Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Monday, September 10, 2012

स्मशान वैराग्य

बोरिवलीची ट्रेन पकडल्यामुळे आज सात नं. फलाटाऐवजी पाच नं.फलाटावर उतरावे लागले. उशीर तर झालाच होता. धावत पळत खांदे वाकडे, तिरपे करत कसाबसा (नेहमीच्याच) गर्दीतुन पार्ले पश्चिमेच्या आकाशमार्गावर आलो (Sky walk). थोडे अंतर चालतो न चालतोय तोच खिशातला मोबाईल चुळबुळ करु लागला. सुरवातीला वाटले नको उचलुया. ऑफिसमधुन असेल. नाहीतरी मी लेट झालो होतोच. पण नंतर सवयीप्रमाणे न रहावुन फोन बाहेर काढला. स्क्रीन वर अण्णांचा नंबर. तिथेच मनात शंकेची पाल चुक-चुकली. जराही उसंत न लावता मी फोन काणाला लावला.समोरुन अण्णांचा अपरिचित असा गहिवरलेला आवाज्."अरे...... दादा आई....गेली........!...तुझी आज्जी गेली.....! एव्हाना मी अर्धा स्काय वॉक चालुन आलो होतो. एक "अर्ध्या" मिनिटासाठी मी ब्लॅंक झालो. पण लगेचच ह्या पांढरपेशा जगात कोडगं झालेलं स्वार्थी मनं जाग झालं. मी अण्णांना म्हणालो,''आता तुम्ही लगेचच आईला घ्या आणि मानखुर्दला जा. मी आता इथवर आलोच आहे तर ऑफिसमध्ये जाऊन लगेचच निघतो हो पण तिकडे गेलात कि नानांना सांगा प्रेत गावी वैगरे नेन्याच्या भानगडीत पडु नका. उगीचच वेळ पण जाईल आणि खर्चही होईल्.......मी पुढे काही बोलणार इतक्यात समोरुन अण्णा काहिसे रागावलेल्या स्वरातच बोलले, " चल ठेव आता..! त्यांनी मी पुढे काही बोलण्याच्या आतच फोन ठेवुन दिला.
आता माझं एक मन सांगत होतं की असाच मागे फिर तर माझा स्वार्थ मला सांगत होता की अरे आत्ताच जाऊन काय करणार आहेस. सर्व नातलग येईपर्यंत अजुन बराच वेळ जाईल उगाच उन्हा-तानात तिथे जाऊन सर्वांचे सुतकी चेहरे बघण्यापेक्षा ऑफिसला जा. खाडाही होणार नाही त्यात सेंकड हाफ मध्ये लोकांची सहाणभुती मिळवुन निघता ही येईल. अर्थात मी स्वार्थाचचं ऐकले. खाली उतरुन रिक्षा पकडली आणि थेट ऑफिस गाठलं. ठरल्या प्रमानेच गेल्या गेल्या काही महत्वाची कामे आटपली. मधुन मधुन बायकोला फोन करुन अपडेटस घेणं चालुच होते. अस करता करता बरोबर दुपारी बारा वाजता मी चेहरा सुतकी करुन बॉसच्या कॅबीनमध्ये गेलो आणि विचारल."Sir i have to leave, as my grandmother is no more. i gott a call from home. मी गेल्या दहा एक दिवसांपासुनच माझी आज्जी सिरियस आहे व तिला कधीही काहिहि होऊ शकतं. मला तिला बघायला जावं लागत वैगरे कारणं देऊन मस्तपैकी लेट जात होतो वरुन लोकही विचारपुस करत. त्यामुळे एक वातावरण निर्मिती आधीच झाली होती. बॉसने जराही आढेवेढे न घेता मला परवाणगी दिली. मी तडक माझ्या जागेवर गेलो बॅग आवरली आणि ऑफिसच्या बाहेर रस्यावर आलो.
रिक्षा पकडण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना मनात विचार आले. मी असा का वागतोय? दुसर तिसर कोणी नसुन माझी सख्खी आज्जी वारली आहे. तरीही मी असा भावशुन्य का वागत आहे?
मान्य आहे कि आत्तापर्यंत तिचा सहवास असा कधी मला मिळालाच नाही. त्यात आमचे अण्णा आणि सर्व काकां मध्ये आप-आपसात बेबनाव. घरची एकुन सद्यपरिस्थीती आपलीच माडी, आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल-गोल साडी. अशी झाली आहे. आमचे कुटंब एकत्र तर आहे. पण ते गावापुरतं (कारण गावात घरफळा एकाच घराचा द्यावा लागतो म्हनुन) मनं केव्हाच विभक्त झाली आहेत. आम्ही भावंड मात्र एक-मेकांशी छान बोलतो वागतो. पण तेही फक्त फेसबुकवरच. आजची पिढी तंत्रज्ञानामुळे एकमेकांच्या फार जवळ आली आहे. पण सुट्टीत भावंडाबरोबर अंगा खाद्यावर खेळण्या पेक्षा सोशल साईटसवर गेम खेळण्यातच त्यांना धन्यता वाटते. इतक्यात बायकोचा फोन आला आणि मी भानावर आलो. ते नुकतेच मानखुर्द ला पोहचले होते आणि मी पार्ल्याला. स्टेशनला पोहचताच मी माझ्या चुलत भाऊ दिपकला फोन केला तर त्याने काहीसे "त्रासिक" होउनच उत्तर दिले. निघालोयना....पोहचेन दोन-सवा दोन वाजे पर्यंत. ठिक आहे मीही पोहचेन तोपर्यंत म्हणुन फोन ठेवला.
मानखुर्दचे टिकिट काढले आणि प्लॅट-फॉर्म वर न जाता. टिकिट घराच्या बाहेर आलो.
भरपुर भुक लागली होती. विचार केला सर्व सोपस्कार पार पाडे पर्यंत काहीच खायला मिळनार नाही. पण एक आवाज सांगत होता. अरे चांगला धष्टपुष्ट आहेस. एक दिवस स्वताच्या आज्जीसाठी उपाशी राहीलास तर काही बिघडत नाही. अरे त्या माऊलीने गेले दहा दिवस अन्नाचा नीट कणही गिळला नसेल आणि तु आता अशा वेळी स्वताच खळंग भरण्याचा विचार करतोयस अरे आयुष्य पडलय अख्खं जेवायला. अर्थात आत्ताही स्वार्थी मनाचाच विजय झाला होता. मी वेटर ला मसाला डोसाची ऑर्डर दिली होती.

मसाला डोश्याचे पैसे चुकते केले आणि निघता-निघता कॉऊंटरवरची मुठभर बडीसौफ तोंडात बुचकली आणि हॉटेलच्या बाहेर आलो. तेव्हा लक्षात आलं कि अण्णांनी काही पैसे आणण्यास सांगितले होते. अर्थात हा मेसेज त्यांनी मगाशीच माझ्या बायकोमार्फत दिला होता. मी तसाच शेजारच्या ATM मध्ये गेलो.
माझ्या आधी दोघेजन तिथे प्रतीक्षेत होते. मीही दातात अडकलेली बडीसौफ, जीभेनेच तोंड वेडेवाकडे करुन काढण्याचा प्रयत्न करत होतो.(माझ्याकडे कोणांच लक्ष्य नाहीये अस बघुन) आणि माझ्या पुढचे आत गेलेल्या पोरीला शिव्या घालत होते. ,"काय साला, टाईम-पास आहे. किती वेळ्...वैगरे..वैगरे..तसा हा अनुभव प्रत्येक एटीमच्या बाहेरचा. बाहेर उभ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आत गेलेली व्यक्ती ही टाईमपास करत आहे असच वाटंणार. आता माझा नंबर होता (शिव्या खाण्याचा) मी आत गेलो गडबडीत कार्ड मशीन मध्ये टाकल. पिन टाकला आणि withdrwal amt हजार रु. टाकली. परत आतुन आवाज. अरे वेड्या तिथे प्रेत झालय. सगळे सोपस्कार करायला पैसे लागणार. त्यात अण्णा रिटायर्ड माणुस, ते थोडी ना सतत पैश्यासाठी तुझ्याकडे हात पसरणार आहेत . तुझ तुलाच नाही का बघावं लागणार. काय लागेल काय नाही ते. एक...... हजार-एक, जरा जास्त बरोबर घेतलेस तर काही बिघडणार आहे का? नाही तर एरवी मित्रांबरोबर पियाला बसलास की आपसुकच तुझे डेबिट्/क्रेडिट कार्ड बाहेर पडतात. हातातली रिसिप्ट चुरगळत मी "हजारच" घेऊन बाहेर पडलो.
प्लॅटफॉर्मवर १.२८ ची पनवेल लोकल लागली होती. ट्रेन यायला अजुन ८-१० मिनिटांचा अवकाश होता. खिश्यात परत कंपण होऊ लागलं. वाटल अण्णांचा फोन असेल म्हणुन गडबडीत बाहेर काढला तर डिस्प्लेवर राकेशच नांव. मी फोन कट केला. आयला आता ह्याला काय सांगु? सकाळपासुनच्या गडबडीत सारं विसरलोच मी. एक काम करुया ह्यांना पुढे जायला सांगुया. नाहीतर उगाच बिच्यार्यांना वाईट वाटेल. अस कसं झालं अचानक? तेही आत्ताच आणि आजच्या दिवशीच घडायच होतं.
अर्थात त्यांना माझ्या आज्जीशी काही घेणं-देणं नव्हते. आज होळी आणि उद्द्या रंगपंचमीची सुट्टी असल्यामुळे आम्ही सर्व मित्रांनी बाहेर रिसॉर्टवर जाण्याचे प्लॅनिंग केले होते. (दोन किलो बिर्याणी, बियरचा क्रेट, एक टिचर्सचा खंबा, ऊसनवार हुक्का, एक किलो सुका चिकण, अशी जंगी तयारी केली होती) थोडक्यात काय तर उद्द्याचा दिवस आमच्यासाठी स्वर्गसुखाचा होता. गेले दहा-बारा दिवस आम्ही मित्र रोज रात्री भेटुन या आनंदोत्सवाची वाट बघत होतो. पण्.....ते आता शक्य नव्हते. "साला आज्जीला पण आजच मरायच होतं" आधीच गेल्यावेळी माझ्या बायकोची तब्येत ठीक नसल्यामुळे एक पिकनिक कॅन्सल झाली होती. मी लगेच राकेश ला फोन केला. आणि झाला प्रकार सांगितला. वरुन त्याला हेहि म्हटले की तुम्ही पुढे जावा. मी सर्व आटपुन आ़ज रात्री किंवा उद्द्या सकाळी तुम्हाला जॉईन करेन त्यात उद्या जर हॅंग ओव्हर झालाच तर आज्जीच Valid reason आहेच. रजा घ्यायला. यावर त्याने काही प्रतीक्रिया न देताच फोन ठेवला.
मलाही फोन ठेवल्यानंतर जरा guilty फिल झालं. पनवेल ट्रेन रमत-गमत प्लॅटफॉर्मवर लागत होती. दुपारची वेळ असल्यामुळे गाडी रिकामीच होती. मी विंडो सीट पकडली आणि खिडकीतुन बाहेर बघत बसलो. मला अजुन पाऊन एक-तास काहीच काम नव्हतं. ना आज्जी गेल्याच सोयरं सुतक. आता टाईमपास काय म्हणुन मी खिशातला मोबाईल बाहेर काढला आणि मुख-पुस्तिका (Face - भुक) ओपन केलं. विचार आला आज्जी वरुन एखादा चांगला Status टाकुया. भरपुर लाईक्स आणि "मुलींची" सहानभुती मिळेल. चार ओळी मनात आल्या सुद्धा
थोरली आऊ,
मायेची साऊ,
कणखर माऊ, .............आज्जी माझी.
"आज्जी का?.... का सोडुन गेलीस आम्हाला?.....तुझ्या आठवनीने कंठ दाटुन येतो गं..........!
परत अंर्तमनाचा आवाज....अरे काहीतरी शरम कर. तिकडे ती माय मरुन पडलीये. अरे म्हातारी असली म्हणुन काय झालं ती होती म्हणुन अण्णा, आणि अण्णांमुळे तु आहेस हे त्रिकालबाधीत सत्य आहे. मान्य आहे एखाद्या व्यक्तीचा आपल्याला सहवास नसेल तर तितकीशी आत्मीयता आपल्याला वाटत नाही. अरे पण मानुस म्हणुन आपलीही काहीतरी नैतिक जबाबदारी असते. आणि ती अशी सोशल साईटसवर मांडुन तिचा " सोशल" बाऊ करण्यापेक्षा ति अंगावर घेऊन नैतिकतेने पार पाडणं केव्हाही उत्तम. अरे मदर तेरेसा, बाबा आमटे आणि अशी कितीतरी लोक आहेत जी लाईम्-लाईट मध्ये आलीच नाहीत. त्यांनी निरपेक्षपणे लोकांची सेवा केली. त्यावेळी कुठे होत्या या "सोशल" साईटस. का उगाच आपल काही आवडल की करा "SHARE" . त्यापेक्षा शेअर करा नात्यांमधल निखळ प्रेम. तुमच्या "Friend List" मध्ये किती मित्र आहेत याच्या पेक्षा तुमच्या अडल्या नडल्यात. गरजेला किती मित्र उभे राहतात हे महत्वाचे. अर्थात याहीवेळेला मी स्टेटस अपलोड करुन मोबाईल परत आत ठेवला. एव्हाना गाडी कुर्ला स्टेशनला आली होती.
गाडी थांबताच एक जर्जर झालेली म्हातारी आत शिरली. तिची एकुन अवस्था पाहुन तिच वय साठ्-पासष्ट च्या आसपास असावं पण उपासमारीमुळे पोट एकदम खपाटीला लागल होतं. गालफाट संपुर्ण आत गेलेली. हाता पायांच्या काड्या आणि फाटकी, मळकी ठिगळं लावलेली साडी. यामुळे ती जरा जास्तच म्हातारी दिसत होती. ती भीक मागत मागत हळु-हळु माझ्या दिशेने सरकत होती. काही लोकांनी तिला पैसे दिलेहि तर माझ्यासारखेच कोटगे झालेले काहिजण तिला हाकलवत होते. आता ती माझ्यासमोर उभी होती. लेकराssssssरा. ए लेकरा...! दे वाईच कायतरी. कालपासुन आनाचा एक कण नाय पोटात. मी ऐकुन न ऐकल्यासारखे केले. तिने परत माझ्या पायाला हात लावला. ए दादा...दे कायतरी गरीबाला! आत्ता मात्र तिने तिचे घाणेरडे हात मला (माझ्या स्वछ कपड्यांना) लावले म्हणुन मी एक जळजळीत कटाक्ष तिच्यावर टाकला आणि हलकेच ओरडलो. माफ कर बोललो ना. समजत नाही. यावेळेस मात्र ती गुपचुप निघुन गेली आणि पुढचेच स्टेशन टिळक नगरला उतरली. दोन एक मिनिटे झाली तरी ट्रेन हलण्याचे नाव नाही. म्हणुन खिडकीतुन बाहेर बघितले. लाल सिग्नल लागला होता. तेवढ्यात सहज लक्ष बाजुच्या कॅन्टीन वर गेले तर मगाचीच म्हातारी. आता तिच्या हातात एक क्रुश बांध्याचा लहान पोरगा होता जेमतेम ७-८ वर्षांचा. बहुतेक तिचा नातुच असावा. उन्हाने रापलेला. अंगात फक्त हाफ स्लीवचा पांढरा मळलेला शर्ट, बसक-गळतं नाक, पिंजरलेले केसं. एकंदर अवतारावरुन भरपुर दिवस तरी आंघोळ केली नसावी असच वाटत होतं. म्हातारीने जमलेल्या पैशातुन एक कटींग चहा घेतली आणि त्याच्यासाठी समोसा पाव. त्याने तो हातात पडताच एकदम अधाशीपणे तोंडाला लावला . ती मात्र तो चहा पित त्याच्या डोक्यावरुन समाधानाने हात फिरवत होती. तिने एकावेळच्या जेवणाचे(वडा-पावचे) पैसे वाचवले होते. न जानो त्याला परत कधी भुक लागली तर.....! एवढ्यात पिवळा सिग्नल पडला. आणि गाडी सुरु झाली..
आता माझ्या विचारांची गाडी सुरु झाली होती. कोण ती कुठली म्हातारी आज या वयात सुद्धा पोटासाठी वण-वण भटकत आहे. स्वताच्याच नाहीतर आपल्याबरोबरील त्या जिवाच्याही. माझ्याकडे तिला पाच-एक रुपये देवुन गमावण्यासारख काहीच नव्हतं परंतु कमावण्यासाठी भरपुर काही होतं त्या दोन भुकेल्या जिवांचा आशीर्वाद........! जो मी गमावला होता. नाहीतर कित्येक सुखवस्तु घरातील बायकांना मी पाहीलय. कमरेचे घेर हे वाढलेले. एकदा बसल की ऊठताना पंचाईत. सर्व प्रकारचे ऐशो-आराम पायाशी लोळन घालत असतात. तरीही दु:खी? यांना स्वताच्या नात्यांपेक्षा मालिकेतील नात्यांमध्ये जास्त रस. अगदी कोन कुठल्या सिरयल मधली ती "बा" वारली तेव्हा आमच्या बाजुच्या घोरपडे काकी दोन दिवस सुतकी चेहरा करुन बसल्या होत्या. याऊलट ही माऊली तिला कुठे दुखंल खुपंल तर कुणाला सांगायच? कोणाजवळ आपल मनं मो़कळ करायच? विचारांच्या गर्तेतच मानखुर्द स्टेशन आलं आणि मी खाली उतरलो.

मानखुर्द स्टेशनला उतरल्यानंतर रेल्वे रुळ क्रॉस करुन महाराष्ट्रनगरच्या दिशेने निघालो. समोरच वाकडी तिकडी पसरलेली झोपडपट्टी आणि बाजुलाच चिता कॅंम्पची तारेचं कुंपण घातलेली उंचशी भिंत एकदम विरोधाभास निर्माण करत होती. कुंपणाच्या आतल्या बाजुस असलेल्या मचाणावरती एक बी.एस.एफ. चा जवाण शांतपणे बाहेरील बाजुस बघत होता. अंगावरील वर्दी आणि हातातील संगिनी यामुळे तो जास्तच रुबाबदार दिसत होता. पलीकडील दुनिया कश्याना-कश्यात गुंतली असताना हा मात्र संयमाने चाकरी करीत होता. जणु त्याचं विश्वच वेगळ असावं.
"जसे आपलं अंतर्मन कोटगं झालेल्या आपल्या बाह्यमनाच्या काटेरी भिंती पलीकडे शांतपणे बघत असतं. आपल्या विचारांच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या गलक्यात ते आपलं शांतपणे ईमाण राखुण असतं. फरक इतकाच आपली नजर मात्र कधी कधीच त्या भिंतीपलीकडे जाते"
र्ईतक्यात सात-आठ पोरांचा एक ग्रुप मागुन कल्ला करत पुढे गेला. सार्यांचे चेहरे आणि कपडे रंगाने माखले होते. बहुधा उद्याची धुलवड त्यांनी आजच साजरी केली असावी. बाजुलाच स्थानिक पोरांनी लाकडी ओंडक्याभवती गवताच्या पेंड्या रचुन होळीची छान तयारी केली होती. तिथल्याच कुठल्याश्या एका गल्लीतुन लाऊड स्पीकरवर मोठ्याने होळीची गाणी चालु होती.
खडीचा एक कच्चा रस्ता रुळालगत सरळ महाराष्ट्र नगरच्या दिशेने जातो. रस्त्यावर बर्‍यापैकी वर्दळ होती. त्यात जागोजागी फेरीवाले पालांमध्ये निरनिराळे जिन्नस मांडुन बसले होते. त्यांच्यासमोर असलेल्या ग्राहंकाच्या वर्दळी मुळे चालण्यास अडथळा येत होता. त्यात आता बर्‍यापैकी उन्हही लागत होतं. कच्या रस्त्यापासुन पुढे गेल्यानंतर उजव्या हाताला वळालो असता समोरच एक मुतारी दिसली. वाटलं आता हलक होऊन येऊया. परत एकदा आतमध्ये गेलो तर लवकर सटकता येणार नाही.
तिथुन बाहेर येताच सहज मनात विचार आला. भरपुर वेळ झाला तरी बायकोचा किंवा अण्णांचा एक ही कॉल आला नव्हता. दिपकचा मात्र ऑलरेडी रिच्चड, व्हेअर आर यु? असा संदेश होता. बहुतेक सर्वजण आले असतील. मलाच उशीर झाला असावा? मी सकाळपासुन मंदावलेला माझा वेग आता मात्र वाढवायचे ठरवले. झपाझप टांगा टाकत गल्लीतुन आत वळालो. चालता चालताच माझा इनशर्ट बाहेर काढला आणि हातानेच केस वेडे वाकडे केले. अजुन पर्यंत तरी काही वाटत नव्हते पण जसं जसे काकांचे घर जवळ येऊ लागले तसं तशी आपोआपच छाती दडपु लागली. मन कासावीस होऊ लागलं.
दुपारची वेळ असल्यामुळे संपुर्ण गल्ली शांत होती. दोन तीन बायका त्यांच्याच घराच्या पडवीत बसुन काहीतरी निवडत बसलेल्या होत्या. तर बाजुलाच समोरासमोर ठेवलेल्या ड्रमचा आडोसा घेऊन दोन छोटी पोरं पिचकारीने एकमेकांना भिजवण्यात दंग झाली होती. ना कसला गोंधळ ना रडण्याचा आवाज मला जरासे आश्चर्यच वाटले. एखाद्या विभागात मयत झाले तर तेवढ्या पुर्ण भागात एक वेगळीच वसवस जाणवत असते पण येथील एकंदर वातावरणावरुन खरच हे कळायला मुश्कील होतं होते की या इथेच आज्जीचं देहावसान झालय .
दोन घरं सोडुन बाजुच्याच घरात मयत झाले असताना लोकं इतकी कशी निगरगट्टपणे राहु शकतात याचं मला जास्त वाईट वाटु लागलं खचीत रागही आला. पण इथे सकाळपासुन मीच असा टंगळ मंगळ करत पोहचतोय तिथे या परक्यांसुन काय अपेक्षा करणार? पण तरीही शेजार धर्म या नात्याने का होईना आपण विचारतोच. नाही म्हटल तरी काकांच्या घराबाहेर थोड्याफार चपला होत्या त्यातही ओळखीच्याच जास्त दिसत होत्या. पण घराबाहेर एकही तिर्‍हाईत माणुस दिसत नव्हता ना मर्तिकाचे सामान ना कसली तयारी ह्यांनी पार्थिव नेलं तर नाही ना? पण रस्त्यातुन येताना कुठेच तसं काही आढळल नाही. म्हणजे फुलं, गुलाल, सुट्टे पैसे वा चुरमुरे. की अजुन लोकांना कळवलच नाहीये आणि नसेल तर मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा असं म्हणायाची वेळ यायची. डोक्यात नुसता विचारांचा भुंगा भणभणत होता. पुर्वानुभवानुसार वाटले आता एकदा का घरात पाय टाकला की माझी एखादी काकी अथवा आत्या लगेच गळा काढेल.मला कवटाळेल "अरे लेकरा, तुझी आज्जी गेली रे.........अगं उठ बघ तुझा नातु आलाय तुला बघायला. अशी काहीतरी सुरवात होईल.
क्षणाचाही विचार न करता मी माझे बुट काढले आणि तडक आत शिरलो. आणि समोरील द्रुश्य पाहुण मला रडांव की हसावं तेच कळेणा? आपोआप मला समर्थ रामदासांच्या ओळींचा साक्षात्कार झाला.
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे अकस्मात तोही पुढे जात आहे.
घडे भोगणे सर्व ही कर्म योगे मती मंद ते खेद मानी वियोगे.

आमच्या सबंध परिवाराच्या लवाजम्यामध्ये "आज्जी" मधोमध बसुन तंबाखु मळत होती. तर आमचे अण्णा, आप्पा आणि दोन्ही नाना त्यांच्या आईच्या बाजुला सुजान मुलासारखे चिडिचुप बसले होते. तर माझ्या चारही अत्या आज्जीची सेवा करण्यात रमल्या होत्या. मला या प्रकाराचा कसलाच उलगडा होईना. नाही म्हटंल तरी आज्जीला असं जिवंत बघुन आनंदच होत होता. पण काकांनी असं खोट बोलुन हे सर्व उपदव्याप् कशासाठी केले. मी प्रश्नार्थक नजरेणेच त्यांच्याकडे पाहिलं. तेव्हा त्यांनीच मी काही बोलण्याच्या आधी सुरवात केली.
"अरे आज्जीच्या तब्येतीत गेले दोन-तीन दिवस झाले चांगला फरक पडलाय. पण आज सकाळी जेव्हा तुझ्या काकीने तिला आंघोळ घालुन बाहेर ओट्यावर कोवळ्या उन्हात बसवले. तेव्हा एक कावळा येऊन तिला शिवला. आणि आपल्याकडे जिवंत माणसाला असा कावळा शिवणे हे अशुभ लक्षण मानतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला तो कावळा शिवतो तिच्याविषयी वाईट बातमी आपल्या आप्तेष्टांना सांगण्याची प्रथा आहे. त्यामुळे म्हणतात त्या व्यक्तीचे आयुष्य वाढते. माझे कान जरी काकांचे शब्द ऐकत असले तरी डोळे मात्र सकाळपासुन घडलेल्या फ्लॅशबॅक मध्ये अडकले होते. या घडलेल्या प्रसंगामुळे क्षनीक का होईना मला अंतर्मनाचा आवाज ऐकायला भाग पाडले होते.
थोडक्यात काय तर एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा तेथील शोकमग्न वातावरण व एकंदर परिस्थीती पाहता नकळत आपण स्वताला त्या प्रसंगाशी जोडु लागतो. एक ना हजार प्रश्न मनात घोंगाऊ लागतात. आपला जन्म कशासाठी आहे? शेवटी सर्वांना इथेच यायच आहे! मग कशाला नस्ते हेवे दावे हवेत? नात्यांमध्ये कशाला तिढे हवेत? कशाला ही पैशाची हाव हवी? ही जीवघेणी स्पर्धा कशासाठी आणि कुणासाठी? आणि जरी स्वतासाठी तरी मग जाताना यातलं काय बरोबर नेणार आहोतं? अर्थात हे सर्व त्या म्रुत आत्याला शांती वाहे पर्यंत एकदा का त्या स्मशाण भुमीतुन आपण बाहेर आलो की ते वैराग्य ही अळवावरच्या थेंबाप्रमाणे लगेच गळुन पडते.
आणि सुखासाठी म्हणाल तरं सुखाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी असते. सुख मिळत नसते ते ज्याला त्याला आपआपले शोधायचे असते. गरज आहे ती काटेरी कुंपणाच्या पलीकडे मचानावर बसलेल्या "त्याचा" आवाज ऐकण्याची.
"प्रत्येकजण आपल्या आयुष्यात एक वर्तुळ बनवुन जगत असतो. माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, माझी प्रेयसी/प्रियकर, माझी बायको, माझे मित्र, माझी शाळा/कॉलेज, माझे ऑफिस, मासे घरं, माझी गाडी....इति पण आपल्याला हे विसरुण चालणार नाही की "त्या" वर्तुळाची सुरवात पण एका सुक्ष्म बिंदु पासुणच झालेली असते."
माझी बायको चहाचा कप घेऊन समोर उभी राहीली तसा मी भाणावर आलो. वाटत होतं काकांना दोन शब्द सुनवावेत. जग कुठे चाललय आणि तुम्ही कोणत्या परंपरांध्ये अडकला आहात म्हणुन, पण आज प्रथमच इतक्या वर्षांनी मी आमचं संपुर्ण कुंटुंब एकत्र पाहत होतो. त्यात एकाच कुटूंबातल्या सात-आठ बायका एकत्र इतक्या शांत बसु शकतात हाही एक प्रकारचा विक्रमच होता. दिपक आत मध्ये चहा घेत शांतपणे माझ्याकडे बघत होता. आईची आणि काकींची जेवणाची लगबग चालु होती. होळीला आज पुरण पोळीचा नैवद्य वाहायचा होता. अण्णा आणि इतर काका आज्जीच्या बाजुला शांतपणे बसल्यामुळे एकदम लहाण वाटायला लागले होते.
तेवढ्यात एक कावळा खिडकीपाशी येऊन काव-काव करु लागला. तसा काका ने काकीला मोठ्याने आवाज दिला. "अगं ऐकलस का? तुझे सासरे पण आलेत बघ त्यांच्या बायकोला बघायला त्यांना खायला काहीतरी ठेव ताटात" तसे आज्जी सकट आम्ही सर्वजण हसायला लागलो. हसता हसता मात्र आता महेश मांजरेकर काकस्पर्श दोन साठी आज्जीच्या रोल मध्ये कुणाला कास्ट करतील याचा विचार मी करु लागलो.
समाप्त.


Friday, September 7, 2012

सरप्राईज- मि अ‍ॅन्ड मिसेसे पाटील. भाग 2....

रविवार, सट्टीचा दिवस असल्यामुळे मन्या असाच बिछान्यावर लोळत पडला होता. इतक्यात किचन मधुन आवाज आला. " अहो" अहो,उठा आता "सकाळचे"बारा वाजलेत. (हे वाक्य म्हणताना अर्थात बारा या शब्दावर बारा हजार टनांचा जोर.) कि सुट्टी आहे म्हणुन सबंध दिवस असेच लोळत पडणार आहात. मी ऐकुन न ऐकल्यासारखे केले. आणि पुन्हा दुसर्‍या बाजुला वळकटी करुन लोळु लागलो. पाचच मिनिटांनी परत तोफ कडाडली .काय म्हणावं अश्या वागण्याला? लोकांची दुपारची जेवंण होऊन वामकुक्षीची वेळ झाली तरी या मानसाच्या आंघोळीचा पत्ता नाही. तरी काल म्हणत होते शनिवार आहे जरा लवकर जेऊन घेऊ आणि झोपु. पण उपवासामुळे स्वारी जेवली लवकर पण झोपायच्या नावाने बोंब, पायाला नुसती भिंगरी बांधलेली हा जरा आलो म्हनुन जे बाहेर गेले ते थेट रात्री तीन वाजता उगवले.
आता मात्र माझा "खुब-लढा" बुरुज ढासळण्याच्याच बेतात होता. शेवटचा उपाय म्हणुन डोक्याखालची उशी कानावर घेतली आणि माझ्या परीने बचावाचा अल्पसा प्रयत्न केला. पण समोरील शत्रुसुद्धा काही कमी ताकदीचा नव्हता. मला अशा पवित्र्यात पाहुन तर तिने अजुनच आक्रमक पवित्रा घेतला."अहो अजुन एक उशी घ्या. एकीने काय होनारयं, आज मी गप्प राहणार नाही.
तिची शेवटची ओळ ऐकुन तर माझं मुठी एवढं काळीज ताशी एकशे वीस मैलाने धडधडु लागले. तरीही मी तसाच निपचित पडुन राहीलो तर तिने थेट मला गदा-गदा हलवायलाच सुरवात केली. तेव्हा मला भिमाकडील अस्त्राला गदा का म्हणतात ह्याचा साक्षात्कार झाला. आता मला शरण पत्करण्याशिवाय गत्यंतर नव्हते नाहीतर जरासंधाचे जे हाल झाले ते पुढच्या पाचंच मिनिटात माझे होण्याची शक्यता होती.
मी लगेचच सावध पवित्रा घेतला आणि नुकताच झोपेतुन उठलोय या अर्विभावात डोळे चोळत म्हणालो हाय डार्लिंग "गुड मॉर्निंग, आणि तसाच चालत बेसीनच्या दिशेने निघालो, एवढ्यात बेछुट गोळीबार व्हावा त्याप्रमाने एका मागुन एक वाक्ये माझ्या दिशेने यायला लागली, अरे मानसा जरा शरम कर शरम, जनाची नाही मनाची तरी, तेवढ्यात तिला उगाच डिवचन्यासाठी मी म्हणालो तनु दारात आलेल्या व्यक्तीस असं डावलु नये जा घाल काही तरी त्याच्या झोळीत........! "मन्या, फालतुगिरी पुरे दारात कुनीही नाहिये. आणि तुलाही हे चांगल्यारीतीने माहित आहे की हे मी तुला बडबडत आहे.
मी समोरील केस मधुन पेस्ट घेत तोंडातल्या तोंडात पुटपुटलो "माहीत असुन सांगणार कुणाला"? आणि तलवारीसारखा ब्रश चालवु लागलो.इतक्यात गॅसवर काहीतरी ठेवले आहे या जाणिवेने ती पुन्हा किचण मध्ये गेली. बाजुला किर्रर्र.... स्मशान शांतता पसरली आणि मनात विचार आला माझ्या बायकोसारख्या आठ-दहा जनी अजुन गोळा करुन जर त्यांची बटालियन केली तर त्यांच्या आवाज आणि टोमण्यांनी शत्रुला मागे हटण्याशिवाय पर्याय उरणार नाही.स्वताच्याच पि.जे वर खुश होऊन मी ब्रुश अक्ष:रशह
तोंडात खुपसु लागलो आता माझ्या अंगात विरश्री संचारली होती, पण लगेच तोंडात नेहमीपेक्षा जरा जास्तच फेस होउ लागला आणि चवही फारच वेगळी असल्याकारणाने मी थुंकण्यासाठी (ओकन्यासाठी) बेसीनमध्ये मध्ये वाकलो असता तोंडातुन पेस्ट ऐवजी फुगे येउ लागले. त्याचक्षणी माझी नजर पुन्हा केस वर गेली तर टुथपेस्ट तिथल्या तिथेच निपचित पडुन होती. मीच मगाशी जोश मध्ये आमच्या सौंचा फेस वाश घेतला होता.
इतक्यात आतुन एकलव्याच्या बाणाप्रमाणे धार-धार टोमणा बाहेर आला. अरे मन्या फेस वाश वापरुन काय दात सफेद होनार आहेत तुझे त्यापेक्षा हार्पिक का नाही वापरत," एकदम जालीम उपाय! मी मनात म्हणालो आयला हिला महाभारतातल्या संजय प्रमाणे सिद्धी वैगरे प्राप्त झाली कि काय? नाहीतर किचन मधुन थेट बाथरुम जवळचं प्रक्षे"पण" हीला कसं समजलं? आणि मगाशी मुखातुन निघालेल्या असंख्य फुग्यांपैकीचे काही फुगे हॉलमधील पंख्याला लागुन फुटताना दिसले तेव्हा उलगडा झाला.
हे बघ मन्या ती तोर्‍यात बाहेर येत म्हणाली, आता तुला आंघोळ करावीशी वाटली तर कर नाहीतर नको करुस. आणि भुक लागलीच तर ज्यांच्याबरोबर रात्री तीन वाजे पर्यंत होतास ना त्यांनाच सांग तुला करुन वाढायला. तिची वाक्ये पुर्ण होईपर्यंत मी दरवाजा (स्नान-ग्रुहाचा) बंध करुन धडाधड बादली रिकामी करायला सुरवात देखील केली परंतु कान मात्र बाहेरील तंग वातावरणाचा आढावा घेण्यातच दंग होते, मी आतुनच ओरडलो तनुssssssss माझा टोवेल देतेस प्लीज.
माझा बांध तुटला रे आता! तुला काहीच कसं कळत नाही, या वाक्याबरोबर धाडकन माझा वार्डरोब उघडण्याचा आवाज आला.आणि परत एकदा भयाण शांतता पसरली....
मी हळुच दरवाजा उघडुन बाहेर आलो. अर्थात टॉवेल लाऊन जो मी मगाशीच आत नेला होता. तर तनु शांतपणे एका हातात तिची आवडती मोगर्‍याची वेणी आणि दुसर्या हातात मी आनलेले गिफ्ट आणि त्यावर लावलेला मजकुर वाचण्यात दंग होती.
माझी प्रिय बायको,
तनु ,
जी माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे!"तनु माझं तुझ्यावर खरंच फार प्रेम आहे तुझा आणि फक्त तुझा,
मनोहर..........!
तिच्या नकळत मी केव्हा तिच्या मागे आलो आणि कधी तिच्या खांद्यावर हात ठेवले हे तिला देखील कळले नाही, मी काही बोलणार इतक्यात मी तिच्या मिठीत विसावुन देखील गेलो होतो. मी हळुच माझा हात तिच्या केसांतुन फिरवत म्हणालो “अग वेडाबाई तुला वाटल तरी कसं? की मी आपल्या लग्नाचा वाढदिवस विसरेण म्हणुन, मला फक्त तुला सरप्राईज द्यायचे होते. म्हणुन तर कालच सर्व तयारी करुन ठेवली. आणि जेवल्यावर आधी सर्व वेताळांना म्हणजे माझ्या मित्रांना पार्टी दीली कारण त्याचासाठीच गेले दोन-एक महिने ते आपल्या पेक्षाही आतुरतेने ह्या क्षणाची वाट पाहत होते. पण कालच त्यांना मी खडसाऊन सांगितल उद्या नो फोन कोल्स नो विझिट, उद्याचा सबंध दिवस फक्त आणि फक्त मी माझ्या बायकोला देणार आहे.
आता जा आणि लवकर तयार हो मस्त पैकी, आपण तीन च्या शोला चाललोय. त्यानंतर सी-फेस मग छानपैकी जेऊया. माझा बेत पुर्ण व्हायच्या आतच तनु बेडरुम मध्ये पळाली होती.........