Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Monday, December 7, 2015

शापित गड भाग ३ अंतीम

  
पंडीतच्या वेषातील समर वर्मा मंदगतीने तटबंदीवरील सैनिकांच्या मानवंदना स्विकारत पुढे चाल करत होता. त्याच्या चेहरयावर एक आसुरी समाधान दिसत होतं. तो जसजसा आगेकुच करत होता तस-तसा त्याच्या मागचा प्रदेश आत्ताच रंग-रंगोटी केल्याप्रमाणे उजळुन निघत होता. नाना पिशाच्च प्रगट होऊन या वरातीत आता सामील होऊ लागले होते. एखाद्या छबीन्या प्रमाणे सर्व त्याच्या मागुन जल्लोषात चालले होते. त्यांच्या आनंदाला पारावार ऊरला नव्हता कारण काहीच तासांनी त्यांना त्यांचा राजा मिळणार होता.
 
इकडे राजकुमारी आरोही मला आणि भिवाला घेऊन पुन्हा राजवाड्यात आली. अर्थात यावेळी आम्ही तिच्या बंदीस्त  पालखीतुनच राजभवनात प्रवेश केला होता. तिच्या दालनात येताच तिने भोईंना हातानेच जाण्याची खुण केली. आता इथुन पुढे काय आणि कस करायच याची मला आणि भिवाला काहिच कल्पना नव्हती. मी सहज आरोहीला विचारल, "आम्ही इथे आहोत याचा त्याला संशय आला तर?",  "तर काय? माझ्याबरोबर कायम राहाव लागेल गडावर! त्याचे गुलाम बनुन" आरोही काहीशी हसतच म्हणाली. मी मनात म्हणालो, "तुझ्याबरोबर राहायला मिळतय तर गुलामच काय काहिही होण्याची माझी तयारी आहे". आरोही पुढे बोलु लागली, "हे पहा काळजीच कारण नाही! समर वर्मा आधी संपुर्ण गडाला प्रदक्षिणा  घालुण सर्व पिशाच्चांना जाग्रुत करेल. त्यानंतर हि सर्व जत्रा गडाच्या मागच्या बाजुने घनदाट जंगलातुन वेताळाच्या मंदीरापाशी जाईल. तिथे पोहचताच सुर्योदय होण्यापुर्वी तो मंत्रोच्चारण करुन मंदीरा समोरील अग्नीकुंडात स्वताला झोकुन देईल व वेताळाला प्रसन्न करुन पुन्हा जिंवत होईल. त्यानंतर तो काय करु शकतो याची कल्पनाच न केलेली बरी."
 
"हे सार ठिक हाय. पण आपण फकस्त तीनजन ह्यो एवढा मोठा लवाजमा सांभाळना्र तरी कसा? त्यात आमच्याकड कसली दैवी ताकद बी न्हाय. न्हाय बा... आपल्या बाच्यान बी न्हाय व्हायच हे, मी चाललु परत. आता काय बी होऊ दे". भिवा म्हणाला.  भिवाच मध्येच अस गलितगात्र होण माझ्यासाठी त्रासदायक ठरल असत, कारण नाही म्हटल तरी त्याच्या  मुळेच मी या भीतीदायक वातावरणात तग धरु शकलो होतो. मी त्याला समजवण्याचा प्रयत्न करु लागलो. शेवटी आरोहीनेच मध्यस्ती करत आम्हाला धीर देण्याचा प्रयत्न केला. "काळजी करु नका सर्वात महत्वाच, जो पर्यंत मी आहे तो पर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आणि राहीला प्रश्न तुमच्या भावाचा जर त्याला यातुन बाहेर काढायचा असेल तर आपल्याला  त्याची आजची उपासना ऊधळुन लावावीच लागणार". इति आरोही.
 
आरोहीच्या धीरोत्तर शब्दांनी भिवा आता शांत झाला होता. तिनेच पुढे बोलायला सुरवात केली. "सर्वात आधी तुम्ही तुमचा पेहराव बदला. ज्यानेकरुन तुम्ही कोणी बाहेरचे नसुन आमच्यापैकीच एक वाटायला हव. राहीला प्रश्न माणसाच्या रक्ताचा ज्याच्यामुळे तुम्ही लगेच ओळखले जाऊ शकता तर मी तुम्हाला एक कुपी देइन ज्यातील द्रव्या मुळे तुमचा गंध ह्या वातावरणात विरुन जाईल." आम्ही तिथुन निघणार इतक्यात आरोही ने मला हाताने थांबण्याची खुण केली. तिने शांतपणे तिच्या तर्जनीतली अंगठी काढुन माझ्या पुढे केली.."हि तुमच्या बोटात घाला. जर मध्येच काही गडबड झाली तर ही कुपी जमीनीवर जोरात आपटा आणि अंगठी वाला हात पुढे करा त्यातील दैवी तरंगामुळे तुम्ही आलेल्या संकटातुन वाचु शकाल". माझी बोटं थोडी जाड असल्यामुळे ती अंगठी मी तर्जनीत न घालता माझ्या अनामिकेत घातली. का माहीत नाही पण आतुन मला फार बर वाटत होतं. मी तिच्या गोड चेहर्याकडे एकदम आश्वासक पणे पाहिल तेव्हा तिही माझ्याकडे काहीशी तशीच पाहत असल्याच मला जाणवल. अर्थात ही वेळ आता या सर्व गोष्टींविशयी विचार करण्याची नक्कीच नव्हती. आरोहीची कल्पना चांगली होती. पण वाघाच कातड घालुन त्याच्याच गुहेत शिरताना जी अवस्था होईल तशी अवस्था आमची झाली होती. "हे सर्व झाल्यावर आता पुढे काय? म्हणजे आपण त्याच्या पुजेत विघ्न आनणार कसं?", मी आरोहीला विचारल. यावर मंद हसत तिने भिवाकडे पाहिले, " याची व्यवस्था मी काल संध्याकाळीच केली होती त्या डुक्कराला भिवाच्या फासापर्यंत आणुन. पुढच काम भिवाने केलेलं आहेच. आपल्याला त्या डुकराच शीर लागेल. कारण ज्यावेळी त्याचं मंत्रोच्चारण अंतीम चरणाकडे जाईल त्यावेळी सभोवतालची सर्व पिशाच्च उन्मादाने अग्नी कुंडाच्या भोवताली फेर धरुन वेताळाला आळवायला सुरवात करतील, बस्स ह्याच गाफिल क्षणी आपल्याला विजेच्या चपळाईने तिथे जाऊन हे शीर त्या अग्नी कुंडात टाकायच आहे. ज्यामुळे उपासनेत विघ्न येइल आणि सभोवतालच्या सर्व अमानवीय गोष्टींचा नाश होउन हा गड शाप मुक्त होईल कायमचा". ऐकायला जरी सोप्प वाटत असल तरी हे सर्व क्रुतीत उतरवायच आहे या विचारानेच छातीत धडकी भरली.
 
गडाखाली ठाकर वाडीत भिवाच्या घरासमोर मिनमिनत्या कंदीला च्या प्रकाशा्त काहीतरी हालचाल चालु होती. भिवाच्या पोटुश्या बायकोने नवरा सकाळी दोन पोरांबरोबर वर गेला तो परत खाली आलाच न्हाय म्ह्णुन बोंब ठोकली तशी वाडीतली काही वांड पोर झोपडी समोर बसुन काहीतरी कुजबुज करत होते. भिवाचा बाप डोक्याल हात लावुन वर डोळे लावुन बसला होता. चर्चेअंती त्यांच्यातलाच एकजण उठला आणि त्याच्या बायकोला म्हणाला, "वैनी तुह्या काळजी नको करु. बस ही रात सरुंदे. सकाळच्याला पहिल्या वक्ताला आम्ही सर्वजन वर जाऊन त्या समध्यासनी धुंडतो. आता वर जायच आमच काय धाडस न्हाय. रातच्यान कसल कसल इचित्र आवाज बी वरन येऊ लागल्यात."

राजकुमारी आरोहीने सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचे पेहराव बदलुन घेतले. मी माझा स्वीस नाईफ व ती कुपी धोतराच्या पिरवणीत लपवुन ठेवली न जानो काही वेळ आलीच तर. आम्ही दोघांनीही तिने दिलेल्या कुपीतील द्रव्य अंगावर लावले. निघण्याच्या अगोदर भोयांकरवी तिने डुकराचे शीर आणुन त्याला एका जाड कापडात व्यवस्थित बांधुन घेतले. ते शीर आता भिवाच्या पाठीवर आवरण बांधुन त्यात लपवल. म्हणजे चालताना त्याचे दोन्ही हात मोकळे राहतील आणि समोरुन कोनी पाहील तर त्याला संशय ही येणार नाही. बस आता आम्ही पुढच्या लढाईस सज्ज झालो होतो ज्यात फक्त जिंकावच लागणार होतं नाहीतर विनाश अटळ आहे.
 
काल रात्री बाहेरुन वाडा फक्त उजळलेला दिसत होता. पण ऐश्वर्य काय असत याची अनुभुती आता प्रत्यक्षात पाहुन मिळाली. ते मखमली पडदे, झुंबर, त्यातली रोशनाई, बसायच्या गाद्या त्यावरचे लोड, काचेच नक्षीकाम, भिंतीवरील चित्र आणि या सर्व वातावरणात यांत्रिकपणे गस्त घालणारे ते सैनिक. अर्थात सार काही अमानवीय. कोणाला संशय येऊ नये म्हणुन मी आणि भिवा आरोहीच्या मागे तिच्या सेवकांप्रमाणे चाललो होतो. मगाशी आम्ही कपडे बदलायला गेल्यापासुन आरोही एकदम शांत झाली होती. तिने एकदाही माझ्याकडे पाहील नव्हतं त्यामुळेच कि काही मला खचित अस्वस्थ झाल्यासारख वाटत होतं.  
 
खाली येताच आम्ही डाव्या बाजुच्या दरवाजाने आत जाऊ लागलो. आरोही आत जाताच दोन तीक्ष्ण  भाले कैचीप्रमाणे आम्हाला आडवे आले आणि काळजात धस्स झालं. भिवाच्या पाठीवरच शीर फक्त ऊसळुन बाहेर यायचच बाकी होत. आम्ही लगेच सावरुन समोर पाहिल, चार लालबुंद डोळे आमच्याकडे खुनशी नजरेणे पाहात होते. इतक्यात राजकुमारी आरोहीने एक जळजळीत कटाक्ष त्यांच्याकडे टाकत त्यांना ईशार्यानेच बाजुला होण्यास सांगितले. आम्ही काहीसे गोंधळल्यासारखेच तिच्या मागोमाग आत शिरलो. थोडस चालल्या नंतर आरोहीने परत एकदा डाव वळन घेतल व ती हळुहळु एक एक पायरी खाली उतरु लागली. ती जस जशी खाली ऊतरु लागली तस तश्या बाजुच्या कळकटलेल्या मशाली प्रजव्लित होऊ लागल्या. प्रथमच आम्हाला आरोहीच्या अमानवीय ताकदीची जाणीव झाली. भिवाच माहीत नाही पण माझी मात्र त्या पोशाखात पुरती गोची होत होती. हळु हळु पावल टाकत मी उतरत होतो. पुढे आरोही, मध्ये मी आणि मागे भिवा वळणाकार वीस-एक पायर्या उतरल्या नंतर आरोही पुन्हा उजव्या बाजुस वळाली. दहा-पंधरा पावले चालल्यानंतर अचानक ती एका भिंती समोर थांबली. तिच्या मागोमाग आम्ही सुध्दा थबकुन थांबलो. आता पुढे काय अशा प्रश्नार्थक चेहरयाने मी तिच्याकडे पाहिल तस तिने मला हातानेच पुढे यायला सांगुन भिंतीवरील दगडी चिन्हाकडे माझे लक्ष वेधले तो एक उलटा स्वस्तीक होता. तिने मला अलगद तो दगडी स्वस्तीक माझ्या डाव्या बाजुला फिरवण्यास सांगितला. मी मनात म्हणालो एवढ्या वर्षांनंतर कोणीतरी हात लावत असेल फिरेल तरी का? कि पोपट होतोय माझा! पण काय आश्चर्य स्वस्तीक अगदी अलगद फिरला. आणि दोन मोठे दगड घासताना जसा आवाज होईल तसा आवाज होऊन ती अजस्त्र दगडी भिंत अलगदपणे बाजूला झाली. अच्छा तर हाच तो "गुप्त" दरवाजा. मी आणि भिवा काहीतरी विस्मयकारक बघितल्यासारख एकमेकांच्या तोंडाकडे पाहात होतो. समोरच एक अरुंद भुयार तोंड आवासुन आमच्या स्वागतास सज्ज होतं. सात फुट ऊंच व तीन फुट रुंद अश्या त्या भुयारातुन एकच माणुस आरामात जाऊ शकत होता. आम्ही तिथुन आत आलो त्याच क्षणी पुन्हा तसाच आवाज करत तो दरवाजा बंद झाला. अस वाटल जणु काही एका अजस्त्र अजगराने आपल तोंड उघडुन आम्हाला गिळलय आणि आम्ही आता त्याच्या पोटात कायमचे बंद झालोय.
 
डुमुडुम डुमुडुम डुमुडुम डुमुडुम डुमुडुम.......... इकडे समर वर्मा त्याच्या लवाजम्यासह गडाच्या उतरणीला लागला होता. सारी भुतावळ मशाली नाचवत वाद्यांच्या आवाजात घनदाट जंगलातुन वेताळाच्या मंदीराकडे मार्गक्रम करीत होती. वाटेत येनार प्रत्येक जनावर आप-आपल्या परीने ओरडुन काहीतरी अमानवीय पाहिल्याच सांगत होतं तर हेच चित्र-विचित्र आवाज ऐकुन खाली हरवल गावात कित्येक लोकं डोक्यावर वाकाळ घेऊन निपचित पडले होते. डाव्या हातात लगाम धरुन उजव्या हाताने घोड्याच्या आयाळीवरुन ह्लका हात फिरवत रागीट डोळ्यांनी समर वर्माने वर आकाशाकडे पाहात पुटपुटले, "माझ्या उपासनेत खंड पाडणार काय? त्यासाठी आधी तुम्ही जिंवत तर राहील पाहिजे. त्याच्या चेहर्यावर क्रुर हासु उमटल. हाआहाहाहाहाआहाआ...............अजुन फक्त काहीच तास", पंडीत उर्फ समर वर्माच्या चेहर्यावरील भाव हेच दर्शवत होते.
 
गेले वीस पंचवीस मिनिटे आम्ही आरोहीच्या मागोमाग चालत होतो. कित्येक वळण घेतली असतील काहीच कळत नव्हत. भुयारातल वातावरण थंड असुनही माझ्या आणि भिवाच्या माथ्यावरुन घाम निथळत होता. थोड्याच वेळात पुन्हा एक छोटा दरवाजा लागला त्याच्या बाजुलाच दोन लहान देवड्या होत्या त्या मागे सारुन आम्ही पुढे जायला वळ्तोय तोच माझा पाय कशात तरी अडकुन मी धडपडलो माझ्या धक्क्याने भिवा सुद्धा थोडासा कलुन बाजुच्या भिंतीवर आदळला. आम्हाला अस गडबडलेल पाहुन आरोहीने मागे वळुन पाहील. पाहतोय तर दोन मानवी सापळे भिंतीला टेकुन निपचित पडले होते. त्यांच्या एकुन अवस्थेवरुन काहीतरी भंयकर त्यांनी पाहील असाव अस वाटत होतं. मला लगेच दादोसाने फॉरेनर्स बद्दल सांगितलेली गोष्ट आठवली. म्हनजे हे खालुन वर त्या दरवाज्या पर्यंत जाण्याचा प्रयत्नात होते पण मध्येच कसल्या तरी अमानवीय शक्तीने त्यांचा घात केला होता. हात देऊन मला भिवाने उठवण्याचा प्रयत्न केला तसा माझ्या मागुन कसलातरी आवाज झालेला मला जाणवला. घमम्म्म्म्म्, घम्म्म्म्म्म्म्म, घम्म्म्म्म्म्म्म, घम्म्म्म्म्म्म................तो आवाज आता हळु हळु मोठा होऊ लागला. मागे वळुन पाहिल तर आठ दहा लालबुंद डोळे आमच्याच दिशेने येत होते. आम्ही उठुन पळणार तशी आरोही आमच्या समोर उभी राहुन मोठ्या मोठ्या ने हासु लागली. तिच ते कर्णकर्कश्य हसणं छातीची धडधड वाढवत होतं. "उपासनेत व्यत्यय आणणार तुम्ही?...... हाहआहाआहाआआ अहाआहाआहाआआअ........ त्या आरोहीचा बंदोबस्त केव्हाच झालाय आता तुमची पाळी." परत मोठ्याने हसण्याचा आवाज........आता आरोहीच्या सुंदर देहाच्या जागी लाल राकट डोळे दिसत होते. तिचा नाजुक आवाज जाऊन आता घोगरा आवाज ऍकु येऊ लागला "स्स्सोड्णार नाही.... स्स्सोड्णार नाही...." आणि अचानक मागुन मानेवर जोरात कसला तरी प्रहार झाल्याची जाणीव झाली. डोळे मिटता मिटता शेवटचे काही शब्द ऍकु आले..."आज वेताळाला एक नाही तर तीन-तीन नरबळी मिळनार. ......हाहआहाआहाआआअहाआहाहाआआहाआहाअ..........."
 
हस्ताम्भोजयुग्स्थकुम्भ्युगलादुद्ध्रत्य तोयं शिरः
सिंचन्त करयोयुर्गेन दधतं स्वांके सकुम्भौ करौ
अक्षस्रंम्रुगहस्तंम्बुजगतं मूर्धस्थचन्द्र्स्र्वत
पीयुषाद्रतनुं भजे सगिरिजं त्र्यक्षं च म्रत्यंजयम.......

मंत्राच्या उच्चारणानेच मला जाग आली. मान जाम दुखत होती. सहज हात हालवायला गेलो तर कळालं हात पाय घट्ट बांधलेत. आजुबाजुला गडद अंधार होता तर समोरच वेताळाची शेंदुर लावलेली भडक मुर्ती डोळे आवासुन आमच्याकडे पाहात होती. समोर लावलेल्या दिव्यामुळे तर ती अजुनच गुढ वाटत होती. मी झटकन वळुन भिवाला शोधण्याचा प्रयत्न केला तर चार डोळे माझ्याकडेच खुनशी नजरेणे भाला रोखून पाहात होते. बाजुलाच भिवा माझ्यासारखाच असहायपणे बेशुध्दाअवस्थेत पडला होता. थोडक्यात काय तर आता खेळ संपला होता. आमच्या घरच्यांना कळनार सुध्दा नव्हत कि आमच्या बरोबर नक्की काय झाल. आणि आरोही, ती कशी काय अचानक गायब झाली? काहीच कळायला वाव नव्हता. काय झाल तिच्याबरोबर? की तो आमचा फक्त भास होता? का एखादी चाल आम्हाला यात अडकवण्यासाठीची. नाही ति अस करणार नाही. नक्कीच या हरामखोरानेच काहीतरी केल असणार. आम्ही असहायपणे त्या मंदीरात जायबंदी होऊन पडलो होतो. आता फक्त मेलेल्या कोंबडी सारखी वाट बघायची भट्टीत जायची.

बाहेर मंदीरासमोर किर्रर्र काळोखात होमातुन दाट ज्वाला येत होत्या, तर होमासमोरच समर वर्मा सर्व वस्त्र काढुन एका रिंगणात बसुन मंत्रोच्चारण करत होता. होमाच्या धगीने त्याचं संपुर्ण शरीर लालबुंद होऊन घामान डबडबलं होतं आपले तीक्ष्ण डोळे त्याने वेताळावर रोखुन धरले होते. तर बाजुची भुतावळ आपल्या माना खाली घालुन एका विशष्ट लयीत  फेर घालत होती. प्रत्येक शब्दागणिक त्याच्या मंत्राची धार आता वाढु लागली होती. म्हणजेच त्याची पुजा आता उत्तरार्धाकडे पोहचली होती. समर वर्मा ने मंत्रोच्चारण करता करताच हाताने काहीतरी खुण केली. तस मंदीरातल्या सैनिकांनी भिवाला खांद्यावर उचलला आणि ते बाहेर घेऊन गेले. भिवा अजुनही बेशध्द अवस्थेत होता. पण जसा त्याला होमाजवळ नेला तस धगीमुळे तो जागा झाला. आणि बाजच द्रुश्य पाहुन त्याच उरल सुरल बळसुद्धा निघुन गेलं. त्याला राहुन राहुन त्याच्या पोटुश्या बायकोची आठवण येऊ लागली. पण आता समर्पण करण्याशिवाय काहिच पर्याय नव्हता. पहिला बळी बाहेर आणल्यामुळे सारी भुतावळ आनंदाने जल्लोष करु लागली डुमुडुम डुमुडुम डुमुडुम डुमुडुम डुमुडुम........... सैनिकांनी भिवाला दोरखंडातुन मुक्त केल आणि भाले रोखुन त्याला त्या रिंगणात बसवलं. मंत्राचा आवाज आता जोरात घुमु लागला होता.  पडलेला वारा पण आता काहीतरी अमानवीय पाहायला मिळणार म्हणुन घोंघावत वाहु लागला. वार्यामुळे झाडांच्या फांद्या सुध्दा अस्ताव्यस्त झालेल्या केसांप्रमाणे उडत होत्या. तर जंगलातुन प्राण्यांचे विव्हळने चालु झाले होते.

हस्ताम्भोजयुग्स्थकुम्भ्युगलादुद्ध्रत्य तोयं शिरः
सिंचन्त करयोयुर्गेन दधतं स्वांके सकुम्भौ करौ
अक्षस्रंम्रुगहस्तंम्बुजगतं मूर्धस्थचन्द्र्स्र्वत
पीयुषाद्रतनुं भजे सगिरिजं त्र्यक्षं च म्रत्यंजयम.......

मी आत मध्ये शक्तीहीन अवस्थेत वेताळाच्या मुर्तीकडे पाहात होतो. आणि हळुच माझ लक्ष आरोही ने दिलेल्या अंगठीकडे गेलं आणि तिचे शब्द आठवले. मी  महतप्रयासाने माझे बांधलेले हात धोतराच्या पिरवटात लपवलेला माझा स्वीस नाईफ बाहेर काढला आणि दोन्ही हाताच्या पकडीत आडवा पकडुन दाताने खोलला मग पायात पकडुन आधी हाताची रशी खोलली मग पायाची. दोन्ही सैनिक मगाशीच भिवाला बाहेर घेऊन गेल्यामुळे आत कोणीच नव्हत. बाजुलाच भिवाच आवरण त्याला उचलताना त्यातील वजणामुळे खाली पडल होतं. आता माझ्या कानातही तोच मंत्र वाजु लागला होता. ज्या वेताळाच्या उपासनेसाठी हे सर्व चालल होतं त्याच वेताळाचा आशीर्वाद घेऊन मी रागातच त्या आवरणातल डुकराचं मुंडक बाहेर काढुन डाव्या हातात धरल तर उजव्या हातात ति कुपी पकडली. बाहेर पडलो तेव्हा समर वर्माने आपला अंगठा कापुन त्याच रक्त भिवाच्या कपाळाला लावल. तस त्या दोघांपैकी एकाने भिवाचे दोन्ही हात पकडुन त्याला वाकवल तर दुसर्या ने कमरेचा धारधार सुरा आपल्या हातात घेतला. आता मंत्राचे आवाज अजुन जोरात घुमु लागले होते.      
     
पीयुषाद्रतनुं भजे सगिरिजं त्र्यक्षं च म्रत्यंजयम....... 

त्याच शेवटच वाक्य पुर्ण होणार इतक्यात मी जोरात आरोळी ठोकली. "तुला बळी हवाय ना हा घे बळी.............." मी हातातली कुपी जोरात त्या रिंगणात आपटली व हातातली अंगठी समोर रोखुन धरली. कुपी फुटल्यामुळे एक उग्रसा दर्प त्या वातावरणात पसरला त्या वासामुळे व अंगठीच्या सामर्थ्यांमुळे सारी पिशाच्चे शक्तिहीन झाल्याप्रमाणे वागु लागली तसा भिवा झटकन माझ्या बाजुला येऊन उभा राहिला. पंडीत उर्फ  समर वर्मा ना त्या वासाला घाबरत होता ना अंगठीला. तो त्याच्या धगधगत्या डोळ्यातुन अक्षरशः आग ओकत मंत्रोच्चारण करत होता. जणु त्याला हेच म्हणायच होत कि कोणीच माझ काहिच उखडु शकत नाही. मी जराही वेळ न दवडता एकदा मंदीरातील वेताळाकडे पाहिल आणि कुत्सित पणे हसून ते मुंडक होमात फेकलं तसा स्फोट व्हावा त्याप्रमाणे ज्वाला भडकल्या आणि आम्ही दोन-तीन फुट लांब पडलो. समर वर्मा तर गुर हंबरतात तसा ओरडु लागला आणि क्षणात वादळ याव त्याप्रमाळे वारा सुटला. धुळीचा जोरात लोट आला. बाजुला सर्व जग गोल गोल फिरतय अस वाटु लागल आणि मध्येच पंडीत पाच सहा फुट हवेत वर उडुन जोरात जमीनीवर त्याच रिंगणार आदळला. त्याचे शेवटचे शब्द आमच्या कानावर पडले "स्सोडणार नाही........................................!"
 
सप्पकन कोणीतरी पाण्याचा सपका तोंडावर मारला तशी जाग आली. डोळे उघडले तर ठाकरवाडीतली पोर आम्हाला उठवण्याचा प्रयत्न करत होती. हातापायातल बळच गेल होतं त्यांनी आणलेल पाणी पिल्यानंतर थोडी तरतरी आली. भिवा आणि पंडीतची अवस्था पण काही वेगळी नव्हती. ठाकर वाडीत आल्यावर भिवाला पाहुन त्याच्या बायोकोच्या जिवात जीव आला. रडुन रडुन डोळे सुजले होते बिचारीचे. पंडीतचं सर्व अंग ठणकत होत त्याला रात्रीच काहीच आठवत नव्हतं आम्ही त्याला विचारल कि "तू तिथपर्यंत पोहचलास तरी कसा?" त्यावर त्याने सांगितल की, "मला तूच तर आवाज देऊन बोलावलस मग मी तुला शोधत आवाजाच्या दिशेने वाड्याच्या मागे गेलो तर तु मला पळत खाली जाताना दिसलास म्हणुन मी सुध्धा पळत तुझ्या मागे खाली आलो. तर तु पटकन काळोखात दिसेनासा झालास. तुला शोधत मी सुध्दा त्या काळोखात खाली उतरुन गेलो तेव्हा एका दालनात मला चमचमता प्रकाश दिसला, मी कुतुहलाने आत शिरलो तर समोर एका भव्य दिवानावर भरजरीत पोशाख ठेवला होता. त्याच्या बाजुलाच एक तलवार ठेवलेली आढळली. मी गंमत म्हणुन सहजच  त्या पोशाखातला मुकुट डोक्यावर घातला आणि ती तलवार उचलली तशी वीज सरकावी त्या प्रमाणे एक कळ माझ्या डोक्यातुन सर्व शरीरात भिनली त्यानंतरच मला काहीच आठवत नाहीये." सारी ठाकरवाडी तिथे आम्हाला बघायला लोटली होती. मग त्या पोरांनी आम्हाला सांगितल. रात्री कसे चित्र-विचित्र आवाज येत होते. मग सकाळीच ते आमच्या शोधात वर गेले तर वर फक्त् एक बिना मुंडक्याचा डुक्कर त्यांना दिसला आणि वाड्यात आमच्या बॅगा सापडल्या. मग कुणीतरी सुचवल कि रातच्याला येताळाच्या हितन कसल-कसल भयानक आवाज येत व्हतं तिकड धुंडुया. म्हणुन तुमची कापड आणि बॅगा घिऊन तिकड आलो तर ह्ये साहेब बिगर कपड्यात पडले होते, तर तुम्ही दोघे नुस्त्या धोतरावर बेसुद पडला व्हता. भिवाच्या घरी थोडी न्याहारी केल्यानंतर त्याचा निरोप घेऊन आम्ही तेथुन निघालो. निघताना बॅगेतले थोडे पैसे त्याच्या हातावर ठेवले तर पठ्ठया घेइना म्हटल, ठेव बाळंतपणात कामी येइल. तस त्याने साश्रु नयनांनी मिठी मारली आणि मलाही मग माझे अश्रु लपवला आले नाहीत. नाही म्हणता एका रात्रीत हा कोण कुठचा ठाकर पोरगा सख्या भावापेक्षा जवळचा झाला होता. त्याला लवकरच परत येइन म्हणत निरोप घेतला. एव्हाना आमची बातमी सार्या ठाकर वाडीत पसरली होती. सारी ठाकर वाडी आम्हाला निरोप द्यायला रस्त्यापर्यंत आली. भिवाचा बापपण त्यात होता. कालचा हाच विक्षिप्त म्हातारा आज मात्र समधानाने हात जोडुन उभा होता. पुंडलिकच्या दुकानापाशी गेलो तर दादोसा त्याच्या कार्यकर्त्यांना घेऊन आमची वाट पाहात उभा होता. तिथे पुन्हा परत सर्व कथा कथन झाल्यानंतर आम्ही निघता निघता. त्या दोन सापळ्यांविषयी त्याला माहिती दिली. म्हटल पोलीसांना कळवा. जर ते त्याच फॉरेनर्सचे असतील तर त्यांच्या ऍंबेसीला तरी रीतसर कळवतील. जमल्यास पुरातत्व खात्याला पण कळवा, वर अशा भरपुर गोष्टी आहेत ज्या त्यांना संशोधनाच्या कामी येतील. मला आता कधी एकदा घरी जातोय अस झाल होतं. यावेळीही दादोसानेच त्याच्या फटफटीवरुन आम्हाला त्या फाट्यावर सोडलं आणि आमचा निरोप घेऊन निघुन गेला. पंडीत साहेबांच्या काहीच लक्षात नसल्यामुळे तो संमिश्र विचारात गुंग होता. पण माझ मन मात्र वर गडावरच अडकल होतं आरोही पाशी. ती डोक्यातुन जाता जाईना. काल सकाळी जाताना ज्या दिशादर्शकावर हार्ट मध्ये जे बी.ए. लिहल होत ते माझ्यासाठी होत वाटत. "भास्कर लव्ह्स आरोही" मी अनामिकेतील अंगठीचे चुंबन घेत पुटपुटलो माझ्या विचाराने मलाच हसु आलं. इतक्यात आमची एस.टी धुरळा उडवत आमच्या समोर येऊन उभी राहीली. आम्ही दोघेही काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नसल्यामळे काल पासुन बंद असलेले आमचे मोबाईल बाहेर काढुन त्यात गुंग झालो. मी सहज मेसेजेस चेक करत असतानाच आईचा कॉल आला गेली पंधरा मिनिटे मी फक्त हा..हु..हा..हुच करत होतो. आता तुम्हाला कळालच असेल ति काय बोलली असेल ते. फोन ठेवल्या ठेवल्या फेसबुकचा नोटीफिकेशन मेसेज आला. सहज चेक करायला गेलो तर डोळे मास्क मधल्या जिम कॅरी सारखे मोठ्ठे होऊन बाहेर येतायत का अस वाटल. मेसेज होता आरोही वर्मा सेंट यु अ फ्रेंन्ड रिक्वेस्ट. तर इकडे पंडीत कानाला इअर फोन लाऊन हसत ह्सत कसल्यातरी ओळी गुणगुणत होता.

 

हस्ताम्भोजयुग्स्थकुम्भ्युगलादुद्ध्रत्य तोयं शिरः
सिंचन्त करयोयुर्गेन दधतं स्वांके सकुम्भौ करौ
अक्षस्रंम्रुगहस्तंम्बुजगतं मूर्धस्थचन्द्र्स्र्वत
पीयुषाद्रतनुं भजे सगिरिजं त्र्यक्षं च म्रत्यंजयम....... 


समाप्त
मंत्र  संदर्भ  (शिव पुराण : वेताळ  उपासना )
वरील कथेतीलल सर्व व्यक्ती, घटना, स्थळ पुर्णपने  काल्पनिक असुन काही साधर्म्य आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. 

5 comments:

Unknown said...

मस्त लिहील आहे.

Mahendra kadam said...

Thanx abhijit :)

Unknown said...

mast

Mahendra kadam said...

Thanks Nilam :)

Unknown said...
This comment has been removed by the author.