Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Sunday, June 4, 2017

मि. अँड मिसेस पाटील - धरनीकंप



वारः सोमवार, वेळः पहाटे ६ वाजता.
मी गाढ झोपेत असतानाच धान्न..धान्न..धान्न्न... अचानक जमीनीला हादरे बसायला सुरवात झाली. माझ्या मेंदुला काही कळायच्या आतच मी शेजारीच झोपलेल्या माझ्या साडेतीन वर्षाच्या छकुलीला कवटाळलं आणि शेजारच्या टेबलखाली जाऊन बसलो. बहुतेक भुकंप झाला होता. मला चटकन भुकंप झाल्यावर कसा वाचवाल जीव? या वायझेड चॅनलवरच्या कार्यक्रमाची आठवन झाली. मी लेकीला छातीशी कवटाळल आणि दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत घेऊन भिंतीला टेकुन बसलो. अचानक झालेल्या प्रकारामुळे मुलगी पार गांगरुन गेली होती. तिच्या एकंदर चेहयावरचे भाव "ए पप्पाड्या तुला काही कळत की नाही?" असे सांगत होते. काही वेळातच हादर्यांचा आवाज बंद झाला. इतक्यात माझी लेक मला ढोमसत म्हणाली "ए पप्पा मला सोडनां मला मम्माकडे जायचय". "अरेरे मला एका क्षणात माझ्या अर्धांगिणीची जाणीव झाली. कुठे आहे ती? तिला पाहायला टेबला बाहेर आलो. पोरगी एव्हाना मला हिसके देऊन हॉल मध्ये पळाली होती.  



मी हॉलच्या दिशेने निघालो तसा परत धान्न धान्न...धान्न्न्न.....आवाज सुरु झाला. पाहतो तर काय आमच्या सौ रश्शीवरच्या उड्या मारण्यात गुंगल्या होत्या. आमच पासष्ठ किलोच धुड लीलया खालीवर जाताना पाहुन मगाशच्या हादर्यांचा उलगडा मला झाला. 

सौ नी ग्रे कलरचा लेगीन्स आणि वर पिंक कलरचा टी शर्ट घातला होता. केस एकत्र मागे ओढुन पोनी टेल घातली होती. एकंदर प्रेगन्सी नंतर वाढलेल्या वजनामुळे ती फीट कमी आणि फॅटच जास्त वाटत होती. मी न राहावुन बोलला काय गं आज सुर्य पश्चिमेला कसा? नाही म्हटल गेली दोन वर्ष ओरडत होतो. "व्यायाम कर "व्यायाम कर! पण तु जागची हलली नाहीस उलट मलाच बोलायचीस आधी स्वतःच पोट बघा, तुम्ही आता बदलात, तुमचं माझ्यावर प्रेमच राहील नाही, ऑफिसात फिगर वाल्या पोरी बघता आणि घरी येऊन मला ऐकवता. भेटली असेल कोणीतरी सटवी चवळीच्या शेंगेसारखी...नुस्ती च्यावच्याव...नाही म्हटल जे करतेस ते स्वागतार्हच आहे. पण अचानक हा बदल कसा काय झाला?

अहो काही नाही मला माझी चुक लक्षात आली. तुम्ही बिचारे सतत माझ्या मागे लागायचात पण मीच तुम्हाला काहीही बोलायचे. पण नाही, "मला आता व्यायामाच महत्व कळु लागलय". (एका दिवसात मी मनातल्या मनात) मला सौ बंदुकीच्या गोळ्या मधात बुडवुन डागतायत अस वाटु लागलं. चेहरा काहीसा हसरा करतच मी म्हणालो चला बर झालं देर आये दुरुस्त आये. ते सोडा हे पहा माझे नवीन शुज, (दोन्ही पाय जवळ करुन हात कटीवर ठेऊन फक्त डोळे शुजवर..एकदम रुक्मीनी अवतार) पुमाचे आहेत आणि ही बॅग नाईकेची. आणि हो आज दुपार पासुन मी चळवळकरांच्या स्पेशल वेट लॉस बॅचला जाणार आहे. तेही अन्युल सब्सक्रिप्शन मी केलय परवाच्या शनिवारी. अरे व्वा करत मी मनातल्या मनात या बाईने क्रेडीट कार्डला कितीचा घोडा लावला ह्याचे हिशेब करु लागलो.

बर मी आंघोळ करुन यतो, माझा टिफिन तर रेडी आहे ना? अहो म्हणजे काय, "हो पण आता नेहमीसारख तेलकट तुपकट आणि चमचमीत खायला मिळणार नाही, आमच्या सरांनी आम्हाला डाएट चार्ट दिलाय तोच आता घरात फॉलो होणार. आईच्यान हा सर म्हणजे नक्कीच कोणी तरी दिव्यात्मा असला पाहीजे. ज्या बायका उभ्या आयुष्यात आपल्या नवर्याच ऐकत नाहीत त्या एका दिवसात या सरांच ऐकायला लागतात. मला तर त्याच्याकडुन एखादा तावीज वैगरे मिळतो का ते पहाव अस वाटु लागल.
चला आता माझा वेळ खाऊ नका, तुमचा टीफिन आणि बॅग भरुन ठेवली आहे. आंघोळ करुन किचन मध्ये ठेवलेले ओटस खाऊन घ्या. माझे अजुन तीन सेटस बाकी आहेत. धान्न् धान्न..धान्न...परत रश्शी गिरणीच्या पट्याप्रमाणे फिरु लागली. मला उगाचच खालच्या मजल्यावरुन कोणीतरी शिव्या देतय असा भास होऊ लागला. तर माझी कन्या तिच्या बाजुला उभी राहुन कमॉन मम्मी करत जागच्या जागी उड्या मारु लागली. काहीही असो नेहमीच गाऊन मध्ये दिसनार आमच ध्यान आज जिमच्या पेहरावात एकदम हॉट दिसत होत. मला बॅक ग्राऊंडला "हळद आणि चंदनाचे गुण समावे संतुर त्वचा आणखीन उजळे संतुर..संतुर. हे गाण लागल्याचा फील आला. मी खांद्यावर टॉवेल घेऊन बाथरुम मध्ये निघुन गेलो.