Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Tuesday, June 21, 2011

आभास - मराठी गझल

कधी कधी तो तिच्या जवळ असुनही जवळ नसतो. तेव्हा हा विरह फक्त विरह न राहता त्याच्या आठवणींचा मुर्तीमंत प्रतीक बनतो व केव्हातरी प्रत्यक्षरुपात समोर उभा राहतो.

एक श्रुंगारीक गोड आभास............

आता पुरी करा हौस तुमची
सरतोय पहीला प्रहर
रात्र जागून खेळ रंगला
शिनतेय माझी नजर....

नऊवारी नेसुन साज आळवला
कवळला बाजु बंद
मोगरयाची माळ माळुनी
मातले श्वास मंद

शिनगाराचा विडा रंगला
तळपली धुंद काया
ओवाळुन हा जीव टाकला
तुमच्यासाठी राया

हळच उडवी खांद्यावरचा
पदर वारा खट्याळ
पाऊलागनी भास हो तुमचा
पैंजण भारी नाठाळ

छळ झाला पुरे आता
करते एक अर्जी
जीव राहुद्या असाच तुमचा
बाकी तुमची मर्जी

तुम्हास स्मरुनी रूप रेखिते
तळात धरुनी काकण
सौभाग्याचा टिळा कपाळी
करतो तुमची राखण..................

श्रीमत् (महेन्द्र लक्ष्मण कदम)

Thursday, January 13, 2011

मि. & मिसेस. पाटील

घरी येताच जरा वैतागतच बुट काढले. "या रोजच्या प्रवासाचा पार वीट आलाय.." मी स्वतःशीच पुटपुटलो. इतक्यात आमच्या सौ. बाहेर आल्या; त्याही सोज्वळ हसत. मला पुढे काय काय वाढुन ठेवलं असेल याच्या निरनिराळ्या शंका- कुशंका मनात येऊ लागल्या. इतक्यात तिने स्वतःच माझी बॅग घेतली. "बसा हा, थकला असाल तुम्ही? मी आत्ता चहा टाकते तुमच्यासाठी, मग बघा कस ताज-तवानं वाटेल ते." काहीस आश्चर्यचकीत होऊन मी मागे दरवाज्याकडे वळुन पाहील की हे नक्की आपलच घर आहे ना? खात्रीसाठी नेमप्लेट ही परत पाहिली, तीही बरोबर होती. मग स्वतालाच एक चिमटा घेतला कळ अगदी डोक्यात गेली आयला म्हणजे हे स्वप्न सुद्धा नाही. मग नियतीने काहीतरी भयानक डावं आपल्याबरोबर खेळायच ठरवलेले दिसतयं. कारण लग्न झाल्यानंतर पहिले सहा महीनेच काय ते सुख मी अनुभवल होतं, त्यानंतर अहो चा मनोहर आणि मनोहर चा मन्या केव्हा झाला हे कळलच नाही. इतक्यात सौ बाहेर आल्या (हातात चहाचा पेला). मी कोचावर रेलुन बसलो होतो; ती आल्या आल्या मी सावुरन बसलो (ओरडा खाण्याच्या तयारीत.. बोले तो गांधीगिरी इश्टाईई.ल) पण कसलाच कांगावा नाही?
नाहीतर एरवी "तुम्हाला शिस्तच नाही, कपडे-मोजे कसेही फेकता, हात पाय धुवायचे नाहीत आल की पडायच लोळत, जरा पोटाकडे पाहीलय का? फक्त सोंड लावायची बाकी, टी व्ही आणि लॅपटॉप ह्याच्याशिवाय घरात देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणलेली एक जिवंत बायको सुद्धा आहे." (पण हीला समजवणार कोन? ह्या दोन्ही गोष्टी माझ्या बोटांवर चालतात कंटाळा आला की चॅनेल बदली किंवा बंद तरी करता येतं पण मी मात्र हीच्या बोटांवर नाचतो त्याचं कायं) असच काही बाही ऐकल्याशिवाय रात्रीच जेवण घश्याखाली उतरायच नाही.

मला संशय आला मी नकळत समोरच्या आरश्यात पाहील, क्षणभर मला कसायाकडील बोकडाची आठवण झाली. त्याला ही असाच कापायच्या आदी कुरवाळतात, पाणी पाजतात. नक्कीच काहीतरी घ्यायच वैगरे असेल किंवा कुठेतरी जाण्याचा बेत असणार. गेल्या वेळचा दाहक अनुभव मी अजुन विसरलो नव्हतो, जेव्हा हिच्या मैत्रिणीने चार तोळ्याचा सोन्याचा हार केला होता, तेव्हाही ही अशीच लाडात आली होती. मी तिला समजवलही (म्हणजे प्रयत्न केला) "अग तोळे हा शब्द बोलायला सोपा आहे, तो काही पतंगाचा मांजा नाही कि गेलो आणि आणला पाच-सहा तोळे फिरकी भरुन." मी आपली सहज फिरकी घेतली, पण ह्याच्यावरुन चौथे महायुद्ध आमच्या घरात पेटले. फरक इतकाच की त्याचा उल्लेख इतिहासात नाहीये. (हे वेगळ सांगायला नको की तो हार मला हार मानुनच घ्यावा लागला वर पेनल्टी एक तोळा)

तिच्या हातातला चहा घेत मी सहजच विचारलं सर्व ठिकठाक आहे ना? यावर तीने सरळ विषयालाच हात घातला, "अहो माझ्या आईच्या बाजुला नाही का ती लाडांची रुम होती, त्यांच्या मुलीची उद्या हळद आणि परवा लग्न आहे. माझ्यापेक्षा चार एक वर्षांनी लहान आहे. पण मी तिकडे (आईकडे) असताना ताई ताई करत नुसती माझ्या मागे असायची. तर मी काय म्हणते उद्दा सकाळीच मी....." तिचं बोलणे मध्येच तोडत मी सुरु झालो, "अग का नाही? शेजारी असले तरी शुभ कार्यात उपस्थित राहुन त्यांना हवी ती मदत केलीच पाहीजे. तू म्हणत असशीत तर मी आत्ता तुला गाडीवर सोडुन येतो. माझ्या जेवणा खाण्याची अजिबात काळजी करु नकोस. पण हे तीन दिवस मी तुझ्याशिवाय कसा काढणार?" (मला फारच वाईट वाटतय) असा चेहरा करुन सारं एका दमात मी बोललो.

"ए, एक मिनिट जरा श्वास घे माणसा... पहिली गोष्ट मी कुठेच चालली नाहीये आणि तुला अस एकट्याला सोडुन तर नाहीच नाही. गेल्यावेळी अशीच एकदा गेले होते दोन दिवसांसाठी तर तू आणि तुझ्या मित्रांनी साऱ्या घराचा उकीरडा करुन ठेवला होता. नुसत्या पलंगाखालुनच आठ-दहा दारुच्या बाटल्या मिळाल्या होत्या, आणि त्याही वर कळस, कुणी महा भागाने माचीस भेटल नसेल म्हणुन देव्हार्यातील दिव्याच्या वातीवर सिगारेट पेटवण्याचा प्रयत्न केला होता कारण मी येईपर्यंत सिगारेटच अर्धवट जळालेलं थोटुक तसेच बाजुला पडुन होतं." (त्याचक्षणी हे करणाऱया पप्याचा बावळट चेहरा आठवला आणि नेहमीच तो अशी काहीतरी च्यु..गीरी करतो ज्याच्यामुळे सार्या प्लानचे तीन तेरा वाजतात ह्या इतर मित्रांच्या वाक्याला मीही संमती दिली) त्यातही जेव्हा सर्व बाटल्या विकायला मी भंगारवाल्याला बोलावले, तर तोंड वरुन म्हणतो कसा "भाभीजी साब वाईन शॉप मे काम करते है क्या? अगर है तो ये रहा मेरा कार्ड हर महिना मै घर पर आके ही बॉटल खरीद लुंगा." कसाबसा ओरडुन त्याला फुटवला. अजुन पाच सहा दिवस नसते तर लोकांनीही उकीरडा समजुन कचऱ्याच्या पिशव्या आपल्याच घरात टाकल्या असत्या." आपली चुक असल्यामुळे मी मात्र मुग गिळुन गप्प होतो. मला असं गप्प झालेलं पाहुन हीच म्हणाली, "जाऊ द्या हो. असं मनाला लाऊन घेऊ नका मी केव्हाच हे विसरलेय. (मनात आलं मग आत्ताच तीन महिन्यांपुर्वीचा प्रसंग कसा आठवला?) हा तर मी काय म्हणते लग्नासाठी मी काल दादरला एक पैठणी पाहीली आहे. फक्त पंचवीस हजार रुपयांचीच आहे तशी मी घेणारच नव्हते. पण माझ्या सगळ्या बाल मैत्रीनी लग्नाला येणार आहेत. (ह्या शब्दावर आमच्या लग्नात आलेल्या सर्व भोचक भवान्यांचे चेहरे आणि त्यांनी जीजु.. जीजु.. जीजु म्हनुन जो काही उच्छाद मांडला होता तो आठवला आणि नकळत छातीत धडधड वाढु लागली.) आणि मला वाटतं गेल्या तीन एक वर्षात आम्ही एक-मेकींना भेटलो सुद्धा नाहीये, म्हटल भेटल्यावर जरा स्पेशल दिसल पाहीजे. शेवटी मनोहर पाटलांच्या इभ्रतीचा प्रश्न आहे?" "कोण मनोहर पाटील?" मी केविलवाण्या स्वरात विचारलं. "ए मन्या, असा रे काय करतोस? माझं ठीक आहे पण स्वतःचे नावदेखील विसरलास?" सौ. तारस्वरात केकटल्या. "नाही गं, माझ असं पुर्ण नावं ऐकण्याचा प्रसंग तो हि तुझ्या तोंडुन बहुदा क्वचीतच येतो. त्यामुळे जरा संभ्रमात पडलो." "पुरे आता स्वतःच सांत्वन. मी काय रागात तुला मन्या बोलत नाही. ते सोड, तु उद्या कामावरुन लवकर घरी ये, आपण खरेदी करायला जातोय." असं बोलुन (म्हणजेच खडसावून) ती आत गेली.

आता माझ्या पोटात पस्तीस-चाळीस हजारांचा गोळा आला होता, कारण साडी आली म्हणजे तिला "मॅचिंग" बाकीच "पॅचिंग" ही आलच. हातातला चहादेखील माझ्यासारखाच थंड झाला होता..................


- श्रीमत् ( महेन्द्र लक्ष्मण कदम)


(हा विनोदी लेख लिहण्यामागे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याची माझी इच्छा नाहीये तसेच त्यातील प्रसंग पूर्णतः काल्पनिक आहेत.)