Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Friday, October 5, 2012

भोलागडी ....................!

“ बोरणे” सातारा जिल्ह्यातील छोटेसे खेडे पण आज आदर्श ग्राम पुरस्कारामुळे जिल्ह्यात नावारुपाला आलेलं. गाव तसं छोटसच पणं निसर्गरम्य. परळी पासुन पुढे घाट रस्त्याने सज्जणगडला वळसा मारुन गेल की रस्त्यावरच बोरण्याची वेस खुणावते. गावात जेमतेम ८०-९० घरं. त्यात गाव दोन आवाडात विभागलेल. वरच आवाड आणि खालच आवाड. रस्त्याला लागुनच जिथुन एसटी वळते तिथे पिठाची गिरणी जिच्या चिमणीचा सतत होणारा कुक्क कुक्क आवाज गावच्या निरामय शांततेत एक वेगळाच नाद ऊमटवत असतो. तर वरच्याच बाजुला पाण्याची टाकी आणि तीसं एक घरं तिथुनच अजुन वर गेल की डोंगराच्या घळीतच विसावलेल ऋषी आईच देवस्थान. गावच्या यात्रेच्या वेळी तळातल्या केदारेश्वराच्या मंदीरापासुन ऋषी आईच्या घळीपर्यंत आब्दागिर्‍या नाचवत आणि नवसकरयांचे दंडस्तान घालत जाण्याची प्रथा आहे. मग तिथे पोहचलं की गावच्या “नानु” गुरवाच्या अंगात ही ऋषी आई येते व गावावर येणारया संकटाची पुर्व कल्पणा देते असा ग्रामस्थांचा समज. आणि कित्येक वेळेला ऋषी आईने दिलेल कौल तंतोतत बरोबर लागले असल्यामुळे त्रुषी आईच्या निर्णया विरुध जाण्याची कोणाचीच टाप नसते. आणि तसे कोणी केल्याचा प्रयत्न केलाच तर गावचं पंच मंडळ त्याला योग्य ती शिक्षा देते.

खालच्या आवाडात केदारेश्वराच कौलारु मंदीर.गाभार्‍यात केदारेश्वराची कातळात कोरलेली ठाशीव कोरीव मुर्ती आणि तिला लावलेल पांढरे भोर डोळे. मंदीराच्या गाभार्‍यात बसुन कुठुनही पाहील तरी देव आपल्याकडेच पाहात आहे अस प्रत्येकाला वाटणार. मंदीराच्या मधोमध फार पुर्वी कुणी तरी नवसकर्‍याने वाहीलेली पितळेची घंटा जी आजही तीन्ही प्रहर नानु गुरव वाजवतो. गावात एखाद चांगल वा वाईट काही झाल तर घंटेच्या विशिष्ट टोलांवरुन लोकांना घटनेचा अंदाज येतो. मंदीराच्या बाहेरच करुणं नजरेणे देवाकडे पाहणारा नंदी आणि त्याच्या गळ्यात दगडातच कोरलेली घंटा पाहुन आपोआप आपला हात त्याच्या पाठीवरुन फिरवला जातो. नंदीच्या थोडं बाजुलाचं धाग्यांचा कंबर-पट्टा घातलेलं आणि आपल्या पारंब्या अस्ताव्यस्त सोडलेलं वडाचं मोठ्ठं झाड आहे. ज्याला गावातले जुने-जाणते लोक आज्याबा (आजोबा) असे संबोधतात.ते नक्की किती जुनं आहे याच्या गप्पा त्याच्याच सावलीत पारावर बसुन पान तंबाखु खात जुनी जाणती मानसं मोठ्या अभिमानाने रंगवतात.

चौथरा ऊतरुन खाली गेल की सिमेंटचा कायमस्वरुपी बांधलेला रंगमंच जिथे जत्रेत दिवसा तमाशाचा फड आणि रात्री गावातल्याच पोरांचं एखाद नाटक असतं. तिथुनच जरा पुढे उजव्या हाताला वळुन सरळ चालत गेलं कि पुढं कुस्त्यांच मैदान जिथे यात्रा भरण्याच्या दिवशी संध्याकाळी कुस्त्यांना सुरवात होते. अगदी पाच वर्षाच्या गण्यापासुण चाळीसीला पोहचलेले खाशाबा सर्वजण आपआपले दंड या रांगड्या मातीत थोपटवतात.सुरवात नारळाच्या कुस्ती पासुण होते ती नंतर हजारांच्या आणि ईभ्रतीच्या घरात पोहचते.मग त्यात गावातल्याच एखाद्या बहाद्दराने जर द्सर्‍या गावातल्या एखाद्या नामचीन मल्लाला आभाळ दाखवलं तर गुलाल ऊधळत बैलगाडीतुन पठ्याची जंगी मिरवणुक ठरलेली.

जत्रेच्या रात्री देवाच्या सासण काठ्या नाचवत ऋषी आईचा छबीना गावतल्या मंदीरापासुन निघतो. गावातल्या प्रत्येक घरासमोरुन फिरत फिरत शेवटी गावतल्या चांदणी चौकात सर्व गावकरी जमतात आणि ढोल झांजेच्या तालावर “डाव” म्हणजेच पारंपारिक न्रुत्य सादर करतात. त्यांनंतर गावातलचं लहाण पोरांचं कला पथक मास्तरांच्या शिट्टीच्या तालावर गोफ विणत छान लेझीमप्रकार सादर करतं. त्यात पथकात गर्दीतल्या कोणां ना कोणाचं लेकरु असल्यामुळे सार्‍या बघ्यांच्या चेहर्‍यावर कौतुक आणि अभिमानमिश्रित भाव दाटतात.

मंदीराच्या मागेच पहिली ते चौथी पर्यंत प्राथमिक शाळा आणि आजुबाजुला आंब्या फणसाची भरपुर झाडं त्यामुळे सकाळी शाळा असेपर्यंत चिल्या पिल्यांची चीव चीव आणि दुपारनंतर पक्ष्यांची किलबिल सतत परिसरात ऐकु येते. मंदीराच्या समोरच्या उतरंडीच्या रस्त्यावरुन खाली सरळ उतरत गेल की खालचं आवाड लागतं जिथे पन्नास एक घर असतील. आणि तिथुन पुढे डाव्या हाताला वळालं की “ती”वाट सुरु होते. होय तीच वाट कारण लोक दिवसा सुद्धा त्या वाटेचे नाव घ्यायचे नाहीत. कारण फार पुर्वी कधी जत्रेतच ऋषी आईने तस सांगितल होतं. त्या वाटेच नाव “भोलागडी” . भोलागडीचा रस्ता दोन्ही बाजुंनी जगंल असल्यामुळे एकदम शांत. दिवसा सुद्धा एखादा वाटसरु त्या रस्त्याने जात असेल तर केदारेश्वराच नाव घेतच जाणार. त्यातच मधुनच एखादा सरडा वैगरे गवतातुन सळसळ करत गेला तर भर दिवसा अंगावरचे सगळे केस सावधान स्तिथीत आल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे सहसा एकटं कुणीच त्या वाटेला जात नसे आणि त्यातही काही काम पडल तर दिवस उजाडल्यानंतर लोक समुह करुन एकत्र जात आणि संध्याकाळ व्ह्यायच्या आत घरी परतत. त्यात भिती दायक म्हणजे गावचा म्ह्सवटा याच भोलागडीच्या वाटेवर.

 या म्ह्सवट्याच्याही वेगवेळ्या कथा गावातले लोक सांगतात. कोणी सांगतो म्हसवट्याच्या पुढे जो माळ आहे तो भुताचा माळ आहे. दर आमावस्येला रात्री तिथुन वेताळाची पालखी निघते, ढोलांचे आवाज येतात आणि मशाली नाचवल्या जातात. त्यात चुकुन जर तुम्ही कधी “त्यात” सापडलात तर काही आरडा ओरडा न करता त्यांच्या सारखंच नाचत पुढे जात राहायचं आणि तरी पण त्यांना तुमचा वास आलाच तर…...?! ह्या प्रकाराची वाच्यता कुठेच करायची नसल्यामुळे सर्वजण गप्प राहाणेच पसंद करतात. ह्या सर्वा मागे कारणही तसेच आहे. दरवर्षी भोलागडी यात्रेआधी एक तरी बळी घ्यायचीच आणि आत्तापर्यंत भोलागडीने भरपुर जणांचा बळी घेतला होता. त्यात लग्नाच्या वराडा सकट पाच सहा मिलेट्रीतल्या लोकांचापण समावेश होतां. बाजुच्याच गावतले काही तरुन सैन्यातुन स्वेच्छानिव्रुत्ती घेऊन घरी आले. पण ते घरी पोहचलेच नाहीत. त्यांच पुढे काय झाल याच ऊत्तर फक्त भोलागडीलाच माहीत आहे.

म्ह्सवट्याच्या बाजुलाल एक छोटस तळं आहे. त्याला सर्वजण बांबर असे संबोधतात. या तळ्यातल्या पाण्यानेच केदाराला आंघोळ घालण्याची प्रथा आहे. कारण कोणत्याही व्यक्तीचा त्या पाण्यास स्पर्श होत नसल्यामुळे तेच पानी देवाच्या आंघोळीस योग्य आहे असे नानु गुरवाचे मत त्यामुळे तोच फक्त भल्या पहाटे उठुन भोलागडीत जायचा आणि बांबरा वरुन पाणी आणुन देवाला आंघोळ घालायचा. त्याच्या अंगात ऋषी आईच ठान असल्यामुळे त्याला कशाचीच भीती वाटत नाही ह्याचा लोकांना हेवा वाटायचा. आजुबाजुच्या गावातही त्याचा दबदबा होता. कुठुन-कुठुन लोक त्याला आपले प्रश्न वि्चारायला येत मग कोणाच लग्न जमत नसेल. मुल होत नसेल. भावकीचा तंटा, जमीण जुमला असले सतराशे साठ प्रश्न घेऊन लोक नानु गुरवाकडे येतं.

"नानु गुरव" साठीच्या आसपास झुकलेला. पाच साडे पाच फुट उंची. मध्यम आंगकाठी सावळा रंग. अंगात नेहमी सदरा लेंगा. कपाळाला गुलालाचा टिळा. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा. चेहर्यावर दाडीच खुंट वाढवलेलं. लांब राखलेले जटाधारी केसं आणि करडी नजर यामुळे पाहताक्षणी ह्यो कुणीतरी पावरबाज भगत आहे याची जाणीव होणार. गावातली सगळी लहाण पोरं त्याला दबकुणच राहायची. बायको फार पुर्वीच कधीतरी वारली त्यानंतर त्यानेच एकुलत्या एक पोराला लहाणाचं मोठ केलं पण मुलाच्या लग्नानंतर नवीन सुनेच आणि नानु गुरवाच कधी पटलंच नाही मग मुलगा त्याच्या बायकोला घेऊन कायमचाच ईचलकरंजीला निघुण गेला तो परत आलाच नाही. कुणी सांगतं तो तिकडं गिरणीत काम करतो म्हणुन. त्यामुळे देवदेवस्की करुणच नानु गुरव त्याचा चरितार्थ चालवत होता.

नानु गुरवाच्या आंगातल्या वार्‍यानेच सुचवल की दरवरर्षी यात्रे आधी बांबरावर रेड्याचा बळी दिला तर कोणतीही जीवितहानी होणार नाही. तेव्हापासुन भोलागडीत रेड्याचा बळी देण्याची प्रथा गावात रुळली होती. परंतु आबासाहेबांच्या समाजप्रबोधनामुळे गेल्या आठ-दहा वर्षात गावात बदलाचे वारे वाहु लागले होते.
“आबासाहेब” सैन्यातुन निव्रुत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या मुळ गावीच राहण्याचा विचार केला. सैन्यातील सवयीप्रमाणे नेहमी दाढी केलेली. गव्हाळ वर्ण आनि ओठांवरील तलवारकट आणि जोडीला निसर्गदत्त शरीराची देणगी त्यामुळे पाहताक्षणी समोरील व्यक्तीवर त्यांची छाप पडणारच. गावातल्या तरुणांनी शिकुन बाहेर न जाता गावातच राहुन गावचा विकास साधावा असा त्यांचा आग्रह.

पुढाकाराने त्यांनी बळीची प्रथा बंद पडली, गावात प्राथमिक शाळा सुरु झाली, घरोघरी शौचालये आली, बायोगॅसची निर्मीती करण्यात आली, वीज आली त्यामुळे गावात मनोरंजणाची साधणे उपलब्ध होऊ लागली. तालुक्याच्या काही कंपण्यामध्ये भुमी पुत्रांना कामे मिळावी यासाठी त्यांनी भरपुर आंदोलणे केली आणि त्यात त्यांना यशही आले. गावातली शिकलेली पोरं शहरात न जाता गावातच राहु लागली. घरापुढे आता एखाद दुसरी दुचाकी दिसु लागली. त्यांच्या हातात मोबाईल दिसु लागले. गावात महिलांचे बचत गट स्थापण केले जाऊ लागले एकंदर गावात आर्थिक सुबत्ता येऊ लागली. त्याचाच परिणाम गेल्याच वर्षी गावाला “आदर्श ग्राम”पुरस्कार जाहीर झाला. आणि गावात एक चैतन्याची लहर उसळली जो-तो आबासाहेबांच कौतुक करु लागला. परंतु रुपयाला दोन बाजु असतात काही जुन्या खोडांना बळीची प्रथा बंद पडली हे अजिबात पसंद नव्हते. त्यात अग्रक्रम होता तात्या सरपंचांचा.

"तात्या सरपंच" गौरवर्ण कांती, सतत पानं खाऊन रंगलेले ओठ, अंगात सदरा आणि त्यावर नेहरु जॅकेट. नेहमी शुभ्र धोतर आणि डावी भुवयी वर करुण बोलण्याची सवय.गावचे सरपंच आणि पंचायत समीतीचे अध्यक्ष आणि यंदा खासदारकीचे संभाव्य उमेदवार यामुळे आवाजात आपोआप आलेला माज.
आबांची वाढती लोकप्रियता पाहुन सरपंच मनातुन त्यांच्यावर जळायला लागला होता. आणि या आगीत तेल ओतण्याच काम नानु गुरव करु लागला. अंध श्रद्धा निर्मुलणामुळे त्याच्या भगतगिरीलाही ओहोटी लागत होती. त्याने कित्येकदा ताकीद ही दिली तुम्ही ऋषी आईच म्हणनं टाळताय पण लक्षात ठेवा झोपलेली "भोलागडी" जागी झाली तर परत किती जणांचा बळी घेईल ते ॠषी आईच जाणो. नाही म्हणता गावातल्या जुन्या लोकांना ह्या घटनांचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या काळजात चर्रर्र.. व्हायचं पण तरण्या कमावत्या पोरांपुढं त्यांच काय चालायच नाही. शेवटी व्ह्यायच नाही तेच झाल दोन वर्षांपुर्वीच भोलागडीचा रस्ता जिथुन सुरु होतो त्याच्या थोडे अगोदर आबासाहेबांच शेत होतं.त्या शेतात त्यांनी तात्या सरपंच आणि नानु गुरवा्ची मते झुगारुन प्राथमिक शाळेत शिकवणारया शिंदे सरांना ग्राम फंडातुन घर बांधण्याची परवाणगी दिली. एकतर येवढ्या वर कोणी शिक्षक टिकत नसे आणि आलाच तर लगेच बदलीचा तगादा लावत असे यात विध्यार्थ्यांचे नाहक नुकसाण व्हायचे यावर तोडगा म्हणुन एखाद्या शिक्षकाला ईथेच त्याच्या कुटुंबासह राहण्याची व्यवस्था केली तर प्रश्न कायमचा सुटेल म्हणुन आबासाहेबानी शिंदे सरांना गावातच राहण्याची विनंती केली.
शिंदे सर त्यांच्या दोन्ही मुलांना आजोळी ठेऊन बायकोसह गावात राहायला आले पण जेमतेम सहा महिनेच झाले असतील. सर त्यांच्या मुलांना आजोळाहुन आणायला गेले असताना त्यांच्या बायकोने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. नानु गुरवानेच विशिष्ट आवाजात घंटा वाजवुन सार्‍या गावाला कल्पणा दिली घटनेनंतर तात्काळ आबांनी गुरुजींशी संपर्क केला असता ना त्यांचा फोन लागेना वर त्यांच्या सासुरवाडीत चौकशी केली असता कळाले की गुरुजी तिकडे आलेच नाहीत. सुरवातीला सर्वांनाच काहीतरी काळ-बेरं असण्याचा संशय आला. गावात निरनिराळ्या चर्चाना उधान आलं मास्तराची बायको म्हणे वागायला नीट नव्हती, मास्तर नेहमीच तिच्यावर संशय घ्यायचा. सर्वांनी निष्कर्श काढला की गुरुजींनीच आपल्या बायकोचा खुन करुन तिला फासावर लटकावले आणि पोलिसांपासुन वाचण्यासाठी पोबारा केला. परंतु पंचनामा आणि तपासावरुन काहीच निष्पन्न न झाल्यामुळे सर्वांच्या भुवया आपोआप टवकारल्या गेल्या कारण यात्रेच्या हप्ताभर आधीच ही घटणा घडली होती. नानु गुरवसह सर्वांना भोलागडी परत खुणाऊ लागली. गत वर्षीच्या यात्रेतही ॠषी आईने कौल दीला होता जुन्या प्रथा बंद पाडाल तर असंच होईल म्हनुन. आता गावात दोन गट निर्माण होऊ लागले होते नानु गुरव, तात्या सरपंच आणि सुधारक आबासाहेब.

"आसक्या ऍए…. "आसक्या आरं ऊठ आता उन्ह वर आल्याती. गेलं दहा ईस दीस झाल तालमीचा बी पत्ता न्हाय तुझ्या. अशानं यंदाच्या जत्रतं नारळावर कुस्ती लढणार हायस व्हयं. चल ऊठ आता. हे तालुक्याला पेन्शन आणायला गेलंत. ते यायच्या आधी आवारल पायजे नायतर तु उंडागशील गावभर, मला मेलीला सतराशेसाठ प्रश्नांची ऊत्तरं द्यावी लागत्यात. आधीच तु तालमीच खाडं करतुयास तर ह्यांच मला रोज ऐकुण घ्यावं लागतयं. त्यात हे दिसभर गावच्या प्रश्नांच्या मागं मी म्हणते माणसांण जरा शेरिराला आराम द्यायला पायजेल का नको. आईच्या बोलण्यानं आसक्या न हळुच डोक्यावरची वाकाळ बाजुला केली आणि माडीच्या खिडकीतुन बाहेर पाहीले. बाहेर छान रिमझिम पाऊस पडत होता. आईनं सकाळीच लावलेल्या रेडिओवर आशा ताईंचं छान येरे घना……… चालु होते आणि त्या सुरांमध्ये आईचे सुर खो घालत होते. एकंदर त्याला अजिबात उठण्याची ईच्छा होत नव्हती पण आबा यायच्या आत खरंच आवरलं पाहिजे नाहीतर ते सैन्यातल्या शिस्तीतला बडगा दाखवल्या शिवाय राहणार नाहीत हे त्याला चांगलच ठाउक होतं त्याने हळुच आपली नजर आईकडे वळवली. आई त्याच्यासाठीच कोपर्‍यातल्या बंबामधुन आंघोळीच पाणी बाहेर काढत होती.
"आसक्या" उर्फ अशोक आबा कदम जेमतेम पंचवीशीतला तरुण, उंची पाच फुट दहा इंच, गव्हाळ वर्ण, तालमीत कमावलेल शरीर आणि कुस्तीत कमावलेल नाव यामुळे तालुक्यात तो चांगलाच प्रसिध्द होतां.तालुक्याच्याचं कॉलेजमधुन त्याने आपल महाविद्द्यालयीन शिक्षण पुर्ण केल होतं.
आणि आबांच्या शब्दाखातरच तो गावातल्या शाळेत पोरांना शिकवण्याच काम करत होता. मास्तरांच्या प्रकरणामुळे नवीन कोणी मास्तर गावात यायला तयार नव्हते. त्यामुळे नवीन मास्तर येईपर्यंत तरी त्याला पर्याय नव्हता. आणि असला तरी उक्ती प्रमाणे क्रुती या आबासाहेबांच्या वक्तव्याला धरुन गावासाठी काहीतरी करण्याची उर्मी बाळगुण चालणारा तो होता. त्यात आबासाहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे नुकताच त्यांच्या “बोरणे” गावाला आदर्श गाव पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे आबासाहेबांचा सुपुत्र त्यांच्यासारखाच नाव कमावणार ह्याची सर्वांनाच खात्री होती.

अशोक ने आंघोळ केली आणि न्याहारीसाठी तो आई समोर बसला, तशी आईची टकळी पुन्हा सुरु झाली. आसक्या एक ईचारु गेलं? दहा-पंधरा दीस झालं. ना तुझ तालमीवर ध्यान ना जेवणावर. सांच्याला जातोस ते रातच्यालाच घरला येतोस. लेकरा रात्र वैर्‍याची हाय आता यात्रा पंधरा दिवसांवर आली हाय. त्यात माझ्या मनात उगाच धाकधुक लागुन राह्तीया. त्यो नानु गुरव म्हणत होता ह्या वर्षी भोलागडी गप्प बसणार न्हाय म्हणुन. आणि तसंच झालं बघं. तात्या सरपंचाची तरणीताठी पोर सुमी गेलं दहा दिस झाल येड्यावाणी करतीया. मध्येच रातच्याला किंचाळत उठतीया. शुन्यात नजर लाऊन बसतीया. मधीच घोगर्‍या आवाजात काय बी बडबडती त्यांना घेऊन या. माझी पोरं कुठं हायतं? मला भोलागडीत जायचयं आणि मध्येच ऊठुन भोलागडीच्या दिशेने पळायला लागते. गावातली लोक म्हणतात कि तिला मास्तराच्या बायकोने झपाटलयं खर खोटं देव जाणो. सोन्यासारी पोरं, बाप हाय आक्करमाशी पण पोरीन कुणाच वाईट केल व्हत? चांगल ठरल्याल लगीन मोडलं नवरा म्हण मंबईला ईंजीनिअर होता. देवा त्या निष्पाप लेकराला बर कर रे बाबा.
"आई तुला आता कळलच आहे तर सांगतो. मास्तर गायब होण्या आधीच्या रात्री त्यांचा मला फोन आला होता. बोलताना काहीशा घाबर्‍या आवाजात ते मला एवढच म्हणाले अशोकराव... अशोकराव.... मला तुम्हाला..........! ईतक्यात अचानक फोन कट झाला. आणि दुसर्या दिवशीच मास्तरांच हे अस प्रकरण झालं. गावात नाना वावग्या उठल्यात. तात्या सरपंचासह सर्व लोकांना वाटतय की आबांच्या नवीन प्रथांमुळे परत काहीतरी वाईट होणार म्हणुन. काही लोक म्हणतात मध्यरात्री भोलागडीतुन बाईच्या जोराने किंकाळण्याचे आवाज येतात. हे बघ आजच्या विज्ञाननिष्ठ जगात माझा भुता-खेतांवर आजिबात विश्वास नाही. तरीही ही लोक ह्या जुन्या चालीरीतींना पकडुन स्वताचा अहंकार आणि मोठेपणा वाढवण्यासाठी आबांच्या नावाला काळीमा लावण्याचा प्रयत्न करत असतील तर मी या प्रकरणाच्या मुळाशी जाणारच. आणि मला आतुन काहीतरी जाणीव होत आहे नक्कीच मास्तरांना काहीतरी कळाल असणार ज्यामुळे हे सर्व महाभारत घडतय ह्या सर्वांचा नक्कीच नानु गुरव आणि तात्या सरपंचाशी काहीतरी जवळचा संबंध असला पाहीजे.
"आर पण तु एकटा दुकटा रातच्याला असं फिरतोस ते भी भोलागडीच्या दिशेनं, मला काय धा पोर हायती? ते काय न्हाय आजपासुन तु साळा सुटली की येळेवर घरी येत जा बघु, “त्या गुरवाला नी तात्याला काय नागवं नाचायच हाय त्ये नाचु दे त्यो बसलाय ना तिथ वर त्यो बघतोय सर्वांना वरुणं. आई तु नाहक काळजी करतेस. पहीली गोष्ट मी एकटा अजिबात नाही. गावातल्या सर्व तरुन पोरांना यात्रेच्या आधी ह्या प्रकरणाचा छडा लावायचा आहे. आम्हाला पण बघुदे ती “भोलागडी” काय करते ते. आरं पण मी म्हणते ईषाची परीक्षा कराचं का? आर आमच्या ल्हानपणी तुझी आजी आमासनी नावं बी घिऊन द्याची नाय त्या वाटंच. वरच्या आवाडातला त्यो लगंडा किसन्या असाच यात्रं आधी गायब झाला. कुणी म्हणतं त्यो सरपाणं (जळाऊ लाकडं) आनायला भोलागडीच्या दिशेने गेला होतां तो परत आलाच न्हाय. एकदा साळुंकं वाडीच्या दोघा तिघांनी भोलागडीतुन जाताना त्याच्या काठीचा आवाज एकला व्हता मागं वळुन पायलं तर किसण्या काठीचा आधार घेत पाय फेकत-फेकत हळु हळु बांभराच्या दिशेने चाल्ला व्हतां. ह्ये नक्की त्योच हाय का म्हुण बगाया गेले तर किसण्या गायबं. मग पुरी वाट संपपतुर त्यास्नी त्यो काठीचा आवाज ऍकु येत होता. मग काय घरी गेल्याव तिघांनी बी आंग धरलं.आईच्या गोष्टीवर अशोक एकदम शांत झाला आणि नंतर मोठ्याने हसत-हसतच म्हणाला. आई आता मलाबी किसण्या तात्याला भेटावसं वाटतय. तेव्हा मंगल बाई त्याला काहीश्या दरडावणीच्या स्वरातच बोलल्या, “ त्ये तुमच ईद्न्यान बिदन्यान मला काय कळत न्हाय पण ज्या आर्थी आपण देवाची पुजा करतो त्या अर्थी दुष्ट ताकद बी असते या ईश्वात. एकदमच न्हाय मानुन कस चाललं समधं. शेवटचा घास खात अशोक हसतच आईसमोरुन उठला.

दिवसभराची काम आटपुन दिवेलागणीच्या सुमारास आबासाहेब घरी आले. त्यांच्यापाठोपाठ अशोकही घरी आला. "या अशोकराव तुमच्यासाठी खुशखबर आहे. काय झाल आबा?. " अरे काही नाही सकाळी्च पेन्शन आणायला गेलो होतो ना तेव्हा तसाच जिल्हा परिषदेच्या ऑफिसात जाऊन आलो लवकरच आपल्या शाळेला अनुदान आणि शिक्षक मिळणार आहे. त्यात यात्रा दहाच दिवसांवर आली आहे.
एक दोन दिवसात मिटिंग घेऊन सर्व तयारी केली पाहीजे.

"व्वा काय सांगता आबा अशोक खुश होऊन म्हणाला. चला या गावच्या गढुळ झालेल्या वातावरणात काहीतरी चांगल ऍकायला मिळालं. एवढ्यात आतुन आवाज आला बापबेट्यांच संभाषण संपल असल तर हात पाय धुऊन आत या पान तयार हायती.

रात्री पुन्हा जोरदार पावसाला सुरवात झाली. अशोक ह्या सर्व प्रकरणाचा विचार करत बिछान्यावर आडवा झाला. त्याच्या मनात एक ना हजार शंका आता घर करु लागल्या. आपण काय करतोय याची पुर्ण जाणीव असुनही आता मध्येच हे सुमीचं काय प्रकरण आहे? का आई म्हणते तस खरचं काही असतं. माडीच्या खिडकीतुन छान हवेची झुळुक येत होती. विचारांच्या गर्तेत त्याला कधी डोळा लागला ते कळालच नाही.
मध्यरात्री हळच अशोक ला आपल्याला कोणीतरी हलवुन जाग करत आहे याचा भास झाला. सुरवातीला त्याने दुर्लक्ष केल पण परत तेच आता मात्र त्याला पुर्ण खात्र्री झाली की आपल्याला नक्कीच कुणीतरी हलवले. त्याने तोंडावरची वाकळ बाजुला केली. तश्या माडीच्या खिडक्या जोरात उघडझाप करु लागल्या आत येणारया वार्‍याचा रोरावणारा आवाज तो स्पष्ट पणे ऍकु शकत होता. तो खिडकीच तावदान लावयला गेला आणि समोरील द्रुश्य पाहुण अवाक झाला. दोन डोळे त्याच्याकडेच रोखुन बघत होते. त्याला हातवारे करुन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्याने झटकन कपाटातुन विजेरी काढली आणि तो खाली गेला. तशी ती आक्रुती त्याच्यापासुन दुर जाऊ लागली. अशोकला आपल्या बाजुला कुणीच दिसत नव्हते. समोर विजेरीच्या प्रकाशात तो वाट शोधत चालु लागला.आपल शरीर आता आपल नसुन आपण कोणत्या तरी वेगळ्याच विश्वात अलगद तरगंत आलो आहोत याची जाणीव त्याला झाली. थोड्या वेळाने ती आक्रुती चालायची थांबली. आणि पुन्हा अशोकला खाणाखुणा करु लागली. पण त्याला काहीच समजेणा. त्याने आजुबाजुला पाहीले आणि आपण कशात तरी रुतत खाली जात आहोत म्हणुण विजेरी आजुबाजुला फिरवली तस त्याच्या काळजात धस्स झालं. तो दुसरीकडे कुठेही नसुन भोलागडीतल्या बांबराच्या मधोमध होता. चारी बाजुला फक्त तळ्याच हिरवगार पाणी आणि त्याला रोखुण पाहत काहीतरी सांगणारी सावली. अशोकला जोरात ओरडावेसे वाटत होते. पण त्याच्या गळ्यातुन आवाजच निघत नव्हता. तो त्याचे हातपायही हलवु शकत नव्हता. हळुहळु त्याचा संपुर्ण देह पाण्याचा खाली जात होता. आधी पाय मग कंबर , मान आणि शेवटी…………….! एक मोठ्ठा बुडबुडा पाण्याच्या तरंगातुन वर आला बांबरातल हिरवगार पाणी त्रुप्तीचा ढेकर देऊन पुन्हा शांत झाल होतं.


आईईईईईईईईईईगंग्ग्ग्ग्ग्ग..........आणि मध्यरात्री पुन्हा तीच जोरदार किंकाळी सार्या गावात दुमदुमली. तसा अशोक जोरात दचकुन ऊठुन बसला त्याच संपुर्ण शरीर घामाघुम झाल होतं. आपल्याला पडलेल्या या विचित्र स्वप्णाचा त्याला काहीच अर्थ लागत नव्हता. तो हलकाच बिछान्या वरुन ऊठला. उठल्यानंतर त्याला जाणवल की आपल्या संपुर्ण शरीरातील त्राण गेल आहे. कसाबसा चालत माठाजवळ गेला आणि थंड पाण्याचे हाबके त्याने स्वताच्या तोंडावर मारले. थोड पाणी पिल्यानंतर आता त्याला बर वाटु लागलं होतं.
नेहमीप्रमाणे नानु गुरव भल्या पहाटेच घागर घेऊन भोलागडीच्या दिशेने निघाला. रात्रभर पाऊस पडल्यामुळे रस्त्यावर बर्यापैकी चिखल झाला होता. सकाळच्या धुक्यात चिंब वारा अजुनच अंगाला झोंबत होता. शांततेमुळे पाटाच्या पाण्याचा खळखळणारा आवाज अधिक स्पष्टपणे जाणवत होता. त्यात काल रात्रीची किंकाळी त्यानेही ऐकली असल्यामुळे कधी नव्हे ती त्याचीही पा्चावर धारण बसली होती.
चालता चालता नानु गुरव मास्तराच्या घरासमोर आला तसा समोरील द्रुश्य पाहुन सर्रकन त्याच्या अंगावर काटा उभा राहीला. घराबाहेर मस्तपैकी सडा रांगोळी केली होती. आणि खिडकीच्या आतुन दिव्याचा मंद प्रकाश दिसत होता. त्या मंद प्रकाशातही कसली तरी सावली सरकल्याचा भास त्याला झाला. आणि उगाच वाटुन गेले की कोनीतरी आतुन त्याच्यावर डोळे वटारुन बघतय. त्याने डोळे किलकिले करुन पाहीले तर खरच दोन डोळे त्याच्याकडे त्वेषाने पाहात होते. ईतक्यात दरवाजा आतुन जोरात ठोकण्याचा आवाज ऐकु येऊ लागला. नाही सोडणार………..नाही सोडणार…….मला बळी पाहीजे……..गुरवा! जा त्यांना घेऊन या, माझी पोरं कुठ आहेत? मी कुणालाच नाही सोडणार. नानु गुरवाने घागर तिथेच टाकली आणि जिवाच्या आकांताने तो मंदीराच्या दिशेने पळत सुटला. जणु काही ती सावली त्याचा पाठलाग करत असावी.
मंदीरात शिरताच त्याने जिवाच्या आकांताने घंटा वाजवण्यास सुरवात केली. घंटेच्या अशा विचत्र आवाजाने सारा गाव जागा झाला. आबासाहेब आणि अशोकससुद्धा तडक मंदीराच्या दिशेने निघाले. मंदीरात पोहचताच पाहतात तर काय नानु गुरव तोंडाला फेस येऊन जमीनीवर पडला होता. त्याची दातखिळी बसली होती. आणि अंग तापानं फणफणले होते.तो डोळ्यांनी खाणाखुणा करुन झाला प्रकार सांगण्याचा प्रयत्न करत होता पण शरीर साथ देत नव्हते.

नानु गुरवाला लगेचच तालुक्याच्या दवाखाण्यात नेण्यात आले. ईकडे गावभर चर्चांना नुसते उधान आलेलं यात्रा हप्त्यावर आलेली असताना गावात हे असे चमत्कारी प्रकार घडु लागले होते. त्यात गावच्या गुरवाचीच दातखिळी बसली म्हणजे नक्की भोलागडीत काहीतरी उलथा पालथ चालु आहे असे भरपुर जणांना वाटु लागले.संध्याकाळ झाली की गावातल्या बाया-बापड्या लहाण पोर हिंडेणासी झाली.त्यात झाला प्रकारावर चर्चा करण्यासाठी आबा आणि पंचांच्या पुढाकाराने रात्री सर्वांनी केदारनाथाच्या मंदीरासमोरील पटांगणात जमण्याचे ठरवले.

रात्री ठरल्याप्रंमाणे सर्वजण मंदीराच्या प्रांगणात जमले. मंदीराच्या प्रांगणातच उजव्या बाजुला पंच मंडळी तर त्यांच्या समोरच सतरंजीवर गावकरी समोरासमोर बसले. उगीचच खोगीर भरती आणि विषयाला फाटे नको म्हणुन घरपट एकच माणुस बोलावण्यात आला होतां.
नानु गुरवाच्या अनुपस्तिथीत खिशातुन तंबाखुची पिशवी काढत पोलीस पाटलानेच विषयाला सुरवात केली.
"हे बघा! यात्रलां आता फकस्त सहाच दिस र्हायल्यात, सुमीच्या तब्येतीमुळं तात्या सरपंच आज येऊ शकले नाहीत तवा त्यांच्या आणि नानु गुरवाच्या माग आपल्या समध्यासनीच समद बघाया लागणार हायं, मग ती नवसकर्यांची यादी असो, गावची वर्गणी असो वा कुस्त्यांचा फड परत्येकानं आपल काम यवस्तीत वाटुन घ्येतल मग झाल. ऋषी आई आणि केदारबा बसलेत चांगल वाईट बघाया. तवा काय बी काळजी करायची गरज न्हाय.
पोलीस पाटलाचा शब्द पडतो न पडतो साबळ्याचा देनबा बोलला, "पाटील समद बरुबर पण नानु गुरवाच काय? गड्यान आस काय बघीतल? जे तोंडाला एकदम फेसच आला त्याच्या, आणि त्याच्या मागं केदारबाचा अभिषेक कोन करणार? का यंदा बी भोलागडी बळी घेणार यात्र आधी? यावर पंचामधील भगवान नाना बोलु लागले, हे पहा भीतीने घाबरुन आपण जुन्या चालीरीती बंद पाडु शकत नाही. चालीरीती प्रमाणे यात्रेच्या सहा दिवस आधी पासुन यात्रा संपेपर्यंत रोज रात्री ऋषी आईच्या घळीत दिवा जाळायचा असतो. पण नानु गुरवाच्या माग आता आपल्यापैकी कोणाला तरी हे काम केलच पाहीजे.
यावर पोलीस पाटीलच म्हणाले "ती काळची तुम्ही करु नका, ह्ये बघा गॅलण. घरुण येतानाच मी आज तेल घेऊन आलोय. गावात कणची भुतं नाचायची हायत ती नाचु द्या ऋषी आईसमोर दिवा ज़ळणारच.
" हे अगदी छान झाल हा "आबा म्हणाले, "हे भुत बीत काही नसत, "हा मी पुर्वजांच्या प्रथेच्या आड नाही. पण ह्याच प्रथांचा वापर करुण जर कोणी गाववाल्यांची फसवणुक करत असेल तर मात्र हा मोठा अपराध आहे.
बैठकीतल्या काही जणांना आबांचे शब्द बरोबर समजले होते.
"हीथे जिवंत माणुसच माणसाचा वैरी आहे.तिथे भुताच काय घेऊन बसलात, त्यातच जर एखादा मुंजा बिंजा भेटलाच वाटेत तर या तंबाखु देऊन "आबा म्हणाले. तसे पंचासहीत सर्वजण हसायला लागले. यात्रेच्या तयारीविषयीची सर्व बोलणी झाल्यानंतर सर्वजन ऊठुन आपआपल्या घरी जायला निघाले एव्हाना बर्‍यापैकी अंधार झाला होता. मगाशी ठरल्याप्रमाने पोलीस पाटील आणि देनबा तेलाचं गॅलन घेऊन ऋषी आईच्या घळीच्या दिशेने वर जाऊ लागले.
वरच्या आवाडातली घर मागे पडेपर्यंत दोघे व्यवस्थीत एकमेकांशी झाल्या प्रकारावरुन चर्चा करत जात होते.
मगाशीच त्यांनी तात्यांच्या घरापासुन जाताना सुमनच्या ओरडण्याचा आवाज ऐकला होता. तेव्हा न राहवुन देनबा पाटलाला बोलला "पाटील काय झाल आसल वो सुमनला? यावर पाटील एकही शब्द न बोलता त्याने फक्त हातानेच त्याला गप्प राहण्याची खुण केली. आता गाव बर्‍यापैकी मागं पडलं होतं. समोर फक्त छोटीसी पायवाट आजुबाजुला करवंदीच्या जाळ्या आणि मधीच एखाद आंब्या फनसाच झाड. वातावरणात गुढ अशी शांतता भरुन गेलेली. आणि ती शांतता त्या दोघांव्यतीरिक्त फक्त रातकिडेच मोडण्याचं धाडस दाखवत होते.
ईतक्यात चालता चालता देनबा मध्येच थबकला. त्याला आस मध्येच थांबलेल पाहुन पाटील चपापला. त्याने डोळे मोठे करुन त्याला श्श्शश्श्स्स्स्स्स्स्स्स. केलं आणि आपला हात काणाकडे नेऊन शांत पणे काहीतरी ऐकण्यास सांगितले. तसे दोघेही घाबरुन कानोसा घेऊ लागले तसा वार्‍याच्या घोंगावणार्‍या आवाजा बरोबर त्यांना एक वेगळाच आवाज येऊ लागला.
धिन धिन तक.तक.....धिन धिन तक तक........धिन धिन तक तक.........आता दोघांच्याही पोटात भितीचा गोळा येऊ लागला. आवाजाच्या भीतीने दोघेही झपाझप पावल ऊचलु लागले. जस जसे ते घळी च्या दिशेने जाऊ लागले तस तसा तो आवाज अजुनच मोठा होऊ लागला. देनबा बरोबर असल्यामुळे कदाचित पाटील घाबरत का होईना पण पुढे पुढे चालत होता. आता बस अजुन एक वळण घेतल की उजव्या बाजुलाच घळ होती पटापट तेल ओतल की पळायच इथुन पाटील मनाशीच बोलत होता. त्याने हळुच देनबाला आवाज दिला. पण कसलीच चाहुल लागेना म्हणुन पाटलाने मागे वळुन पाहीले. तसे त्याच्या काळजात धस्स झाले.मागे कुणीच नव्हते. देनबा घाबरुन मागच्या मागेच पळाला होता. त्यात समोरील द्रुश्य पाहुन तर पाटील थरथर कापायलाच लागला. घळीत अगोदरच दिवा जाळला होता आणि समोरच दिव्याच्या मंद प्रकाशात पाच सहा माणस संथ तालात गोल गोल फिरत होती. त्यांनी गुडघ्यापर्यंत धोतर घातले होते. आणि डोक्यापासुन घोंगड्या बांधल्या होत्या, आणि त्यांच्या रिंगणात त्याच वेषातली दोन माणसं चमड्याचे ढोल संथ लयीत बडवत होते. धिन धिन तक तक......धिन धिन तक तक.......धिन धिन तक तक... ...............


समोरील द्रुश्य पाहुन पाटील आता फक्त चक्कर येउन पडायचाच बाकी होता. भीतीने त्याचे हात पाय थरथर कापु लागले. एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात येऊ लागले. कोण असतील ही माणसं? नक्की माणसचं की? आणि तसच आसलं तर ईथ घळीजवळ काय करतायत? तेवढ्यात त्याच लक्ष घळीतल्या प्रकाशाकडे गेलं त्या मिनमिनत्या प्रकाशात आज ऋषी आईची शेंदरी मुर्ती जास्तच रागीट दिसत होती.
ही आगळ्या वेगळ्या पेहरावातली माणसं, त्यांच वाद्य, त्यातुन उमटणारा नादमय आवाज आणि त्या नादावर त्यांची संथ चाललेली हालचाल सार काही विलक्षण. डोक्यावर बांधलेल्या घोंगड्यामुळे जरी त्यांचे चेहरे दिसत नसले तरी चंद्राच्या शीतल चांदण्यात त्यांच्या सावल्या भयान वाटत होत्या. ते फिरत असताना अस वाटत होतं जणु काही प्रत्येक सावली दुसर्या सावलीला गिळंक्रुत करतेय. एवढ्यात अचानक घळीवर बसलेल्या पांढर्‍या घुबडाने मान फिरवत घुगुत्कार केला तसा पाटील झाडीत चाचपडला.
त्या आवाजामुळे रिंगणात बसलेल्या दोघांपैकी एकाने हळुच आपला उजवा हात वर केला. तसे सर्व फिरायचे थांबले. संपुर्ण वातावरणात गुढ शांतता भरुण गेली. तेव्हा मगाच्याच माणसाने हळुच पाटील उभा असलेल्या दिशेने आपली मान वर केली. घोंगड्याच्या आवरणामुळे जरी त्याचा चेहरा पाटलाला दिसत नसला तरी त्याची "ती" तिक्ष्न नजर पाटलाला जाणवली. जणु काही त्या नजरेणे त्याचा ठाव घेतला असावा. आणि परत एकदा घुबडाने जोरात पंख फडफडत घुघुत्कार केला तसा तो इसम त्वेषात ओरडला. "सावज आलय"............".जा धरा त्याला". त्याचे हे विखारी शब्द कानावर पडताच पाटील जीव घेउन काटे कुटे तुडवत गावच्या दिशेने पळत सुटला.

सार गाव झोपेच्या आधीन असताना मध्यरात्री पुन्हा तीच काळीज हेलावणारी किंकाळी सार्‍या आसमंतात भरुन गेली. किंकाळीच्या आवाजाने तात्यांना जाग आली पाहातत तर काय सुमण केस मोकळे सोडुन झप झप पावलं टाकीत बाहेरच्या दिशेने निघाली होती. आज त्यांनी तिचा पाठलाग करायच ठरवल. क्षणाचाही विचार न करता तात्या तिच्या मागे चालु लागले. सारा गाव भितीच्या गोधडीत शांत झोपला होता. सुमन वरचा आवाड ऊतरुन खाली शाळेपाशी आली व अचानक थांबली जनु तिला तिच्या मागावर कुणीतरी आहे ह्याची माहीती असावी. तिने एका झटक्यात मागे वळुन पाहीले. तसे तात्या चपापले. तेच रोखुन बघणारे डोळे आणि ओठांवर छद्मी हास्य. ऐन गारव्यातसुदधा तात्यांच्या कपाळावर घाम साचु लागला. तात्या तिला दिसणार नाहीत अशा रीतीने तिचा पाठलाग करत होते त्यामुळे जशी सुमन थांबली तसेच ते ही कमाणीच्या बाजुला असलेल्या चक्कीजवळ अंग चोरुन उभे राहीले. सुमन ने आज काळी साडी घातली होती पौर्णिमेच्या चांदणात तिचा नितळ गोरा रंग जास्तच उठुन दिसत होता. कपाळाला भल मोठ कुंकु, हातात हिरव्या बांगड्या आणि चालताना तिच्या बांगड्यांचा आणि पैजणांचा होणारा नादमय आवाज सार काही विलक्षण.
सुमण पुन्हा भोलागडीच्या दिशेने चालु लागली आणि मंदीराच्या पुढे जाताच अचानक दिसेनाशी झाली. पाठलाग करत करत तात्या मंदीरासमोर आले. आजुबाजुची भयाण शांतता सोडली तर तिथे कोणीच नव्हतं. अंधारात मंदीरा समोरचा आज्याबा आज जास्तच अक्राळ विक्राळ दिसत होता. त्याच्या प्रत्येक पारंबीत त्यांना नाना आकार दिसत होते. ईतक्यात मध्येच भोलागडीच्या दिशेने त्यांना कोल्हेकुई ऐकु आली. चपापुन त्यांनी झाडीत त्या दिशेने पाहीले असता. त्यांना पुन्हा तेच रागाने तांबारलेले डोळे दिसले. जे त्यांच्याकडेच रोखुन पाहात होते. हळु हळु त्या डोळ्यांची आक्रुती मोठी होत- होत त्यांच्या दिशेने वेगाने सरकायला लागली. तात्यांची बोबडीच वळायची बाकी होती. त्यांनी तडक घरच्या दिशेने धुम ठोकली.
घरात येताच त्यांनी तडक दाराची कडी लावुन दिवा लावला. आणि समोरील द्रुश्य पाहुण ते अचंबित झाले कारण सुमण हॉलमधल्या सोफ्यावर शांत झोपली होती. मग आत्ता आपण जिचा पाठलाग केला ती कोण होती. भीतीने त्यांचे हात पाय थरथर कापायला लागले. त्यांना आपण किती मोठ्या संकटातुन वाचलो आहोत याची जाणीव झाली.
घळीची पायवाट जिथुन सुरु होते तिथेच साबळे हनुमान चालीसा बोलत उभा होता जवळच्याच मोठ्या दगडावर चढुन तो पाटलाची वाट बघत बसला. समोर सारं गाव शांत निजलेल त्याला दिसत होतं. त्याला आता स्वताचाच राग येत होता. घरी गप्प सुरक्षित झोपायच सोडुन इथे असल्या भीतीदायक वातावरणात उगीचच आलो आपण. त्यात मगाशी जरा लघवीसाठी हलकं व्हायला झाडाच्या मागं गेलो तर पाटील त्याच्याच तंद्रीत पुढं निघुन गेला. आपली काय टाप झाली नाय त्याच्या माग जायची. त्यात काहीवेळापुर्वीच त्यानेही "ती" किंकाळी ऐकली होती. आणि थोड्याचवेळात तात्या त्याला चक्कीच्या ईथुन धावत पळत वरच्या आवाडात येताना दिसले. एवढ्या रात्री आणि तात्या आसं का घराबाहेर पडल्यात? का सुमीच काही? नक्कीच काहीतरी झाल आसल पाहीजे. तो दगडाच्या जरासा खाली उतरुन तात्यांच्या घराकड पाहु लागला.
इतक्यात हळुच आपला हात कोणीतरी साबळेच्या पाठीवर ठेवला. तसं दचकुण त्याने मागे पाहील. दोन तांबारलेले डोळे त्याच्याकडेच रोखुण पाहात होते. त्या भयान शांततेत असलं भयानक रुप पाहुण देनबाने तिथेच डोळे फिरवले. आणि क्षणात बेशुध्द होऊन त्या दगडावरच तो आडवा झाला.
थोड्याचवेळात घामाघुम अवस्थेत पाटील तिथे येऊन पोहचला. त्याचा लेंगा दोन तीन ठिकाणी फाटला होता. पाय ठेचाळल्यामुळे बोटांमधुन रक्त वाहात होतं. त्याने परत मागे वळुन पाहील सार काही शांत होतं मनोमन त्याने केदारबाचे आभार मानले. आता त्याला कोणत्याही परिस्थितीत ईथे थांबायचे नव्हते. आता जरी आपल्या मागे कुणी नसलं तरी नक्कीच कुणीतरी आपल्यावर नजर ठेउन आहे याची त्याला जाणीव झाली होती.

जसा घाई घाईत तो खाली उतरणार तसं बाजुच्या दगडावर त्याला कोणीतरी पालथ पडलेलं दिसलं सुरवातीला त्याला जाम भीती वाटली पण कपडे ओळखीचे वाटल्यामुळे त्याने जवळ जाऊन पाहीलं. "आरं देवा! हा तर देनबा " पाटील हळुच ओरडला" साबळे निपचित पडला होतां श्वासही मंदपणे चालु होता. पाटलाने क्षणाचाही विलंब न लावता पायातली चामड्याची चप्पल काढली आणि साबळेच्या नाकाला लावली. तसा हुक भरल्यासारखा एक दिर्घ श्वास साबळेने घेतला आणि तो शुदधीवर आला. त्याच्या अंगात आता अजिबात त्राण उरले नव्हते. डोळे किलकिले करुण त्याने पाटलाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. तसा पाटलाने हातानेच त्याला शांत राहण्याचा ईशारा केला. हळुच आधार देऊन त्याने साबळेला ऊठवले. दोघांनाही जमेल तितक्या लवकर आता घरी पोहचायचे होते.

झाला प्रकार दुसरयाच दिवशी पाटलाने सर्वांना कथन केला. आता देव कोपला तरी चाललं पण आपण काय त्या भोलागडीत आणि ऋषी आईच्या घळीजवळ फिरकणार नाही ज्याला जमल त्यानं करावं हे. देनबा मात्र काही घराच्या बाहेर पडला नाही. गड्याने धास्ती घेतली कालच्या प्रकाराची तापाने फणफणला नुस्ता. झाल्या प्रकारांमुळे समध्या लोकांना आता भीती वाटु लागली होती. यात्रा भरायला चारच दिवस उरले होते. गावासाठी आत्तापर्यंत फक्त एकच गोष्ट चांगली घडत होती ती म्हणजे अजुनही कोणाचा बळी गेला नव्हता.
आबा आपल्याप्रमाणे सर्व लोकांची समजुत घालत होते. परंतु ते पण झाल्या प्रकारांमुळे अस्वस्थ झाले होते. त्यात सकाळीच तालुक्याहुन काही लोक नानु गुरवाला बघुन आले होते. ते सांगत होते नानु गुरव मध्येच डोळे फिरवतो. काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याला अजुनही बोलता येत नाही. मग डॉक्टर्स सलाईन मधुनच त्याला गुंगीच औषध देउन झोपवतात.
ईकडे अशोक सकाळीच कुणाला न सांगताच घरातुन निघुन गेला होता. आबांनी त्याबद्दल बायकोला विचारल असता त्यांनी सांगितल, "काय न्हाय, म्हणाला बस आजची रात्र शेवटची उध्या उलगडा होईल सर्व गोष्टींचा.
"कसला उलगडा? आबासाहेबांनी विचारल,
"ते तुमच्या सुपुत्राला इ्चारा! काय नीट समजावल तर ना.
आबासाहेबांच्या डोक्यात आता विचारांच न उलगडणार कोड सुरु झालं.
रात्री जेवंण वैगरे आटपुण तात्या सोफ्यात जोरात येरा-झार्‍या घालत होते. परंतु काही केल्या त्यांच्या विचारांची चक्र थांबत नव्हती. त्यांना आता सार कळुन चुकल बस अजुन किती दिवस लपवणार आपण गावापासुन, सुमणची आई गेल्यापासुन आपणच हिला लहाणाच मोठ केलं, तिला काय हवय नको ते पाहिलं. आजपर्यंत जिच्या साठी कमावल तिच पोरगी जर अशी वेड्यासारखी वागत असेल तर काय फायदा? आज नानु गुरव मरता मरता वाचला, पाटील आणि देनबाने पण याची प्रचीती घेतली. कदाचित उद्या आपली पाळी येइल. नको.. नको… बस आता हा पाठशिवणीचा खेळ यावर आता एकच उपाय, उद्या सार्‍या गावासमोर आपल्या गुन्हाची कबुली द्यायची. विचाराच्या गर्तेतच त्यांना झोप लागली.
दुसर्याच दिवशी सकाळी अशोक घरी परतला. परंतु यावेळेला त्या्च्या बरोबर मास्तरांची दोन लहाण मुलं पण होती. त्या अजाण मुलांना आपले आईवडिल दुर कुठेतरी गेलेत एवढच माहीत होतं. अशोकच्या आईनेच त्यांना आंघोळ पांघोळ घालुण त्यांची न्याहरीची व्यवस्था केली. दरम्यान आबासाहेब आणि अशोक सोफ्यात काहीतरी गहण चर्चा करण्यात दंगले होते. इतक्यात देण्या बुवा सांगावा घेऊन आले.
“आबा हायत का घरात?
"अरे कोण हाय?, "देण्या ये. "आत ये. चहा घे ये बस.
आबा चहाच नंतर बघुया आदी मंदीरात चला तात्या सरपंचान मीटींग बुलावलीया आण जोडीला पंच आणि पोलीस पाटील बी हायत. आर पण आस झाल तरी काय? त्ये मला काय बी माहीत न्हाय फकस्त एवढीच खबर लागलीया की गावात जे काय अघटीत चाल्लया त्यासंबधी त्ये काय तरी खुलासा करणार हायतं. मी येतो. तुमी बी लवकर निघा.
"आणं वईनी, ही पोर कुणाची हायती? "ते पण तुम्हाला आजच कळल काका. अशोकने हसतच चहाचा घोट घेतला त्याच्या डोळ्यात आज वेगळीच चमक दिसत होती.
मंदीराच्या भोवताली सारा गाव जमला होता. चौथर्यावर तात्या सरपंच त्यांच्या मागे सुमण, पोलीस पाटील आणि गावचे पंच तर उजव्या बाजुला आबासाहेब आणि अशोक.काहीस चाचपडतच तात्यांनी बोलण्यास सुरवात केली. नेहमी बोलताना ताठ असणारी मान आज मात्र नजरेणेच खालची माती उकरत असावी असं वाटत होतं.

"समस्त ग्रामस्थ मंडळ, मौजे बोरणे, मी..........! मी........! मनापासुन तुम्हा सर्वांची माफी मागतो. सारा गाव काणात प्राण ओतुन तात्यांचे शब्द ऍकत होता. तात्यांनी एक मोठा आवंढा गिळला. आणि ते बोलु लागले. "मी आणि नानु गुरवाणेच मिळुन मास्तर आणि त्यांचा बायकोचा खुन केलाय.
क्षणार्धात गावकर्‍यांत चलबिचल माजु लागली. पंचासह सर्वजण तात्यांच्या या कबुली जबाबावर अवाक झाले. पंचापैकी एकजण बोलला "तात्या तुम्ही हे काय बडबडताय तुम्हाला कल्पणा आहे का?
"तुम्ही खुणासंदर्भात बोलताय तेही एक नव्हे तब्बल दोन दोन खुणांविषयी, ह्याचे परिणाम माहीत आहेत का तुम्हाला? "की तुम्ही कसल्या दबावाखाली हे असले विधान करताय?
"नाही नाही, "मी एकदम खर बोलतोय. "मी माझा खोटा स्वाभिमान लपवण्यासाठी आजतागायत तुम्हा सर्वांच्या डोळ्यात धुळ फेकत आलो. तुमच्या विश्वासाचा मी बळी घेतलाय. मला खरच फार पश्चाताप होतोय या सर्वांचा. माझ्या सारख्या करंट्याला नरकात पण जागा मिळणार नाही.
"अहो तात्या काय करुण बसलात तुम्ही, काय नव्हतं तुमच्याकडे? पैसा, अडका, प्रतिष्ठा आणि सोन्यासारखी एकुलतीएक मुलगी मग का केलतं तुम्ही हे सारं? आबा म्हणाले".
"सांगतो सर्व सांगतो. मला नानु गुरवाने सांगितल होते. येत्या आमावस्येला भोलागडीत जाऊन जर नरबळी देशील तर सत्ता आणि पैसा दोन्ही तुझ्या पायाशी लोळण घेईल. सुरवातीला मन मानायला तयार नव्हतं पण नंतर नानु गुरवाने मला पटवुन दिल की बघा रेड्याचा बळी जवापासनं बंद झालाय तवा पासनं काय बी तुमच्या मनासारख व्हत न्हायं सारी लोकं त्या आबाच्या मागं लागलेली असत्यात.
लोकास्नी ना ॠषी आईची महती पटत ना भोलागडीची मग आपला मीटर कसा चालु राहणार? मला पण त्याच म्हणन पटु लागलं. त्यात आदीच आबासाहेबांनी आमची मत झुगारुन मास्तराला भोलागडीच्या वाटंवर राहायला जागा पण दिली होती. सुरवातीला मी पाटलाला नी देनबाला भोलागाडीबाबत काय बाय सांगुन मास्तराला घाबरावयचं बघितल पण मास्तर भलताच चतुर आणि धीट निघाला.
"म्हणाला मी काय आता गावं सोडुन जाणार नाही. हीच अंधश्रध्दा मला आणि आबासाहेबांना गावातुन हद्दपार करायची आहे. मी काय त्यांच्या शब्दाच्या बाहेर नाही. हा कोण कुठचा मास्तर तात्या सरपंचाच बोलणं झिडकारुन आबासाहेबांच गुण गायाला लागला आमच्या समोर.
बस मग ठरल मास्तराचाच काटा काढायचा. म्हटल ह्यातल काय कळल तरी भोलागडीवर बील फाडता येइल. त्यादिवशी रात्री मास्तर त्याच्या बायकोबर गप्पा मारत बसला होता. तेव्हा मी आणि नानु गुरव पुर्ण तयारीनिशी त्याला तिकडे बोलवायला गेलो. तेव्हा कळलं मास्तर दुसर्‍या दिवशीच पोरांना आणायला जाणार आहे म्हणुन. आम्ही त्याला म्हटलं मास्तर तयारी नंतर करा आधी आमच्या बरोबर चला. आबासाहेबांनी तातडीने बोलावलय.
"एवढ्या रात्री? काही अतिमहत्वाचे आहे का? मास्तराने विचारल!
"तसंच समजा हव तर. नानु गुरव बोलला.

त्यांने आपल्या बायकोला येतो गं म्हनुन शेवटचा आवाज दिला. मग आम्ही त्याला आबासाहेबांच्या घराकड न नेता भोलागडीच्या दिशेने घेऊन जाऊ लागलो. आता मात्र मास्तराची पावल जड पडायला लागली. बांबरावर पोहचलो तोपर्यंत आमच्या आधीच दोन काळी धिप्पाड पारध्याची पोर तिथ येऊन उभी होती. त्यांनी बांबराच्या समोर व्यवस्थीत गुरवाने सांगितल्या प्रमाणे तयारी करुन ठेवली होती. मास्तराला नक्कीच काहीतरी वाइट घडतय याची चाहुल लागताच. पटकन आपल्या खिशातुन त्याने मोबाईल काढला आणि अशोकला फोन केला. पण आमच नशीब चांगल. तो पुढे काही बोलणार ईतक्यात त्या दोन पारध्याच्या पोरांपैकी एकाने त्याच्या हातातुन मोबाईल हिसकावुन घेतला. आणि कोयत्याने वार करुन तिथेच संपवला मास्तराला. मग नरबळीची पुजा संपवुन त्याच्या प्रेताच्या गळ्यात भला मोठा दगड बांधला आणि दिला तळ्यात टाकुन. त्यानंतर आम्ही सर्व पुन्हा मास्तराच्या घरी आलो तर त्याची बायको वाट बघत बसली होती. आम्हाला समोर बघताच ती नाना प्रश्न विचारु लागली. मग आम्हाला कळलं हिला जिवंत सोडल तर आपली कायं खैर नायं. मग पुरावा संपवण्यासाठी तिला पण संपवल गळफास लाऊन. समोर मरण बघताच जाम घाबरली होती बिचारी. सतत विनवनी करत होती. माझ्या पोरांसाठी तरी सोडा मला. पण आमच्याकडे पर्याय नव्हता. एक बळी लपवण्यासाठी आम्ही दुसरा बळी दिला होता.

तात्यांच्या खुलाश्याने भर दिवसा गावकर्‍यांच्या डोळ्यासमोर काजवे चमकले. त्यांना त्यांच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. ज्या नानु गुरवाच्या शब्दाला आपण ॠषी आईचा शब्द मानुन चालत आलो. ज्या तात्यांना सरपंचपदाच्या निवडनुकीत बिनविरोध निवडुन दिलं त्यांनीच असा घात करावा. म्हणजे एवढे वर्षं देवाच्या नावाखाली निव्वळ आपली फसवणुक झाली. एवढ्यात आबासाहेब उठले आणि सरपंचाना उद्देशुन म्हणाले. सरपंच काय होत्याच नव्हत करुन बसलात तुम्ही. मी कधीच तुमच्याशी इर्षा बाळगली नाही नेहमी गावाच्याच भल्याचाच विचार केला. त्याचाच परिणाम म्हनुन गेल्या काही वर्षात सोन्याचे दिवस आले गावाला. पण तुमच्या अशा पाताळयंत्री कारस्थानामुळे गावाच नाव धुळीला मिळालं आज. पण मला एक गोष्ट कळत नाही तुम्हाला अचानक ह्या सर्व गोष्टींचा खुलासा करवासा का वाटला?
तात्या काही बोलणार ईतक्यात सुमनच म्हणाली, "मी सांगते आबासाहेब.
"मी तात्यांच आनि गुरवांच बोलण एकदा चोरुण ऐकल होतं. एकल्यानंतर माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मग तात्यांना धडा शिकवण्यासाठी मीच हे वेडेपणाच नाटक करायच ठरवलं. आपल्या स्वतच्याच हाताला चटका बसला की कसं जळजळतं हेच मला त्यांना दाखवुन द्यायच होतं आणि ते यशस्वी ही झालं. तात्यासाहेब माझे वडील असले म्हणुन काय झालं असल्या नराधम बापाची मुलगी म्हणुन जगण्यापेक्षा मी बांबरात उडी घेईन.
तात्यांनी त्यांच्या मुलीकडे आसवांनी भरलेल्या करुन नजरेणे पाहिले. तशी सुमन ने मान फिरवली.
एवढ्यात अशोक ने बोलण्यास सुरवात केली, "तात्यासाहेब मला फार पुर्वीच ह्या क्रुत्याची कल्पणा आली होती. कारण मास्तरांच्या गायब झाल्यानंतर, त्यांच्या शेवटच्या कॉलच्या टॉवर लोकेशनची माहीती मी मिळवली आणि ती आपल्याच गावचा पत्ता सांगत होती. त्यामुळेच मला या गोष्टींचा जास्तच संशय आला, आणि मग मी त्याचा पाठपुरवठा केला. मग विचार केला ज्या भीतीचा तुम्ही ईतके वर्ष वापर केला त्याच भीतीने तुमचा काटा काढायचा. मग गावातले आम्ही दहा-बाराजण एकत्र आलो आणि पहिलं भोलागडीच्या रस्त्यावर नानु गुरवाला टार्गेट केलं. मग त्यानंतरच्या बैठकीत आमच्या मानसांकडुन कळालं की देनबा आणि पाटील घळजवळ जाणार आहेत. मग ऋषी आईजवळ पाटील, आणि शेवटी तुम्ही. त्या किंचाळ्याचे आवाजही आम्हीच इंटरनेटवरुन डाऊनलोड केले होते. आणि काल रात्री पण आम्हीच मंदीराजवळ दबा दबा धरुन बसलो होतो. किंचाळीचा आवाज एकुण तुम्ही सुमन पाठोपाठ मंदीराकडे येताना दिसलात मग आम्ही ही संधी दवडायची नाही असे ठरवलं. निरनिराळे आवाज आणि प्रोजेक्टरचा वापर करुन आम्ही तुम्हाला घाबरवलं तुम्ही थेट घरी पळालात. आणि आज ईथे उभे आहात आरोपीच्या पिंजर्‍यात.आज तुमच्यामुळेच मास्तरांची पोर अनाथ झाली आहेत. तात्यांच्या तोंडुन शब्दही निघत नव्हता. पंचांनी त्यांचा जबाब नोंदविल्यानंतर रीतसर सर्वांच्या सह्या घेण्यात आल्या. पोलीस पाटलाने सर्व कागदपत्र गोळा करुन तालुक्याच्या पोलीस ठान्यात वर्दी दिली. पोलीसांची अटक होताच तात्यांना आपले अश्रु अनावर झाले ते आबांजवळ गेले आणि फक्त दोनच शब्द म्हणाले माझ्या सुमनला अंतर देऊ नका……!
आपल्या वडिलांना असं आरोपी झालेल पाहुन सुमनच्या डोळ्यातुन अश्रु वाहु लागले. कसही झालं तरी जन्मदाते वडील होते ते आईच्या निधनानंतर त्यांनीच तिचं संगोपण केल होतं. सुमणला असं रडताना पाहुन आबा तिच्या जवळ गेले आणि म्हणाले, "पोरी मला तुझ्या धैर्याच कौतुक वाटतय स्वताच्या जन्मदात्या बापालाही त्याच्या चुकीची शिक्षा द्यायला तु कचरली नाहीस. बस आता तु कुठेही जायच नाहीस चल माझ्याबरोबर. सुमन, आबासाहेब आणि अशोक तिघेही घरी आले. मास्तरांची दोन्ही मुल जेवुन शांत झोपली होती. तर मंगलबाई शेजारीच त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवत बसल्या होत्या.
त्यांना त्या दोन चिमुकल्या जीवांकडे बघुन गलबलुन येत होतं.
जेवणं झाल्यानंतर सर्वजण माडीवर शांत गप्पा मारत बसले होते. थोड्याचवेळापुर्वी अशोकचे मित्रही येऊन त्यांच्या बैठकीत सामील झाले होते.
मग आबासाहेबांनीच विषयाला हात घातला. अरे पोरांनो तुमच्या हुशारीच आणि धाडसाच कौतुक केल पाहिजे. नाहीतर अशी भीतीदायक कल्पणा वापरुन खुद्द आरोपीलाच बोलत करायच म्हणजे खरच कठीण काम. पण मला एक सांगा तुम्ही नानु गुरवाला अस काय केलतं? ज्याने तो सरळ इस्पितळातच भरती झाला.
"आबा खर सांगु! "श्याम्या" बोलता झाला. त्यादिवशी अशोकने ठरवल्याप्रमाणे आम्ही शाळेच्या बाजुला “किंकाळीची” व्यवस्था करुन ठेवली. पण स्वतः अशोक काही त्यादीवशी आलाच नाही. मग आम्हीच इमानेइतबारे किल्ला लढवायच ठरवलं. मी सुर्‍या आणि रमेश बरोबर मास्तरांच्या घराकडं गेलो. तर तिथ आधीच रांगोळी वैगरे काढुन ठेवली होती. आणि आत दिवा पण लावला होता. आम्हाला वाटल अशोकने अगोदरच सर्व तयारी करुन ठेवली असावी मग आंम्ही निसटलोच तिथुन. आणि पुढचा प्रकार सर्वांना माहीतच आहे.
"अरे काय माहीत आहे? "अशोक सांगु लागला, मी तर त्यारात्री भोलागडीच्या दिशेने फिरकलोसुद्धा नव्हतो. त्यात जर तुम्ही तिथुन निसटला होतात. मग नानु गुरवाला कुणी घाबरवलं? त्याने अस काय पाहील? उलट दुपारीच तात्यांचा खुलासा ऐकल्यापासुन माझं मन बैचेन झालंय. आदल्या रात्रीच मला बांबरावरुन विचित्र स्वप्न पडले होते. अशोकने आपल्या भीतीदायक स्वप्नाविषयी सर्वांना सांगितलं.
"मला तर काहीच कळत नाहीये. "रमेश पुढे बोलु लागला, आमचं कौतुक तर सोडाच आम्ही नेहमी तिघे चौघे बरोबर फिरायचो पण ही सुमण तर वाघीन आहे. कालच्या रात्री किंकाळीचा आवाज येऊन गेल्यानंतर कोणीतरी बाई काळी साडी घालुन बिनधास्त भोलागडीच्या दिशेन चालली होती. नक्की काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी जेव्हा सुर्‍या बाहेर पडु लागला तेव्हा कोणीतरी येण्याची चाहुल लागली पाहील तर तात्या दबकत दबकत त्या बाईचा पाठलाग करत होते. आणि ती बाई दुसरी तिसरी कोणी नसुन त्यांची मुलगी सुमन होती. तिचा तो अवतार पाहुन खरच आमचा धीर झाला नाही तिला थांबवण्याचा. इतक्यात मध्येच भोलागडीच्या दिशेने जोरात कोल्हेकुई ऐकु आली आणि जोरात वारा वाहु लागला तसे आम्ही चपापलो पुन्हा सावध होऊन पाहील तेव्हा सुमन तिथे नव्हती. मग आम्ही मात्र प्रोजेक्टरचा वापर आणि निरनिराळे आवाज करुन तात्यांना पळता भुई थोडी केली. घाबरुन तात्या जोरात घरच्या दिशेने पळत सुटले.
त्याचवेळेस अशोक इतर मावळ्यांबरोबर घळीजवळ दबा धरुन बसला होता. त्या सर्वांनी तिथे अशी काय वातावरण निर्मिती केली होती की पाहनार्‍यास वाटावे की साक्षात भुतंच आपल्यासमोर नाचत आहेत. पाटलाची चांगलीच तंतरली होती. त्यात रिंगणात बसलेल्या संज्या ने जेव्हा "सावज............... आलयं असा आवाज दिला तेव्हा तर पाटील भोवळ येऊन पडायचाच बाकी होता. गडी एकदम तुफान एक्स्प्रेस सारखा धावत सुटला गावाकडं.
"पण एक गोष्ट आम्हाला कळली नाही ती म्हणजे देनबाने असं काय पाहील? ज्यामुळे तो बेशुध्द होऊन पडला. दुसरया दिवशी काही विचारलं तर काही बोलायलाच तयार नव्हता. पण त्याच्या डोळ्यात मात्र विलक्षन भिती दिसत होती.
हे बघा काही कोडी न सोडवनेच चांगली असतात.नाहीतर उगाच गुंता वाढत जातो. "आबासाहेब बोलु लागले, मला आमच्या सैन्यातल्या एका अधिकार्‍याचे एक वाक्य नेहमी आठवते. प्रत्येक आघाताला प्रतिआघात होतोच. ज्यांनी केल त्यांना त्यांची शिक्षा मिळालीच. त्यामुळे काय दिसल? कसं दिसलं? ह्याच्या कथा रंगवण्यापेक्षा जत्रेच्या तयारीविषयी बोला. नाहीतरी लोकांची भिती कमी होण्यापेक्षा अजुन वाढेल. चला मी आता झोपतो. मला सकाळी तालुक्याला जायच आहे.
आबा आत मध्ये गेले तसे एवढा उशीर अवघडुन बसलेली सुमन सावरुन बसली. तिने समोर पाहीले तर अशोक तिच्याकडेच बघत होता. देनबाने काय पाहील हे मला माहीत आहे. सुमन आता काय उलगडा करणार म्हणुन सर्व उत्सुकतेने कान देऊन एकु लागले.
"सुमन सर्वांकडे पाहुन बोलु लागली. " एक तर त्या रात्री मी मंदीराजवळ आलेच नव्हते. मी घराच्या बाहेर पडले तसा मला कडी लावण्याचा आवाज एकु आला. मला कळालं की तात्या माझ्या मागे येतायत मी पटापट चालत पुढे गेले आणि आधी वाड्याला वळसा मारुन वर गेले आणि घळीच्या वाटेने परत खाली जात होते. चांदण्यात सार स्पष्ट दिसत होतं त्यामुळे जरा कमी भीती वाटत होती. इतक्यात समोरच्याच दगडावर कुणीतरी आमच्या वाड्याच्या दिशेने पाहात बसलं होतं नीट निरखुन पाहीलं तेव्हा कळालं हा तर साबळ्याचा देनबा. मग मी न घाबरता पुढे गेले आणि त्याच्या पाठीवर हात ठेवला. तसं आधीच घाबरलेल्या देनबाने मागे वळुन पाहीले. आणि डोळे मोठे करुन तिथेच बेशुध्द होऊन पडला बिचारा. मी जाम घाबरले होते. कदाचित माझा पेहराव पाहुन देनबा काहीतरी वेगळच समजला असावा. इतक्यात वर झाडीत अस्पष्टशी सळसळ जाणवली. बहुतेक कुणीतरी जोरात पळत खाली येत असावं. आणि खाली आबा धापा टाकत वाड्याकडे येताना दिसत होते. मग मी वेळ न दवडता घरी सटकले आणि झोपायच सोंग घेतल. जणु काही झालचं नाही.
आता पुन्हा नवीनच तिढा निर्माण झाला होता. हे सर्व आपण केल की आपल्याकडुन कोन करुन घेत होतं? जर सुमन वाड्याजवळ होती तर मंदीराजवळ कोण होतं? की खरोखरच मास्तर आणि त्यांच्या बायकोचा आत्मा.................? मंगलाबाई पोरांजवळच पहुडल्या होत्या. इतक्यात माडीवरचा दिवा लुकलुक करु लागला. बाहेर जोरात सोसाट्याचा वारा सुटला तसं माडीचं तावदान खडकण आतल्या भिंतीवर आदळलं तसे आतमध्ये बसलेले सर्वजण आपआपल्या जागेवर सावरुन बसले. अशोकने तोंडावर बोट ठेऊन हातानेच सर्वांना गप्प बसण्यास सांगितले. बाहेर सुन्न पसरलेली शांतता आणि तिला छेदणारा वारा यापलीकडे कसलाच आवाज नव्हता. वार्‍याच्या झोताबरोबरच दोन पांढर्‍या आक्रुत्या वेगाने आतमध्ये आल्या आणि जिथे मुल झोपली होती तिथे गेल्या. एक दोन-तीन मिनिटेच झाली नसतील की तडक वीज लपकावी तश्या त्या नाहीश्या झाल्या. मगापासुन चाललेल्या संवादापेक्षा आत्ताच्या अबोल शांततेत सर्वांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती.
**************************************************************************************************
यावर्षी मोठ्या दणक्यात यात्रा भरली. भोलागडीनेही तिच्या शिरस्त्याप्रमाणे काही केलं नव्हतं त्यामुळे सर्व गावकरी खुष होते. संध्याकाळी सर्वजन कुस्त्यांच्या फडावर जमा झाले. कारण आज अशोकची कुस्ती सांगलीच्या एका नामचीन मल्लाबरोबर होती. पण त्याचवेळेस भोलागडीत हळुहळु काही घटना वेग घेत होत्या.
बोंडारवाडीचा शिरपा त्याचा गेल्यावेळचा केदारबाला केलेला नवस फेडण्यासाठी बोरण्यात जात होता. पोचायला उशीर होईल म्हणुन तो भोलागडीच्या वाटेने येत होता. संध्याकाळची कातरवेळ त्यात भयान शांतता. त्यात सतत कुणीतरी आपल्या पाठुन चालतय असा होणारा भास. एकदोनदा त्याने मागे वळुन पाहीलही पण कुनीच नाही. चालत चालत तो बांबराजवळ पोहचला. तसे ढोल ताश्यांचे आवाज त्याच्या काणी पडु लागले. गाव जवळ आल्यामुळे तो मनोमन खुश होता. पण त्याला साधी कल्पणाही नव्हती की त्याच्यापेक्षाही जास्त अजुन कोणीतरी खुष झाल होतं. भरपुरवेळ चालल्यामुळे त्याला तहान लागली होती. समोरच बांबर शांत पसरला होता. शिरपाने हातातली पिशवी बाजुच्याच करवंदाच्या जाळीत अडकवली. आणि तो तळ्याच्या दिशेने चालु लागला.
गेला पाउन एक तास झाला पण कुस्ती काही निकाली लागत नव्हती. अशोकच्या अंगातुन घामाच्या धारा वहात होत्या. तर समोरचा मल्लसुध्दा चांगलाच दमलेला दिसत होता. आणि एका क्षणी तर अशोक पुर्ण खाली गेला त्याची पाठ धरणीला लागनार इतक्यात विजेच्या चपळाईने अशोकने गिरकी मारली आणि पुढच्याच क्षणी अशोक त्या मल्लाच्या छातीवर स्वार झाला. तशी आबासाहेबांनी जोरात आरोळी ठोकली."वा.....र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र माझ्या पठ्या....! त्यांनी आपल्या डोक्यावरचा फेटा उजव्या हाताने काढला आणि जोरात उडवला. तसे अशोकचे मित्र शाम्या आनि सुर्‍या धावत फडात गेले आणि त्यांनी अशोकला खांद्यावर ऊचलुन घेतला.
इकडे शिरपा जसा पाण्याचा जवळ गेला तशी वार्‍याची संथ झुळुक पाण्यावरुन गेली आणि तळ्यातल हिरवं पाणी शहारुन गेलं. शिरपाने आपल्या शर्टाच्या दोन्ही बाह्या वर सारल्या आणि तो पाण्यात उतरला. चालुन चालुन गरम झालेल्या पायांना तो गार स्पर्श हवाहवासा वाटु लागला. तो अजुन जरा पुढे गेला. आपल्या ओंजळीत पाणी घेऊन तो चेहर्‍यावर हलकेच हबके मारु लागला. चेहरयावरच पाणी दोन्ही हातांनी नितळुन टाकताना त्याच्या दोन्ही हातांना पाण्याचा गरम स्पर्श होऊ लागला आणि श्वास घ्यायला जड वाटु लागले. त्याने आजुबाजुला पाहील तसं त्याच काळीज चरकल. आता त्याची फक्त मानच पाण्याबाहेर होती.
कुणीतरी हळुहळु त्याला पाण्याच्या खाली खेचत होत...............................................................!
गावात बैलगाडीतुन अशोकची मिरवणुक निघाली होती. गावच्या पोरांनी जोरदार गुलाल ऊधळला आणि ढोल बडवायला सुरवात केली. धमडक तमडक.....धमडक...तमडक.............!
भोलागडीत पुन्हा एकदा भयान शांतता पसरली. हळुहळु अंधार पसरु लागला होता. जेऊन सुस्त झालेल्या जनावराप्रमाणे बांबरातलं पाणी निपचित पडलं होतं तर बाजुलाच करवंदीच्या जाळीत शिरपाची पिशवी येणार्‍या हवेबरोबर शांत झोके घेत होती...........................................!
शिरपाच्या श्वासाप्रमाणेच मिरवणुकीतल्या ढोलांचा आवाज वातावरणात विरळ होत जात होता.
धमडक तमडक......धमडक तमडक......धमडक तमडक........................!
समाप्त...........................!





No comments: