Featured Post

रोज मरे........

नेहमीप्रमाणे पहाटे ५.३० चा गजर लाऊन ७.३० लाच उठलो, अर्थातच आजही व्यायाम करायचा राहीला होता. डोळे चोळत असतानाच डो़क्यात जो काही विचार पहीला आ...

Sunday, August 14, 2016


श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे 

श्रावण म्हटलं की आज ही मला बालभारतीतल्या पुस्तकातली बालकवींची कविता आठवते, कविता वाचताना त्यातली तैल रंगातली हिरवीगार चित्र पाहून मन नकळत त्या भावविश्वात पोहचायचं.

               आमच्या लहानपणी गटारी संम्पली की घराघरात श्रावणाची लगबग चालू व्हायची, उन्हाळ्यात खपून वाळवून बनवलेल्या कुरडया, सांडगे, पापड, ताकातल्या मिर्च्या सारं या महिन्यांत खायला मिळायचं, आई दर सोमवारी नाक्यावरून  केळीची पानं आणायची, त्यावर मग वरण-भात, तुप, लोणचं, पापड, भजी आणि जोडीला एखादी  पालेभाजी, आईचा नैवेद्द्य दाखवुन होइपर्यंत सात-आठ आवँढे गिळून व्हायचे. आता भरपूर महागड्या हॉटेल्स मध्ये जेवण होतं पण त्याने फक्त पोट भरते तृप्तीचा ढेकर त्यात नाही. तेव्हा आम्ही मुलं नाग पंचमी,रक्षाबंधन, दहीहंडी सर्व सणांना फुल धिंगाणा घालायचो.  आमची लुटुपुटुची भांडण, कटटी-बटटी सतत चालूच असायचं पण निस्वार्थ प्रेम असायचं त्यात , नाही म्हणता पहिली घटक चाचणी पण याच महिन्यात असायची पण फिकीर कोण करतो.  
 
  आज काळानुसार वय बदललं, जागा बदलली, आयुष्याच्या प्रवाहात भरपूर गोष्टी मागे पडल्या, श्रावणही  बदलत चाललाय किंबहुना तो बदलतोय कारण हल्ली माझी चिमुरडी "Rain Rain Go Away, Come Again Another Day" म्हणत असते. पण या ओळींना येरे येरे पावसाची सर नाही , ई श्रावण पाळणार्यान्ची नवी पिढीही सद्द्या फोफावतेय.

खरच आपल्या हातात काहीच नसतं, पण काहीही नसलं........
 तरी श्रावण आणि आपलं एक नातं असतं,
 शाकाहारी बॅंकेत महिनाभर खातं असतं.


गटारी संपुन लागते श्रावणाची चाहुल,
नाग पंचमी राखी पुनव सनासुदीचा माहौल,
पुरणपोळी नैवेध्य खाऊन तृप्त व्हायच असत,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

कान्हाचा जन्म, सुटे अष्टमीचा उपवास,
थरावर थर लागे दह्या दुधाची आस,
खांद्याला खांदा लाऊन भीडायच असतं,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

ना अंडी, ना मटन, 
ना मासे, ना चिकन,
वाटलच तर सोयाबीन मशरूम चवीने खायच असतं,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

ना चकना, ना दारू,
ना माडी, ना पारू,
बगळयासारखं बारकडे कुढत बघायचं असतं,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

गरम भात साजुक तुप,
फळे भाज्या महाग खुप,
मन मारत महीनाभर सात्विक जेवायचं असतं,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

ना कथा, ना कादंबरी,
ना हँरी पाँटर, ना कसल्या खबरी,
नाथ भागवत-शिवलीलामृत मनापासुन वाचायच असतं,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

गरम चहा जोडीला मैत्रीचा कट्टा,
गर्दीत भाऊ सार्या ग्रुप आपला मोठ्ठा,
डे साजरे करत सारे प्रेमात भिजायच असतं,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

कधी ऊन, कधी पाऊस, श्रावण म्हणजे एक भास,
श्रावण म्हणजे चाहुल नवी सृजनाचा नवा ध्यास,
आठवणीच्या हिंदोळ्यार झुलून गार व्हायचं असतं,
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

वर्ष बदलते, महीना बदलतो,
वयापरत्वे श्रावणही बदलतो,
नव्या पिढीला परंपरेच वा देऊन जायच असतं.....
श्रावण आणी आपलं एक नातं असतं,
शाकाहारी बँकेत महीनाभर खातं असतं...

-श्रीमत् 
(महेन्द्र लक्ष्मण कदम)




Friday, August 5, 2016

"Extended Panvel" आता पनवेलला बहुतेक लोणावळ्या पर्यंत पोहचवणार.

#Upper Worli # New Cuff Pared# Extended Thane काय चाललय काय? 

महाराष्ट्राचा पुर्ण भूगोल भिघडवणारं ही बिल्डर लॉबी . वेळीच आवरा ह्यांना.