्‍याचा परिणाम म्हणजे पंडीत आता त्या वाड्यात येणार नव्हता तो बाहेर बसुनच माझी वाट बघणार होता. पंडीत येणार नसल्यामुळे त्याचा कॅमेरा मी स्वताःकडे घेतला आणि माझ सर्व सामान त्याच्याजवळ ठेऊन मी त्या वाड्यात प्रवेश केला. वाड्यात प्रवेश केल्या केल्या सभोवतालच्या वातावरणात एकदम गारवा जाणवु लागला. संपुर्ण वाडा काळ्या कातळाने बांधलेला होता आणि त्यासाठी लागणारे दगड बहुतेक समोरील तळ्याच्या खोदकामातुन काढले असावेत. वाड्यात जिथे मी उभा होतो त्या ठिकाणी एका वेळी शंभर माणसे आरामात उभी राहतील येवढी जागा होती. दोन्ही बाजुंना नक्षीदार खांब जे महिरपी कमाणींनी एकमेकांना जोडले होते. या सर्व खांबाच वैशिष्ट्य म्हणजे त्यावर कसल्या ना कसल्या वाद्य वाजवणारया आणि काम करणार्‍या माणसांच्या, प्राण्यांच्या आक्रुत्या कोरल्या होत्या. बहुतेक हे सर्व खांब राज्यातील प्रजेचे प्रतिनिधित्व करत असावेत. त्याच्या मधुनच एक वाट सरळ जात होती जिथे आडव्या सज्जावरती मागे दोन आणि पुढे दोन असे एकुन चार कोरीव खांब होते आणि मधोमध बहुतेक राजाची बसण्याची व्यवस्था असावी. कारण त्याच्या बरोबर वर एक जबडा उघडलेल्या आयाळधारी सिंहाची प्रतीक्रुती दगडातच कोरली होती.

वाड्याच प्रवेश द्वार वगळुन दोन्ही बाजुला चार-चार असे एकुन नऊ दरवाजे होते.एकंदर आतील बांधकाम प्रशस्त असुन हवा खेळती रहाण्यास पुरेपुर वाव होता. राजाच्या सिंहासनाच्या समोरच म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर वर एक पंधरा वीस लोक बसु शकतील अशी माडी होती. बहुतेक राजाचा जनान खाना इथे बसत असावा जेणेकरुन दरबार भरला असताना फक्त राजाच तिकडे पाहु शकत असावा. त्या माडीच्या मधोमध एक गोलाक्रुती कवडसा अशा प्रकारे बसवण्यात आला होता जेणेकरुन सकाळी सुर्योदय झाल्यानंतर कोवळ्या किरणांची पहिली तिरीप बरोबर त्या आयाळधारी सिंहावर पडत असावी. मी कुठेतरी वाचल्याच मला आठवल की काही राजवंशा मध्ये सुर्याला फार मह्त्व दिलेल आहे आणि त्याचाच प्रभाव त्यांच्या स्थापत्य शैलीवरही आढळतो.
राजाच्या बसण्याच्या जागेच्या दोन्ही बाजुलाच दोन दरवाजे मागच्या भिंतीलाच समांतर न बांधता आतील बाजुस २०-२५ अंशात थोडे तिरपे बांधले होते जेणेकरुन एखादी व्यक्ती जरी तिथे उभी असेल तर मान वळवल्यानंतर फक्त राजालाच ती दिसु शकत असेल. अर्थात तिथपर्यंत जाण्याचा मान राजाच्या कुटुंबाव्यतीरिक्त फक्त त्याच्या मर्जीतल्या माणसांनाच असावा. तिथुनच दगडी पायरया गोलाकार वळुन वर गेल्या होत्या. बहुतेक तिथे राण्यांची दालणे असावीत व तिथुनच समोरील माडीपर्यंत जाण्याचा रस्ता असावा. थोडेफार फोटोशुट झाल्यानंतर मी डाव्या बाजुच्या दरवाजाने आत जाण्याचा जाण्याचा निर्णय घेतला. बहुतेक मी ज्या गुप्त दरवाजाच्या शोधात होतो तो तिथेच असावा. खरतर मला आत प्रवेश करण्यास जाम भिती वाटत होती. पण माझ्या मनातल कुतुहल मला स्वस्थ बसुन देत नव्हत. अखेर कुतुहलाने भितीवर विजय मिळवला. मी हातातला टॉर्च ऑन केला आणि हळु हळु पुढे पाऊले टाकु लागलो.

मी काही अंतर जातोय न जातोय तसा बाहेर तळ्यात धप्पकन काहीतरी पडल्याचा जोरात आवाज आला. आवाज येताक्षणी मी जोरात बाहेर धुम ठोकली कारण सर्वात पहिला जो विचार माझ्या मनात आला असेल तो म्हणजे पंडीतचा, स्वारी वाकुन बघायच्या नादात पडली बिडली तर नाही ना? बाहेर येताच माझ्या हातातला टॉर्च तसाच गळुन पडला व समोरील द्रुश्य पाहुन मला आता फक्त भोवळ यायचीच बाकी होती. कारण मगाशी ज्या तळ्यातल पाणी एकदम स्वछ होतं ते आता एकदम हिरवगार झांल होतं त्याच्यावर कसल्यातरी शेवाळाचा उग्र तवंग चढला होता. आणि विशेष म्हणजे तो दगडाचा भग्नावशेस पण त्याच्या जागेवर उभा नव्हता. संपुर्ण वातावरणात एक उग्रसा कुबट दर्प भरुन गेला होता. मी आजुबाजुला पाहील पण पंडीत कुठेच दिसत नव्हता. बर तळ्यात पडला म्हणावं तर त्याचा कसला आवाजही आला नव्हता. ना पाण्यात कसली हालचाल दिसत होती. सार काही एकदम गुढ. मी बेंभीच्या देठापासुन त्याला आवाज द्यायला लागलो. वाड्याच्या आजुबाजुला सैरभैर पळुन सर्वीकडे पाहिलं. जमेल त्या टेकडीवर चढलो. परत वाड्यात जाऊन पाहिल अगदी आजुबाजुंच्या तटबंदीवर चढुन कुठे काही दिसतय का याचा मागोवा घेतला पण त्याचा कुठेच मागमुस लागत नव्हता. पंडीत हवेत विरुन गेल्यासारखा गायब झाला होता. मी हताशपणे चालत तसाच तळ्यापर्यंत आलो. मगाशी हातातुन पडलेला टॉर्च तसाच चालु होता व त्याचा प्रकाश समोरील भिंतीवर पडला होता. मी तो ऊचलला आणि बंद करुन खिशात ठेवला.

आता माझ्या मनात भिती आणि काळजी अशा संमिश्र भावना दाटल्या होत्या. पंडीतच्या आठवणीने मन व्याकुळ होत होतं. साला उगाच इकडे आलो. माझ्यामुळेच बिचार्‍यावर आज ही वेळ आली. कुठे असेल तो? त्याच्या जिवाच काही बर वाईट तर झाल नसेर? माझ्या विचारांप्रमाणेच आजुबजुच वातावरण पण आता झटपट आपल रुप पालटत होतं. सुर्य अस्ताला जायच्या मार्गावर होता. आकाशात चारी बाजुंना गडद तांबड्या रंगाची झालर पसरली होती. मधुनच ऊंचावर पक्षांचा एक थवा घरट्याकडे परतत असताना दिसला आणि माझा बांध सुटला माझ्या डोळ्यात नकळत आसव जमा झाली. आज पहिल्यांदाच आईची खर्‍या अर्थाने आठवण येऊ लागली. मावशीचा हसरा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला. जर पंडीतच काही बर वाईट झाल तर कोणत्या तोंडाने तिला सामोरा जाऊ? का माझ पण तेच होणार? नाही...नाही.., मी हे होऊ देणार नाही. माझ्या विचांराशीच माझी खलबतं चालु असताना समोरील बाजुस दुरवर गवतात कसली तरी सळसळ जाणवली. सभोवताली काळोख वाढल्यामुळे डोळे किलकिले करुन त्या दिशेने पाहीले असता कसली तरी आक्रुती वाड्याच्या दिशेने सरकताना माझ्या नजरेस पडली. घाबरुन मी माझा मोर्चा तळ्याच्या मागच्या झाडाकडे वळवला.

त्या ढोलीत लपुन मी बाहेरील आवाजाचा काणोसा घेऊ लागलो. बाहेरील सळसळीचा आवाज हळु हळु वाढत होता. कोण असेल? पंडीत तर नसेल ना? मला जोरात त्याला आवाज देऊसा वाटला. नाही. पण पंडीत असता तर एवढ्यात तिकडुणच बोंबलत आला असता. त्यात तो इतक्या लांब कशाला जाईल. मी झाडाला असलेल्या फटीतुन बाहेर काही दिसतोय का याचा मागोवा घेऊ लागलो इतक्यात हळुच कोणीतरी माझ्या पाठीवर हात ठेवला. तसा मी दचकुण मागे वळालो आणि पुर्ण ताकदिने त्या आक्रुतीला मागे ढकललं. तसा जोरात धप्प. असा आवाज आला. काहीसा कळवळतच तो ओरडला, “अहो काय करताय? “थांबा! मी भिवा मांग” लगेचचं मी खिशातला टॉर्च काढला आणि त्याच्या तोंडावर मारला. अचानक आलेल्या प्रकाशामुळे त्याने झटकन आपला हात टॉर्च समोर धरला. तो भिवा मांगच होता. त्याने घातलेला अंगरखा संपुर्ण रक्ताने माखला होता व मी मारलेल्या धक्क्यामुळे हातातला कोयता तसाच बाजुला पडला होता. त्या कोयत्यावरही रक्ताचे डाग स्पष्ट दिसत होते. माझ्यातल्या संशयाची जागा आता खात्रीने घेतली. मी त्वेषाने त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्या छातीवर बसलो. बाजुलाच पडलेला कोयता उचलुन त्याच्या गळ्याला लावला आणि जवळ जवळ ओरडतच त्याला विचारल. “साल्या काय केलस माझ्या भावाचं? का मारलास त्याला? “सांग नाहीतर इथेच गळा चिरीन. रागाने माझे हात थरथरत होते. माझ उग्र रुप पाहुन भिवा चांगलाच चरकला. “साहेब शांत व्हा. मी कशाला मारु तुमच्या भावाला. “गप्प बस बंद कर तुझ हे साळसुद पणाच नाटक खर-खर सांग तु का मारलस त्याला? कुठे आहे तो? आणि आता मला मारायला इथपर्यंत पोहचलास. “सांग लवकर का मारलसं, अरे आम्हाला मारुन अस काय मिळणार आहे तुला. “साहेब एक मिनिट ऐकुन तर घ्या माझ. “मी खरच न्हाय मारलं त्यास्नी. माझ्या बायकोच्या पोटातल्या पोराची शपथ आणि आजुनबी तुम्हासनी तसच वाटत आसलं तर खुशाल कोयता चालवा ह्या मानवर. त्याच्या ह्या वाक्याने माझ्या हातातला कोयता तसाच गळुन खाली पडला.

भिवा पुढे बोलु लागला. साहेब तुम्हासनी आठवतय दुपारी आपण वर आलो तवा कसला तरी आवाज आला व्हता. तो दुसरा कसला नसुन मी दोन दिसापुर्वी लावलेल्या सापळ्यात जनावर घावल व्हतं. आणि मी लगेच गेलो नसतो तर यावेळचं फास बी त्यान तोडुन टाकल असतं. आधीच लोकांच्या शेताची त्यानं चागलीच नासधुस केली हाय त्यामुळे ह्या येळला त्याला सोडुन चालल नसतं म्हणुन तिथच हाणल त्याला आणि धुड येवढ मोठ हाय की माझ्या एकट्याच्यान न्हाय हालायच म्हणुन तिथच फाडुन लपवुन ठेवलय म्हंजी सकाळी वाडीतली दोन तीन पोर आणुन खाली नेता येईल. माझा विश्वास बसावा म्हणुन भिवा मला फास लावलेल्या ठिकाणी घेऊन गेला. भिवाने सांगितल्याप्रमाणे खरोखरच समोर एक डुक्कर मरुन पडला होता. त्याची मान कापुन भिवाने वर फांदीला अडकवुन ठेवली होती तर उर्वरीत धडाचे चारी पाय बांधुन त्यावर कपडा ठेवला होता. सायेब मी हित असलो तरी ह्या जागेवरन बाहेरच्या दरवाजाचा पर्यंतचा परीसर दिसतो. मला वाटलं तुम्ही याल तास दोन तासात तिथपर्यंत मग तुमच्या बरोबर मीबी निघालो असतो. पण भरपुर येळ झाला तरी तुम्ही दोघबी मला परत येताना दिसला न्हाईत. त्यात मगाशी तुम्ही ज्या हाका मारल्या त्यावरुन नक्किच काहीतरी गडबड असावी अस मला वाटल म्हणुन कोयता उचलला आणि वाड्यापाशी आलो तुम्हाला शोधत. आता मला माझ्या क्रुत्याचा पश्चाताप होऊ लागला. मी भिवाची माफी मागितली. पण आता प्रश्न हा होता की पंडीतच काय झाल असेल? माझ एक काम करशील? पंडीतचा शोध घेतल्याशिवाय मी गडाच्या खाली उतरणार नाही मग माझ्या जीवाच काहीपण होवो. मला मदत करशील? साहेब तुम्ही काळजी करु नका. जमल ते सर्व करायची माझी तयारी हाय. पण आज पित्री आमावस्या हाय त्यात त्या वाड्याबाबत कसल्या कसल्या वावटळी भी मी ऐकुन हाय. त्यामुळे रातच्याला इथ थांबुन वाट बघण म्हणजे साक्षात म्रुत्युला निमंत्रन देण्यासारखं आहे. साहेब सकाळी पंडीत साहेब बी मला त्यांना झालेल्या भासाबद्दल इचारत होते. पण म्हटल उगाच का घाबरवा म्हणुन मी उत्तर द्यायच टाळत होतो. पण खर सांगु आज माझ्या बाची जी परिस्थीती हाय ती या गडावरच्या वाईट शक्तींमुळच, मला पटकण दुपारी पाहिलेल्या फोटोंची आठवण झाली. नक्की हे काय गौड बंगाल आहे ते कळायला मार्ग नव्हता. शेवटी आम्ही त्या झाडाच्या ढोलीत लपुन वाड्यात घडणार्या घटणांचा आढावा घ्यायचा ठरवलं. आमचा प्लान सिंपल होता पहाटे पर्यंत गडावर त्या ढोलीत थांबायच आणि उजाडल की पंडीतच्या शोधात निघायचं अर्थात हे आम्ही ठरवल होतं पण नक्की पुढे काय आणि कस घडणार हे येणारी रात्रच ठरवणार होती.

ढोलीत बसुन आम्हाला आता चांगले तीन एक तास होत आले होते. पण आजुबाजुला काहीच हालचाल दिसत नव्हती. भिवा तर बसल्या जागीच डुलक्या काढायला लागला होता. मध्येच मानेवर काहीतरी वळवळ झाल्याची जाणवली तस जोरात झटकल तर एक मोठी गोम सळसळत आमच्या पायातुन पुढे निघुन गेली. गोम पर्यंत ठिक होती पण एखादा साप- बिप आत घुसला तर पंचाईत व्हायची. नुस्त्या कल्पणेनेच अंगावर काटा आला. बाहेर फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता तर मध्येच एखादी माशी किंवा डास कानाजवळुन गेला की त्याच्या पंखाची भुनभुन ऐकायला येत होती. घड्याळात ११.४५ वाजले होते. अजुनही बाहेरची परिस्थिती जैसे थे. आता हा भ्रमर वर्मा वैगरे सर्व फक्त गोष्टीं मध्येच आहे की काय अस वाटायला लागल होतं. सकाळी फोटोंचा प्रसंग आणि पंडीत गायब होण्याचा प्रसंग सोडला तर सर्व काही आलबेल होतं. पंडीतच्या आठवणीने पुन्हा मन व्याकुळ होऊ लागलं. बरा तर असेल ना? की त्याच्या जीवाच काही बर वाईट? कुठे असेल? असा एखादा माणुस कसा काय गायब होऊ शकतो. खरच मोठ कोड आहे. मी विचारांमध्ये असतानाच बाहेर जोरात वारा सुरु झाला. घड्याळात बारा वाजले होते. आज पर्यंत गरजणारे चाळीस फक्त भुगोलाच्या पुस्तकातुनच माहीत होते. पण आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. त्या भितीदायक आवाजाने भिवा पण तरतरीत होऊन सावध झाला. आम्ही दोघेही सावध पवित्रा घेऊन बसलो. आणि थोड्याच वेळात तो वारयाचा आवाज बंद झाला तसा दुरुन घोड्याच्या टापांचा आवाज ऐकु येऊ लागला. हळु हळु तो आवाज मोठा मोठा होत एकदम शांत झाला. आणि ढोलीत मला प्रकाशाची एक तिरिप दिसु लागली. मला वाटल चुकुन खिशातला टॉर्च ऑन झाला कि काय? पण टॉर्च तर बंद होता. तस भिवाने थरथरतच मला फटीतुन बाहेर बघण्यास सांगितले. समोरचा वाडा संपुर्ण प्रकाशाने न्हाऊन निघाला होता. आणि त्या वाड्याच्या प्रवेश द्वाराच्या मधोमध एक तरुन राजाच्या वेषात ऊभा होता. बहु तेक हाच तो भ्रम्रर वर्मा ज्याच्या आख्यायिका मी ऐकत होतो. दुरुन त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण हळु हळु तो तरुण वाड्या समोरील शिलालेखासमोर येऊन उभा राहीला आणि त्याणे राक्षसी हास्य करत त्या शिलालेखाला नमस्कार केला व एक संपुर्ण प्रदक्षिणा मारली आणि बाजुलाच उभ्या असलेल्या अरबी घोड्याच्या पाठीवर जोरात थाप मारली तस त्याच संपुर्ण अंग थरथरुन निघाल. त्याने घोड्यावर बसण्यासाठी बैठक मारली तशी आकाशात जोरात वीज कडाडली. त्या विजेच्या प्रकाशात त्याचा संपुर्ण पेहराव आणि चेहरा झळाळुन निघाला. आणि जे पाहील ते पाहुन डोळे फक्त बाहेर यायचेच बाकी होते. कारण त्या पेहरावातला तरुण दुसरा तिसरा कोणी नसुन माझा मावस भाऊ सात्विक उर्फ पंडीत होता.

पंडीत ने घोड्याला टाच मारली तसा घोडा संथ चालीत वाड्याच्या उजव्या बाजुच्या वाटेने पुढे जाऊ लागला. घोडा जस जसा पुढे जात होता. तस तश्या बाजुच्या जीर्ण झालेल्या भिंती आत्ताच रंगरंगोटी केल्या प्रमाणे ऊजळुन निघत होत्या. तटबंदी व त्यावर जाणारया वाटाही आता पुर्ववत झाल्या होत्या. ठिकठिकाणी जळक्या मशाली प्रज्वलीत झाल्यामुळे वातावरणात हलकासा मंद प्रकाश सर्वदुर पसरला होता. पंडीतची घोड्यावर बसलेली आक्रुती हळु हळु आमच्या नजरेआड जाऊन दिसेनाशी झाली. त्या रुबाबदार पांढर्या पांढरया घोड्यामुळे व त्याला मॅचींग तश्याच वेषामुळे एक मोठा पांढरा ठिपका बारीक होत-होत नाहिसा झाल्याचा भास झाला. वातावरणात अचानक एक प्रकाराचा उत्साह संचारला होता. पण अर्थात तो मानवीय नव्हता. समोरील वाडा आतमध्ये दरबार भरल्याप्रमाणे एकदम उजळुन निघाला होता. तळ्यातही मधोमध मस्त कारंजे ऊडत होते. वातावरणात एक हलकासा सुगंध पसरला होता. तर वाड्याच्या दिशेने एक हलकस मंद संगीत ऐकायला येत होतं. सार वातावरण एकदम गुढ आणि विलक्षण वाटत होतं. काही वेळेसाठी हे स्वप्न तर नाही ना म्हणुन भिवाला हळुच चिमटा घ्यायला सांगितला. "ऑऊच अरे हळु रे", मी भिवाला ओरडलो. म्हणजे हे सर्व खरोखर घडत होतं. बस आत्ताच्या आत्ता जाऊन या प्रकरणाचा छडा लावूया असा विचार मनात आला. पण जशी वाड्याबाहेरील हालचालींवर नजर गेली तसं त्या ढोलीत शांत बसण्यातच शहाणपणा आहे याची जाणीव झाली. कारण त्या वाड्यासमोरच दोन काळे धिप्पाड सैनिक भाला घेऊन खुनशी नजरेणे पाहात ऊभे होते. लागोलाग भिवाने माझं लक्ष बाहेरील तटबंदीवर वेधले. "साहेब ते बघा वर पण असेच काळे टेणे गस्त घालतायतात. आता इथुन बाहेर पडलो किंवा त्यांना आपण इथे असल्याचा सुगावा लागला तर देव पण आपल्याला आज वाचवु शकणार नाही." म्हणजे आता आम्ही खर्या अर्थाने "त्यांच्या" तावडीत सापडलो होतो.

इतक्यात भिवा काकुळतीच्या स्वरात बोलला, "साहेब आपल्याला काही होणार तर नाही ना?" "माझी कारभारीन पोटुशी हाय." "ती काळजी करत आसलं." "माझ काय बर वाईट झाल तर?". भिती आमच्या दोघांच्याही चेहरयावर स्पष्ट दिसत होती. मी त्याला उसना धीर द्यायचा प्रयत्न केला. मलाही आता आई आणि अण्णांची तीव्र आठवण येत होती. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता; तर बुद्धी हे सर्व मानण्यास तयार होत नव्हती. एक दोन मिनिटात माझ्या नजरेसमोरुन सकाळपासुनचा सर्व घटनाक्रम सरकून गेला. आमच हरवल गावापर्यंत येणं, रस्त्यात भेटलेला दादोसा, भिवाच्या घरी त्याचा विक्षिप्त बाप, आम्हाला झालेले भास, फोटोतल्या त्या आक्रुती, भितीदायक आणि तितकाच गुढ वाडा, त्याच्यासमोरच तळ, आम्ही आता ज्या ढोलीत बसलोय ते झाड, आधी भिवा व नंतर पंडीतच गायब होणं. त्यात हा भिवा बिचारा परत आला तरी पण हा पंडीत सरळ सरळ त्या राजाच्या वेषात तिथपर्यंत पोहचण हे आमच्यासाठी एक कोडच होतं. गडावरील वातावरण तर एखाद्या हॉरर मुव्हीच्या सेटप्रमाणे बदलत होतं.

पंडीतला तिथुन जाऊन दहा एक मिनिटे झाली होती, पण तिथुन बाहेर निघण्याच धाडस काही होईना. तेवढ्यात दुरवरुन कसलेसे अस्पष्ट आवाज येऊ लागले. अस वाटत होतं जणू कोणीतरी मंद लयीत नगारा बडवत एखाद्या सांकेतिक भाषेत कोणाला तरी साद घालत असावं. इतक्यात हुंकारे भरत पळण्याचा आवाज आमच्या कानावर पडला. नीट लक्ष देऊन ऐकल्यावर तो आवाज आमच्या दिशेनेच येत असल्याच आम्हाला जाणवलं. बस आता इथे थांबनं म्ह्णणजे साक्षात म्रुत्यूलाच निमंत्रण देण्यासारख होतं. "भिवा चल ऊठ इथुन! आत्ताच्या आत्ता आपल्याला ही जागा सोडायला हवी". आता तो आवाज हळु हळु मोठा होत असल्याचा आम्हाला जाणवलं म्हणजे कोणीतरी याच दिशेने येतयं. नुसत्या कल्पणेनेच पोटात भितीचा गोळा आला. मी आणि भिवा घाबरत घाबरत दबक्या पावलांनी त्या ढोलीच्या बाहेर आलो. कारण वाड्याबाहेरच्या किंवा माचीवरच्या त्या अमानवीय सैतांनाच जरा जरी लक्ष गेल तरी खेळ खल्लास. वाड्यासमोरचा परिसर जरी उजळला असला तरी या भागात अजुन अंधारच होता. अंधारात समोरील प्रत्येक आकार अंगावर येत होता. चारी बाजुंनी कस-कसले भीतीदायक आवाज आमचा पाठलाग करतायत अस वाटत होतं आणि सभोवतालचा परीसर ही जुना पडीक सकाळी होता तसाच दिसत होता. आता यामागे काय गौडबंगाल आहे हे मात्र कळायला मार्ग नव्हता. भितीने भिवाने त्याच्या हातातील कोयता अजुन घट्ट पकडला होता आम्ही दोघेही समोरच्या गवतात शिरणार इतक्यात सहा-सात काळे कुळकुळीत माजलेले भोई खांद्यावर पालखी घेऊन हुंकारे भरत आमच्या दिशेने पळत येेताना आम्हाला दिसले. बस्स आम्ही जीव घेऊन तिथुन पळु लागलो. भिवा पुढे, मी मधे आणि काही अंतरावर ते दैत्य आणि त्यांच्या खांद्यावर "ती" पालखी. आता काही करुन यांच्या तावडीत सापडायचं नाही. पुरुषभर वाढलेल्या त्या गवतातून धावताना आमची चांगलीच दमछाक होत होती.

अंधारामुळे आम्ही नक्की कोणत्या दिशेला चाललोय काहीच कळत नव्हत. जस जसा आमचा वेग वाढत होता तस तसे तेही आणखीन जोरात हुंकारे भरत आमच्या मागे येऊ लागले. आता माझा श्वास चांगलाच फुलला होता. पायातल त्राणही संपत आलं होतं परंतु मन हार मारायला तयार नव्हत. अखेर पळता पळता भिवा अचानक एके ठिकाणी थांबला. तसा हातानेच मी त्याला पुढे जायला सांगु लागलो. पण तो जागचा हालला नाही. त्याच्या चेहर्यावरचे भाव एकदम बदलले होते. जसा मी त्याच्याजवळ पोहचलो तस मलाही सर्व संपल असच वाटल. समोर एका ऊंच कड्याच्या टोकाशी आम्ही उभे होतो. खाली खोल दरी आणि समोर ते अमानवीय भोई.
भरपुर धावल्यामुळे आमच संपुर्ण शरीर ओलचिंब झाल होतं. थोड्याच वेळात ते भोई आमच्या समोर येऊन उभे राहीले. मी मनातल्या मनात भीमरुपी बोलायला सुरवात केली. तर भिवाची पण परिस्तिथी काही वेगळी नव्हती. आमच्यात आणि त्यांच्यात आता फक्त काही फुटांच अंतर उरल होतं. माझ्या मनात नाना विचार येऊ लागले. एका क्षणात आयुष्याचा कोलाज माझ्या डोळ्यासमोरुन ओझरत निघुन गेला. दुरुन येणारे नगार्यांचे आवाज आता अजुन स्पष्ट एकायला येऊ लागले. इतक्यात समोरच्या पालखीतुन एक नाजुक हात बाहेर आला. व त्याने खुनेनेच पालखी खाली ठेवायला सांगितली. हळुच पालखीचा मखमली पडदा बाजूला झाला. आणि एक सौंदर्यवती त्यातुन बाहेर पडली. तिच्या बाहेर येताच त्या सर्वांनी आपल्या माना खाली वाकवल्या आणि सर्वजन यंत्र मानवाप्रमाने स्तब्ध झाले. साडे पाच फुटा पेक्षा जास्त उंची, कमनीय बांधा आणि एखाद्या राजकन्येला शोभतील असे राजेशाही कपडे. चेहरा तर असा गोंडस की कतरीना, करीनाला ओवाळुन टाकावं. आईशप्पथ लाईफध्ये पहिली वेळ एवढ सुंदर भुत बघत होतो. साला लोक उगाचच भुताच्या स्टोर्या बनवुन सांगतात. भिवा माझ्या मागच्या बाजुला मान खाली घालुन कान्या डोळ्याने तिला बघण्याचा प्रयत्न करत होता. पण भिती मुळे त्याच धाडस काही होईना. त्या आरसपाणी सौंदर्यासमोर खरच मन घायाळ झाल. पहिल्या नजरेतील प्रेम काय असत याची अनुभुती आली.
समोरुन मंजुळ आवाज कानावर आला. "घाबरु नका, तुम्ही मला ओळखत नसाल पण मी तुम्हाला ओळखते आणि मी तुम्हाला वाचवायलाच इथे आले आहे. तूमचा भाऊ पंडीत आता कुठे असेल हेही मला माहित आहे. पण मला तुमची मदत हवी आहे. या गडाला शाप मुक्त करण्यासाठी कारण आज जर का "तो" त्याच्या मनसुब्यांमध्ये यशस्वी झाला तर कदाचित तो एका नवीन पर्वाचा उदय असेल."

"आपण......कोणाविषयी बोलताय? आणि कशावरुन तुम्ही बोलताय त्यात तथ्य आहे. आम्ही का म्हणुन तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा". मी धीर एकवटुन बोललो. "हे बघा! आपल्याकडे फार कमी वेळ आहे. जर का तो त्या वेताळाच्या मंदिरापर्यंत पोहचला तर तुमच्या पैकी कोणीच वाचणार नाही. आणि मलाही त्याच गुलाम बनुन राहाव लागेल. तो सांगेल ते ऐकाव लागेल. आज एवढी वर्ष तो याच क्षणाची वाट पाहात होता. सर्व योग त्याच्या मनाप्रमाने जुळुन आलेत. त्याला हवा तसा नरदेह मिळालाय. नाही-नाही आपल्याला त्याच्या सिध्द्दी मध्ये विघ्न आणलंच पाहिजे".

"पण तुम्ही स्वत कोण आहात? आणि तो म्हणजे? तुम्ही राजा भ्रमर वर्मा बद्दल बोलताय का?". "ना..ही.......! ते माझे वडील नाहीत" ती जवळ जवळ ओरडलीच.
"म्हणजे....तुत... तुम्ही राजा भ्रमर वर्मा च्या कन्या आहात?"

"हो.. मी त्यांचीच ज्येष्ठ कन्या राजकुमारी आरोही आहे. आणि ज्यांना तुम्ही भ्रमर वर्मा समजताय ते माझे वडील नसुन त्यांचाच जुळा भाऊ आणि माझा काका समर वर्मा आहे. माझ्या वडीलांनी कठोर मेहनत आणि तपश्चर्येने वेताळाला प्रसन्न केल होतं आणि त्याच्या मुळे ते आपल्या प्रजेच शत्रु राज्यांपासुन संरक्षण करु शकत. ते कलासक्त होते. कित्येक कलाकारांना राजदरबारी त्यांनी अभय दिल होतं. व्यापार उदीमही त्यांच्या काळात भरभराटीस आला होता. प्रजेच्या सुखासाठी वाट्टेल ते करायची त्यांची तयारी होती आणि वेताळाच्या सिद्धी मुळे त्यांना ते सहज शक्यही होते. परंतु याच्या अगदी उलट माझा काका होता. त्याला त्याच वेताळाच्या मदतीने सर्व साम्राज्य हस्तगत करायच होतं. त्याला सर्व प्रदेशावर त्याची दहशत आणि अंकुश ठेवायचा होता. त्याचे हे मनसुबे ज्याक्षणी वडीलांच्या लक्षात आले त्याचक्षणी त्यांनी एक राजपत्रक काढुन राज्यातुन त्याची हकालपट्टी केली.
सर्व जनतेसमोर झालेल्या हकालपट्टीमुळे तो सुडाग्नीने पेटला होता. त्याचाच बदला म्हणुन अशाच एका स्रर्वपित्री अमावस्येला जेव्हा बाबा वेताळाची उपासना करत होते. तेव्हा याने त्यांचा पाठलाग करुन तो मंत्र मिळवला. या मंत्राची खासियत अशी आही की संपूर्ण विवस्त्र होऊन १०८ वेळा तो अखंड बोलावा लागतो आणि एकदा का शेवटचं उ्च्चारण झाल की मंत्र म्हणणारयाने स्वताला त्या अग्नी कुंडात झोकुन द्यायच. यामुळे वेताळाला नरबळी पण मिळायचा आणि वडीलांच्या उपासनेवर खुश होऊन त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अभय मिळायच. त्यानंतर जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा हा मंत्र बोलला की सर्व पित्र तुमच्या कामास हजर मग अगदी काही असुदे. पण सत्तेच्या हव्यासापायी त्याने मंत्रोच्चारण चालु असतानाच होमकुंडात जनावराची चरबी ओतली. ज्यामुळे ज्वालाग्नी भडकाला. आणि दचकल्यामुळे वडिलांच्या नामस्मरणात खंड पडला. बस्स त्याच क्षणी वेताळाचा कोप झाल्यामुळे वडिलांना त्यांचे प्राण गमवावे लागले. त्यानंतर आम्हा सर्वांना वाड्यातच नजर कैदेत ठेवण्यात आलं आणि हा स्वताः त्या गादीवर बसला. त्याने मंत्र तर मिळवला पण तो जरा किचकट असल्यामुळे त्यालाच समजेल अशा सांकेतिक भाषेत वाड्यासमोरील शिळेवर तो कोरुन घेतला. त्यानंतर सुरु झाल अत्याचाराच पर्व. त्याने सर्व प्रदेश काबीज करायला सुरवात केली. जनतेचे अतोनात हाल होऊ लागले. सर्व कलाकारांचा राजआश्रय काढुन घेण्यात आला. पुर्वी जी जनता आपलं आयुष्य सुद्धा आपल्या राजाला मिळो अशी प्रार्थना देवाजवळ करायची तीच जनता आता त्याच्या मरणाची वाट पाहु लागली. आम्ही नजर कैदेत असलो तरी लोकांना संशय येऊ नये म्हणुन राजदरबारात सर्वांसमोर आम्हाला नेहमीसारखीच वागणुक मिळत असे. फक्त कोणाला भेटण्याची परवानगी अजिबात नव्हती. त्याच कारणही त्याने तितक्याच हुशारीने राज्यात पसरवलं कि आपल्या राजमाता म्हणजे आमच्या आऊसाहेबांची तब्येत ठिक नसल्यामुळे त्यांना अविरत विश्रांतीची गरज आहे. तो सर्वांच्या डोळ्यात धुळ फेकत असला तरी आमच्या प्रधानांच्या डोळ्यातुन यासर्व गोष्टी बरोबर टिपल्या होत्या कारण तेच आमच्या गुप्तचर विभागाचे प्रमुख होते आणि आमच्या वडिलांनंतर राज्यातील जनता त्यांचाच शब्द वंद्य मानत असे. त्यांनीच आपल्या गुप्तहेरांमार्फत सर्व गोष्टींचा व्यवस्थित पाठपुरवठा करुन सर्व गोष्टी आमच्या पर्यंत नीट पोहचतील याची काळजी घेतली. आणि मग प्रधानांच्या मदतीने त्याचाच डाव मी त्याच्यावर उलटवला. ज्या पध्दतीने त्याने बाबांच्या पुजेत विघ्न आणलं त्याच मार्गाने आम्हीही त्याला जायबंदी केलं. परंतु मरता-मरता आक्रोशाने त्याने शाप दिला, "हे सर्व साम्राज्य मी मरताक्षणी नाश पावेल, राजकुमारी आरोही. माझ्याबरोबर तुही यापुढे या गडावर शापित बनुन राहशील आणि ज्या सर्वपित्री अमावस्येला मला एखादा नरदेह पुन्हा प्राप्त होईल त्या दिवशी मी वेताळाला परत प्रसन्न करुन या संपुर्ण साम्राज्यावर माझ राज्य आणेन. आणि पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे".

मी जितक्या आर्ततेने कानात प्राण आणुन तिची गोष्ट ऐकली होती. तितक्याच घायाळ नजरेने तिला न्याहाळत होतो. पण क्षणात स्वताला सावरुन मी तिला विचारले, "पण मी तर वाचल होत की राजा भ्रमर वर्माच्या तीस राण्या होत्या आणि त्यातल्या आठव्या राणीने सत्तेच्या हव्यासापायी राजाचा घात केला". मी माझ विकी पिडीयाच तुनतुन वाजवल.

"हो होत्या ना! पण त्या माझ्या वडिलांच्या नसुन माझ्या काकाच्या होत्या. त्यानेच आजुबाजुच्या राज्यातुन त्या हस्तगत केल्या होत्या. बाकी हे आठव्या राणीने घात केला वैगरे मीही पहिल्यांदाच ऐकतेय". आता माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडु लागला. म्हणजे मगाशी घोड्यावर पंडीत नसुन त्याच्या शरीरावर ताबा घेतलेला समर वर्मा होता. आणि तो आता नरबळी द्यायला चालला होता. माझी दातखिळिच बसली........मी डोक्याला हात लावुन खाली बसलो.

"तुम्ही काळजी करु नका! आज काही करुन आपण त्याला त्याच्या मनसुब्यांमध्ये यशस्वी होऊन द्यायच नाही". तिने मला तिच्या नाजुक हातांनी हळुच वर ऊठवल. असं वाटत होतं जणु सर्व विश्व थांबलय आणि आम्ही दोघेच या प्लॅनेटवर जिवंत आहोत.





No comments: